खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Khari Kujbuj Political Satire: सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आसपास वावरणारेही या बाबतीत अननुभवी. त्याचा फटका मडगावात बसला. आंदोलन कसे हाताळावे याचा अनुभव नसल्याने सरकारी यंत्रणा आंदोलकांसमोर हतबल झाल्याचे दिसले.
Khari Kujbuj Political Satire: सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आसपास वावरणारेही या बाबतीत अननुभवी. त्याचा फटका मडगावात बसला. आंदोलन कसे हाताळावे याचा अनुभव नसल्याने सरकारी यंत्रणा आंदोलकांसमोर हतबल झाल्याचे दिसले.
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

जीत - मायकल आमने सामने

हरमल नवरात्रोत्‍सव मंडळाच्या कार्यक्रमात कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी ८ रोजी ‘स्‍वरझंकार’ हा संगीताचा कार्यक्रम पुरस्‍कृत केला आहे. त्‍यांच्‍या या कार्यक्रमाचे पत्रक मांद्रेत सर्वत्र व्‍हायरल होत आहे. कळंगुट ते मांद्रे ही झेप लोबो यांनी घेण्‍याचे कारण म्हणजे त्‍यांना आपल्‍या मुलाला मांद्रे मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उतरवायचे आहे अशी जोरदार चर्चा मांद्रे मतदारसंघात सुरू झाली आहे. त्‍यामुळे आता मांद्रे मतदारसंघ काबीज करण्यास लोबो उत्सुक असल्‍याच्‍या चर्चेला उधाण आले आहे. शिवोलीनंतर आता लोबोंची नजर मांद्रेत पडल्‍याने जीत आरोलकर आणि मायकल लोबो आमने सामने येणार हे नक्की. त्‍यातही जीत आरोलकर यांनी नुकतेच पार्से व मांद्रे येथील मंदिरात झालेल्‍या दोन गटांच्‍या वादात एका गटाला पाठिंबा दिल्‍याने आरोलकर यांच्‍यावर नाराज झालेले कार्यकर्ते लोबो यांना पाठिंबा देणार अशीही चर्चा रंगत आहे. ∙∙∙

आंदोलनाची धग

गेली काही वर्षे मोठी आंदोलने न झाल्याने आंदोलनाची धग काय असते याचा अनुभव सरकारी यंत्रणेला नाही. सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आसपास वावरणारेही या बाबतीत अननुभवी. त्याचा फटका मडगावात बसला. आंदोलन कसे हाताळावे याचा अनुभव नसल्याने सरकारी यंत्रणा आंदोलकांसमोर हतबल झाल्याचे दिसले. आंदोलकांची मागणी मान्य करायला रात्रीचे पावणेनऊ वाजवण्यात आले. त्यामुळे पुढील कारवाई करणे लांबणीवर पडले. सत्ताधारी भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीतही या अनपेक्षित घडामोडींची चर्चा झाली. सरकारला असे काही पुढे होणार याचा अंदाज यायला हवा होता. सरकारकडे माहिती संकलनासाठी गुप्तचर यंत्रणा आहे. त्याचा उपयोग या प्रकरणात का केला गेला नाही हाही प्रश्न आहे. मात्र, सरकार कशापुढे झुकते हे आंदोलकांना समजले आहे. आंदोलनाची धग आता वारंवार सरकारला जाणवेल असे यावरून दिसून येते. याची चिंता भाजपमधील बुद्धिजीवींना आत्तापासूनच सतावू लागली आहे. ∙∙∙

शुल्कात कपात नाहीच!

