मायकल लोबो: निकालानंतर पाचच मिनिटांत सरकार स्थापन करू

विरोधी पक्षनेते निकालानंतर आपणच मुख्यमंत्री: मायकल लोबो
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak

गोवा: मायकल लोबो हे अतिमहत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व आहे. सरपंच, आमदार, मंत्री व आता मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते जे निकालानंतर आपणच मुख्यमंत्री होण्याची गोष्टी करत होते, ते स्पर्धेत मागे पडलेले दिसतात. लोबो यांच्या गतिमान हालचाली पाहता कामतांना केवळ बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे व देवावर विश्र्वास ठेवण्यापलीकडे काहीही राहिलेले नाही. लोबो यांनी निकालानंतर पाचच मिनिटांत सरकार स्थापन करू, असे म्हटले आहे. शिवाय दिल्लीला जाऊन त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली आहे. तात्पर्य, दिगंबरच्या माथ्यावर मायकलचा झेंडा, अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

कोणता देव पावतो पाहुया!

विधानसभा निवडणूक झाली खरी; पण निकाल आपल्याच बाजूने लागावा, यासाठी राज्यातील बहुतांश उमेदवारांकडून सध्या देवदेवतांचे दर्शन, वगैरे सुरू आहे. काहीजणांनी तर आपल्या घरीच पुजाऱ्यांना बोलावून होमहवनादी विधी केले आहेत, तर काहीजणांनी मंदिरात जाऊन धार्मिक विधी केले. काहीजणांनी दर्ग्यावर चादरी घातल्या, तर काहीजणांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थनाही केली.

आता कुठला देव या नेत्यांना पावतो ते पाहावे लागेल. फोंडा तालुक्यातील तर एका मतदारसंघातील प्रस्थापित उमेदवाराने रोजच गाईला दूध-भात भरवायला सुरवात केली आहे. निकाल लागेपर्यंत म्हणे हा उमेदवार दूध-भात गाईला भरवणार आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात देवदेवतांना साकडे घातले म्हटल्यावर कुणा एकाचे तरी देवतांना ऐकावेच लागेल. मग इतरांचे काय?

Michael Lobo
निकालाआधीच मोर्चेबांधणी; गोवा काँग्रेसच्या रणनीतीची दिल्लीत बैठक

एका बाबूची विकेट गेली?

प्रमोद सावंत सरकारात दोन्ही बाबू म्हणजे बाबू आजगावकर आणि बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्री पदावर आहेत. मात्र, नव्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असणार नाहीत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नव्या सरकारात दोन उपमुख्यमंत्री नसणार, असे सूतोवाच केले आहे.

कदाचित दोनपैकी एकच बाबू जिंकून येणार, असे मनोमन वाटत असल्याने सदानंदरावांनी असे स्टेटमेंट केले की काय माहीत नाही. पण त्यांचे म्हणणे खरे असल्यास एका बाबूची विकेट आपोआपच गेल्यात जमा आहे. दुसऱ्या बाजूने, डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावकरांना आश्वासन देऊन ठेवले आहे. आपल्या नव्या कॅबिनेटमध्ये बाबू आजगावकर हेच उपमुख्यमंत्री असतील. याचा अर्थ काय बरे घ्यावा?

उलटे झाले तर?

डॉ. प्रमोद सावंत यांनी कानाला धरून बाहेर काढल्यामुळे असेल कदाचित, सुदिन ढवळीकर त्यांच्यावर भलतेच नाराज आहेत. हल्लीच एका मुलाखतीत आपण सावंत यांच्या मंत्रिमंडळात कधीही सामील होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी आपली पसंती विश्वजीत राणेच, हे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले आहे. यदाकदाचित त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आलीच तर मगोचा पाठिंबा हवा असल्यास मुख्यमंत्रिपद आम्हाला द्या, अशी सुदिनराव मागणी करू शकतात, असे सांगितले जाते. त्यासाठीच ते अशी वक्तव्ये करून पार्श्वभूमी तयार करत तर नाहीत ना?

तृणमूल किती जागा जिंकणार?

अगदी गाजावाजा करून गोमंतकीयांवर आश्र्वासनांची खैरात करून बंगालमधील ममता दीदींच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाने गोव्यात प्रवेश केला. निवडणुकीच्या सुरवातीच्या दिवसांत काय तो थाट, त्यांच्या नेत्यांची काय ती वक्तव्ये. गोमंतकीय सोडा, लुईझिनही प्रभावित झाले आणि कॉंग्रेस सोडून ममता दीदींच्या गोटात सामील झाले. राज्यसभेचे खासदार करून ममता दीदींनीही त्यांचा आदर राखला.

आता निवडणुकीनंतर भाजप व कॉंग्रेस आपणच सरकार घडवणार, अशा घोषणा करीत असताना तृणमूल कॉंग्रेस मात्र चिडीचूप आहे. लुईझिनना विचारले तेव्हा ते सांगतात, आपल्या पक्षाने दोनसुद्धा जागा जिंकल्या तर पुष्कळ झाले. अरेच्चा! पक्षाच्या नेत्याने असे बोलावे? ममता दीदींनासुद्धा वाईट वाटले असेल. पण सत्य त्यापेक्षा कटू असेल हे १० मार्चलाच कळेल. पण याचे स्पष्टीकरण देताना लुईझिनबाब म्हणतात कॉंग्रेस, भाजप या पक्षांना गोव्यात सत्ता स्थापनेसाठी वेळ लागला नाही का? आम आदमीवाले तर गेल्या पाच सहा वर्षांपासून धडपडत आहेत. त्यांचे हे म्हणणे बरोबर आहे. राजकीय नेत्यांकडे सर्व तऱ्हेची स्पष्टीकरणे असतातच.

एकमेकांवर दोषारोप!

शुक्रवारी सोनसोडो पुन्हा पेटला. नेहमीप्रमाणे नगरपालिकेची आग विझविण्यासाठी धावपळ सुरू झाली. ही आग पूर्वीप्रमाणेच उच्च दाबाची वीजवाहिनी तुटून पडल्याने ठिणगी उडाली व सुक्या कचऱ्याने पेट घेतल्याने लागली.

आता मजेची बाब म्हणजे, सर्व संबंधित शासकीय यंत्रणाच केवळ नव्हे, तर राजकारणीही या प्रकरणात एकमेकांवर गंभीर दोषारोप करू लागले आहेत. सरकार असो, नगरपालिका असो वा अन्य कोणीही, आग लागल्यावरच सर्वांना सोनसोडो आठवतो, असेच हे एकूण प्रकरण आहे का? केवळ आग लागल्यावर सोनसोडोकडे वळण्यापेक्षा तो प्रश्‍न कायमस्वरूपी निकालात काढावा, असे त्यांना का वाटत नाही? किंबहुना पुन्हा राजकारणासाठी नवा मुद्दा काय शोधणार, हा प्रश्‍न त्यांना सतावत असावा.

निकालाची धाकधूक

विधानसभा निवडणुकांचा निकाल येत्या चार दिवसांत जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आपणच विजयी होणार असल्याचा दावा गोवाभरातील प्रत्येक मतदारसंघातील किमान तीन-चार उमेदवार ठामपणे करीत आहेत. त्यामुळे आता यापुढे एकेका मतदारसंघासाठी तीन-चार आमदार असतील, अशी मार्मिक टिप्पणी करून काही मतदार राजकारण्यांची अप्रत्यक्षपणे टर उडवताना दिसत आहेत.

असे असले तरी दुसऱ्या बाजूने सर्वत्रच अटीतटीच्या लढती झालेल्या असल्याने विजय-पराजयाबाबत उमेदवारांनाही कमालीची धाकधूक लागलेली आहे. सध्या बहुतांश उमेदवार त्याच दडपणाखाली असून, त्यांनी मतदान झाल्याच्या दिवसानंतर सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळले असल्याचे जाणवते. म्हापसा शहरातदेखील नेमकी हीच परिस्थिती आहे. काही का असेना, मतदारराजाच्या राजदरबारात झालेल्या उमेदवारांच्या या सत्त्वपरीक्षेत कोण उत्तीर्ण होणार आणि कोण अनुत्तीर्ण, याची प्रतीक्षा आगामी दहा तारखेपर्यंत सर्वांनाच करावी लागणार आहे.