गोव्यात दरवर्षी होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देश-विदेशातील प्रतिनिधी येतात. त्यासाठी एक महिना अगोदर प्रतिनिधी नोंदणीला सुरवात होते. प्रतिनिधी नोंदणीसाठी प्रवेश शुल्क निश्चित केले जाते, परंतु शुक्रवारी यंदाच्या इफ्फीमध्ये प्रतिनिधी शुल्कात कपात होणार असल्याचे वृत्त व्हायरल झाले. अनेक खासगी वृत्तवाहिन्या व दैनिकांनी ते वृत्त कव्हरही केले. गोवा मनोरंजन सोसायटीच्या लक्षात ही शुल्क कपातीची बाब आल्यानंतर तेथील सदस्यांनी शुल्क कपात होणार नसल्याचे कळविले, परंतु आज काही वृत्तपत्रांनी शुल्क कपातीचे वृत्त दिले आणि दरवर्षी प्रतिनिधित्वासाठी नोंदणी करणाऱ्यांना सुखद धक्का दिला. परंतु हा आनंद फार काळ टिकणारा नाही, एवढेच येथे कळवावेसे वाटते. ∙∙∙

झोप उडविणारा व्हिडिओ

शनिवारी सकाळी सकाळी एक व्हिडिओ व्हॉट्सॲपवर व्हायरल झाला. अनेक पत्रकारांच्याही व्हॉट्सॲपवर हा व्हिडिओ आला. समुद्राच्या गोव्याच्या हद्दीत गोव्यातील प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याचा हा व्हिडिओ काहीजणांची झोप उडविणारा ठरला. कारण ही घटना गोव्याची असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्या व्हिडिओची सत्यता पडताळल्यानंतर तो व्हिडिओ आफ्रिकेतील कांगो येथील असल्याचे दिसून आले. या घटनेत जहाजातील ७० च्यावर लोकांना बुडून मृत्यू आला असल्याचे वृत्त आहे. गोव्यातील व्हिडिओ म्हणून अनेकांनी तो शेअर केला असल्याचे आढळून आले असले, तरी दुपारनंतर तो व्हिडिओ गोव्यातील नसून आफ्रिकेतील असल्याचे स्पष्टीकरण खासगी वृत्त वाहिन्यांनी दिले. मध्यंतरी गोव्यातील एका मंत्र्यांचे व्हिडिओप्रकरण बरेच गाजले होते. छोट्या राज्यात एखादी घटना खळबळ उडविणारी ठरते, तसा बोटीचा व्हिडिओही समाज माध्यमांत खळबळ उडविणारा ठरला एवढेच. ∙∙∙

सुभाष वेलिंगकर उवाच

संत फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍या अवशेषांचे डीएनए तपासा असे वक्‍तव्‍य केल्‍यामुळे सध्‍या संपूर्ण गोवा पेटून उठलेला असताना वेलिंगकर यांनी आपले म्‍हणणे कसे खरे हे पटवून देण्‍यासाठी आपल्‍या फेसबुकवर एक पोस्‍ट टाकली आहे. त्‍यात ते म्‍हणतात, ‘कुणाच्‍या ‘धार्मिक भावना’ दुखावतात आणि ‘जातीय सलोखा’ बिघडतो म्‍हणून सत्‍य दाबले असते, तर कोणताही देश आपला इतिहास लिहू शकला नसता’. या पोस्‍टवरून वेलिंगकर आपले वक्‍तव्‍य कसे गैर नव्‍हते हे सांगण्‍याचा प्रयत्‍न करतात. त्‍यावर सध्‍या आंदोलनात उतरलेल्‍या लोकांचाही त्‍यांना प्रश्न आहे, तुमचे वक्‍तव्‍य योग्‍य, तर फा. बॉलमेक्‍स यांचे वक्‍तव्‍य चुकीचे कसे होते? ∙∙∙