Michael Lobo
आयआरबी पोलिसांचे प्रवासादरम्यान हाल

मायकल लोबोंचे उपद्रवमूल्य

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षच सर्वाधिक जागा पटकावणार, असे केवळ काँग्रेसजनांचेच नव्हे, तर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे. त्यासंदर्भात खासगीत बोलताना ते भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते अगदी ठामपणे त्यासंदर्भात वक्तव्ये करीत असले तरी याबाबत परस्परविरोधी बाब म्हणजे, काँग्रेसने बहुमत मिळवले अथवा सर्वाधिक जागा मिळल्या तरी काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईलच असेही सांगता येणार नाही, या निष्कर्षाप्रत भाजपबरोबरच काँग्रेस कार्यकर्त्यांचेही एकमत झाले आहे.

एका बाजूने भाजप साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून आणि येनकेन प्रकारेण कोणत्याही थराला जाऊन सत्तेत राहण्याचा आटापिटा करण्याची शक्यता, केंद्रात असलेली भाजपची सत्ता आणि पक्षहिताऐवजी स्वहित पाहणारे काँग्रेसचे काही नेते इत्यादी कारणे त्यामागे आहेत, अशी खुद्द प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

यावर कळस म्हणजे, खुद्द मायकल लोबो हे भाजपनेच काँग्रेसमध्ये सोडलेले पिल्लू असून, तेच काँग्रेसचे विध्वंसक असतील, असाही त्यांचा दावा आहे. भाजपसमवेत लोबो राहिले नाहीत तर कोणते तरी कारण पुढे करून त्यांची रवानगी कारागृहात करण्याचा विडाच काही जणांनी उचलला असल्याने त्याची धास्ती घेऊन लोबो ऐनवेळी काँग्रेसशी दगाबाजी करून बार्देशमधील स्वत:च्या सहकाऱ्यांसमवेत भाजपशी संधान साधतील, असा सध्या बोलबाला आहे. ∙∙∙

Michael Lobo
Goa Election 2022: 'दोन तासांत निकाल शक्य'

सासष्टीबाबतही शंका?

सासष्टी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला, असेच आजवरचे राजकीय समीकरण ठरलेले आहे. ज्या ज्या वेळी सासष्टीतील पाया हलला, त्या त्या वेळी काँग्रेसला सरकार स्थापन करता आलेले नाही. खरे तर त्याची सुरवात 2012 पासून झाली.

त्या वेळी मडगाव व कुडतरी वगळता एकही मतदारसंघ त्या पक्षाला मिळाला नाही, तर 2017 मध्ये निवडणुकीत जिंकलेले गड पक्षांतरामुळे घालवले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सासष्टीवर काँग्रेसवाल्यांचा बराच भरंवसा होता आणि अगदी हल्लीपर्यंत ते उघडपणे बोलूनही दाखवत होते. पण मतमोजणीचा दिवस जवळ येऊ लागला, तसतसा तो डगमगू लागलेला दिसतो. त्यामागील कारण आहे धर्मनिरपेक्ष म्हणजेच भाजपविरोधी मतांची विभागणी कशी होईल, याचा अंदाज त्यांना लागेनासा झाला आहे. ∙∙∙

राज्यात मत्स्यावतार

पुराणकाळात शंखासुर या राक्षसाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मत्स्यावतार धारण करून त्याचा वध केला, अशी आख्यायिका आहे. आता किनारी व्यवस्थापन ऑथॉरिटी ही शंखासुराच्या रूपाने राज्यातील किनारी भागातील मच्छीमारांच्या मानगुटीवर बसली आहे, ही खेदाची बाब आहे.

आता दर्यावर्दी मत्स्यपुत्र मत्स्यावतार घेऊन या नवीन शंखासुराच्या जाचक नियमांपासून आपली सुटका करून घेतील की त्याच्याच विळख्यात गुरफटतील, अशी चर्चा किनारी भागाबरोबरच अन्य नागरिकांमध्ये सुरू आहे.

येऊन येऊन येणार कोण?

सर्वच काना कोपऱ्यांत एकच चर्चा. येऊन येऊन येणार कोण? जसा निकालाचा दिवस जवळ येऊ लागला आहे, तशी नेते, मतदार अशा सर्वांचीच उत्कंठा वाढू लागली आहे. प्रत्येकजण आपलाच उमेदवार निवडून येणार म्हणून डाव मांडू लागला आहे. एकूण उमेदवारांपैकी प्रथम तिघेजण मोठ्या उमेदीने खुशीचे मांडे खात आहेत. पण नियती ठरविणार, तोच उमेदवार निवडून येणार आहे.

इतर उमेदवार आपली मानसिकता तयार करून आहेत; पण तीन उमेदवारांपैकी दोघांना आपली मानसिकता निकालादिवशी बदलावी लागणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यातील ही रंगत दिवसेंदिवस वाढू लागली असल्याने प्रत्येकजण 10 मार्चकडेच डोळे लावून बसल्याचे चित्र राज्यात दिसू लागले आहे.

खाण अवलंबितांची थट्टा

जो तो उठतो आणि राज्यातील खनिज खाणींवर बोलतो. खाणींद्वारे लुटमार केलेल्या खाणमालकांविरुद्ध कुणीही बोलत नाही. खाणमालक गब्बर झाले आणि खाण अवलंबित भिकारी झाले, त्याबद्दल कुणालाही सोयरसुतक नाही. फक्त मतांवर डोळा ठेवून खाण भागातील अवलंबितांची सध्या थट्टा चालली आहे. विधानसभा निवडणुकीत तर खाणी सुरू करण्यासाठी राणा भीमदेवी थाटात घोषणाही झाल्या.

कुणी सहा महिन्यांच्या आत तर कुणी दोन महिन्यांच्या आत खाणी सुरू करण्यासंबंधीची आश्‍वासने दिली आहेत. आता तुम्ही सांगा. राज्यातील खनिज खाणी बंद पडल्यास दहा वर्षे सरली. दोनदा या खाणी बंद पडल्या. त्यात फक्त दोन वर्षेच खाणी चालल्या. केंद्रात आणि राज्यात खुद्द भाजपचे सरकार असूनही खाणी काही सुरू झालेल्या नाहीत आणि आता हे हौशे-नवशे-गवशे लागलेत आश्‍वासने द्यायला, असा सूर खाण अवलंबितांमधून उमटू लागला आहे.

विशालला लॉटरी लागणार?

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा कुंकळ्ळीत सर्वाधिक मतांनी जिंकून नगरसेवक बनलेले विशाल शाबू देसाई यांचे नशीब फळफळणार, अशी शक्यता असून नगराध्यक्षपदाची माळ विशाल देसाई यांच्या गळ्यात पडणार असल्याचे कळते. विशाल देसाई यांना भाजप समर्थक नगरसेवकांबरोबरच सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांचाही पाठिंबा असल्याचे समजते. १३ मार्चला देवस्थान समितीच्या निवडणुका पार पडल्यावर मार्चच्या मध्यंतरास विशाल देसाई नवीन नगराध्यक्ष बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ट्रोजन डिमेलो विक्रमवीर!

ट्रोजन डिमेलो हे आमदारपदी निवडून आले नसले तरी गोमंतकीय राजकारणात सर्वाधिक पक्षांतर करणारे म्हणून आगळावेगळा ‘बहुमान’ त्यांनी प्राप्त केला असून त्याबाबत ते विक्रमवीरही ठरलेले आहेत. माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा यांचे ते उजवे हात असल्याचे मानले जात होते. परंतु, डिमेलो यांची राजकीय अभिलाषा बळावल्याने त्यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली व खुद्द त्यांच्या विरोधातच विधानसभा निवडणूक लढवली होते. पण, ते विजयी होऊ शकले नाहीत, ही गोष्ट निराळी! प्रारंभी कॉंग्रेसमध्ये असताना ते तत्कालीन मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा यांचे पी. ए. होते.