सुदिनांच्या मुख्यमंत्रिपदाची पुन्हा चर्चा

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर अलीकडे प्रसिद्ध झालेला ‘सुदिन अजूनही मुख्यमंत्री का झाले नाहीत? हा लेख त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यातून अजूनही जायचे नाव काढताना दिसत नाही. कोणतेही निमित्त झाले की गाडी सुदिनांच्या मुख्यमंत्रिपदावर येऊन घसरायला लागली आहे. काल निमित्त झाले ते नागेशीच्या एका वयोवृद्ध व्यक्तीच्या बाराव्या दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीचे. सुदिन यांचे कुटुंब, म. गो. पक्ष व इतर संबंधितांतर्फे दिवंगताला या जाहिरातीतून आदरांजली वाहण्यात आली होती आणि याचीच चर्चा काल या भागात सुरू होती. काहींना तर यामुळे भाऊसाहेब बांदोडकरांची आठवण झाली, तर सुदिनांच्या काही कार्यकर्त्यांनी असा सामान्यांची मृत्यूनंतरसुद्धा कदर करणारा पात्रांव (सुदिन) सारखाच मुख्यमंत्री हवा असा सूर आळवायला सुरवात केली. हा जरी वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार असला, तरी यातून सुदिनना मुख्यमंत्रिपदी पाहण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा प्रतीत होत आहे एवढे मात्र नक्की. ∙∙∙

नक्की भीती कशाची?

कामुर्ली गावात सनबर्नसाठी आयोजकांनी स्थानिक कोमुनिदादकडे जागा मागितली आहे. याविषयी आज कोमुनिदादची बैठक होणार आहे. या बैठकीत सनबर्नचे भवितव्य ठरणार आहे. सध्या गावात सनबर्न नको म्हणू स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद मिळतोय. अनेकजण सनबर्नच्या विरोधात बोलत देखील आहेत. मात्र, थेट माध्यमांसमोर येण्यास बरेचजण घाबरत आहेत. कारण नंतर आपण टार्गेट होऊ शकतो याची त्यांना भीती वाटते. काही पंचायतीमधील लोकप्रतिनिधी खासगीत याला विरोध करतात, परंतु समोर येऊन बोलण्यास चालढकलपणा करतात. काहीजण म्हणतात, आमचा विरोधच आहे, परंतु उद्या आमच्या प्रभागातील विकासकामे अडवून धरल्यास? मुळात लोकप्रतिनिधींनी शिंगावर घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. मवाळ भूमिका घेणे हे समाजहितार्थ नाही असे आता लोकच बोलू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी कामुर्लीत होणाऱ्या या सभेकडे गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे एवढे नक्की. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आसपास वावरणारेही या बाबतीत अननुभवी. त्याचा फटका मडगावात बसला. आंदोलन कसे हाताळावे याचा अनुभव नसल्याने सरकारी यंत्रणा आंदोलकांसमोर हतबल झाल्याचे दिसले.
खरी कुजबुज: ‘शॅक’धारकांना सुखद धक्का!

यापूर्वीही डीएनएची मागणी

‘आ बैल मुझे मार’ हा वाक्प्रचार आपण ऐकला असणारच. ख्रिस्ती धर्मीयांचे संत फ्रान्सिस झेवियर यांची डीएनए चाचणी करावी अशी मागणी करून सुभाष वेलिंगकर संकटात सापडले आहेत. मात्र, फ्रान्सिस झेवियर यांची डीएनए चाचणी करावी ही मागणी नवीन नाही. बौद्ध धर्मीयांनी १९५२ साली ख्रिस्ती चर्चला पत्र लिहून फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. जुने गोवे येथे असलेले शव हे श्रीलंकेतील राहुल थेरा या बौद्ध धर्मगुरूचे असल्याचा वाद आहे. यासंदर्भात २०१४ साली श्रीलंकेतील एक पत्रकार कविरत्ने यांनी गोव्यात पत्रकार परिषदेत याची माहिती दिली होती. याचा अर्थ चर्च संस्थांना हा वाद नवीन नाही, मग वेलिंगकर सरांनी मागणी केली त्यात गैर काय आहे? असा प्रश्न वेलिंगकर समर्थक विचारीत आहेत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com