परंतु, त्यानंतर त्यांनी अनेकदा पक्षांतरे केली. राष्ट्रवादी काँग्रेस, यूजीडीपी, गोवा राजीव कॉंग्रेस, जनता दल, गोवा फॉरवर्ड अशा कित्येक पक्षांचा अनुभव घेत सध्या ते तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत. मध्यंतरी त्यांनी स्वत:चा राजकीय गटही स्थापन केला होता; पण त्यातही ते अपयशी ठरले. दोन-तीन वेळा काँग्रेस पक्षात प्रवेश करून तो पक्ष सोडलाही होता, हेदेखील सर्वज्ञातच आहे. ते आहेत की नाहीत पक्षांतरसम्राट? हे व्यक्तिमत्त्व विरोधकांच्या तसेच स्वकीयांच्याही विरोधात नेहमीच करीत असलेल्या स्फोटक वक्तव्यांमुळे नेहमीच जनमानसात चचेंत राहिले आहेत.

कोणाच्या म्हशी अन्...

‘कोणाच्या म्हशी आणि कोण काढतो उठबशी’ ही म्हण राय-कुडतरीतील लोकांना सोनसोडोबाबत तंतोतंत लागू होते. खरे पाहिले तर सोनसोडो हा भाग राय पंचायत क्षेत्रात येतो, हे सोडले तर अन्य कोणत्याच बाबतीत तिचा त्याच्याशी संबंध येत नाही. पण त्याचे सर्व दुष्परिणाम राय-कुडतरीच्या लोकांना भोगावे लागतात. तेथे कचरा येतो तो मडगाव व फातोर्डाचा. त्यातून ज्या समस्या निर्माण होतात, त्याचा थेट त्रास या पंचायतींना होतो. दोन वर्षांपूर्वी तसेच शुक्रवारी तेथे जी आग भडकली व त्यातून जो धूर पसरून प्रदूषण झाले, त्याची सर्वाधिक झळ मडगाव व फातोर्डाला नव्हे तर राय, कुडतरी या भागाला बसली. त्यामुळे तेथील रहिवासी ही म्हण आळवताना दिसतात.

फोंड्यातील राजकीय ‘चर्वितचर्वण’

फोंडा मतदारसंघात कोण निवडून येणार, हा सध्या कुतुहलाचा विषय बनला आहे. तरीही या निकालाची भविष्ये वदवणाऱ्यांची संख्या फोंड्यात कमी नाही. रवींचा एक निष्ठावान कार्यकर्ता तर रवी कसे निवडून येणार, हे चक्क सांख्यिकी अहवाल देऊन सांगत आहे.

रवींची स्वतःची फोंड्यातील चार ते पाच हजार मते अधिक भाजपच्या सहा हजार मतांपैकी कमीत कमी चार हजार मते व फोंड्यातील कॉंग्रेसच्या पाच हजार मतांपैकी रवींमुळे भाजपकडे वळलेली हजार ते दीड हजार मते, असा हिशेब ते करताना दिसतात आणि हा हिशोब खरा ठरल्यास रवींची एकूण मते 9 हजारांच्या पार जातात आणि ते सहजपणे निवडून येऊ शकतात. याच तार्किक शास्त्राचा आधार घेत ‘पात्रांव’ निवडून येणारच, असे भाकित तो वर्तविताना दिसतो आहे. सोशल माध्यमांवरसुध्दा त्याने हे भाकित टाकले आहे. आता हे त्याचे भाकित खरे ठरून ‘पात्रांव’ फोंड्याच्या तिरंगी लढतीत खरेच बाजी मारतात की काय, हे निवडणुकीच्या निकालादिवशीच कळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com