मायकल लोबोंचे राहुल गांधी यांना गोव्याच्या शपथविधीसाठी आमंत्रण

मायकल लोबो यांनी के.सी. वेणुगोपाल यांची दिल्लीत भेट घेतली
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: काँग्रेसचे प्रभारी वेणुगोपाल राव यांची भेट घेतली. तेवढ्यावर ते थांबले नाहीत. तर आपण राहुल गांधी यांना गोव्याच्या शपथविधीसाठी आमंत्रण द्यायला दिल्लीला आलो आहे, असे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. असे आमंत्रण मुख्यमंत्रीच राहुल गांधी यांना देऊ शकतो. मायकल लोबो यांनी मुख्यमंत्रिपदासाठी सारी फिल्डिंग लावली आहे, हे तर जगजाहीर आहे. परंतु, राहुल यांना आमंत्रण देण्यासाठी आलो, असे म्हणणे अतिच झाले नाही का?

कॉंग्रेसची लगीनघाई

जसजसा मतमोजणीचा दिवस जवळ येत आहे, तसतसे सर्वच पक्ष आपणच सत्ता स्थापन करणार, असे सांगू लागले आहेत. कॉंग्रेसने तर त्याही पलीकडे जाऊन सत्ता स्थापनेसाठी वेळसुद्धा जाहीर करून टाकली आहे. कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष गिरीशबाबांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळी मतमोजणी झाल्यावर संध्याकाळी 5 वाजता सत्ता स्थापनेसाठी दावा करू.

मात्र, भाजपमधून कॉंग्रेसवासी झालेले व मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असलेले मायकल लोबो म्हणतात, मतमोजणी संपल्याबरोबर केवळ 5 मिनिटांत सत्ता स्थापनेचा दावा करू. यात पाच हा आकडा महत्त्वाचा वाटतो. पण लोकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या वेळेबद्दल कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत नाही. मग सत्ता स्थापनेची संधी मिळालीच तर मुख्यमंत्री कोण, हे ठरविण्यासाठी एकमत होईल का? कोकणीमध्ये एक म्हण आहे ‘तिकेट आहा मुकोडे, गाडी वोयतोली खुंयचेकोडे’ अशी तर स्थिती कॉंग्रेसची होणार नाही ना! ∙∙∙

पालिकेमध्ये बदल होणारच!

‘वारे येता तशें सूप धरूंक जाय’ अशी कोकणीत म्हण आहे. विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन होणारच. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश नगरपालिका मंडळांतही बदल होणे अपेक्षित आहे. नवीन आमदार बनल्यानंतर पालिका मंडळात सत्तांतर होणार, हे निश्चित.

कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक, काणकोणचे सायमन रिबेलो, मडगावचे लिंडन परेरा, कुडचडेचे सावंत, एवढेच नव्हे तर सांगे व केप्यातही बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आमदार कोणीही जिंको, सरकार कोणाचेही येवो, नगराध्यक्ष बदलणार हे मात्र निश्चित. ∙

ही फळे आरक्षणाची!

देशातील हजारो विद्यार्थी विदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षण घेण्यास बाध्य आहेत. याला दोन कारणे आहेत. पहिले कारण आपल्याकडील आरक्षण नीती आणि दुसरे महागडे वैद्यकीय शिक्षण. भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत शिक्षण सोडून सर्वच स्वस्तात मिळते. वैद्यकीय शिक्षणाचे तर विचारूच नका.

म्हणूनच आपल्या गोव्यातून प्रतिवर्षी पाचशेच्या वर विद्यार्थी विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतात. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जेवढे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्याच्या तीनपट जास्त विद्यार्थी विदेशात का शिकतात? यावर सरकार, आरक्षण समर्थक व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना विरोध करणारे विचार करतील का?

सोनसोडो आणि बाबा

शुक्रवारी सोनसोड्याला आग लागली आणि काहीजणांनी ‘बाबां’च्या नावे बोटे मोडण्यास सुरवात केली. आता हे बाबा म्हणजे दिगंबर कामत हे सांगण्याची तशी गरज नसावी. वास्तविक सोनसोडो पडतो कुडतरी मतदारसंघात. त्यात कचरा टाकला जातो तो मडगाव आणि फातोर्ड्याचा. येथे जमलेले कचऱ्याचे ढीग कमी करण्यासाठी विजय सरदेसाई यांनी एक तंत्रज्ञान सुचविले आणि त्याला भाजप सरकारातील मंत्र्यांनी ते मान्य करूनही स्थानिक राजकारणामुळे ही यंत्रसामग्री येथे आलीच नाही.

गेल्या 10 वर्षांत गोव्यात मुख्यमंत्री होते मनोहर पर्रीकर आणि डॉ. प्रमोद सावंत. सोनसोडो प्रकल्पाचे काम मुख्यमंत्री अध्यक्ष असलेली उच्चाधिकार समिती पाहाते. जर मागच्या 10 वर्षांत सोनसोडोची समस्या जर सुटली नसेल तर त्याला हे दोन आजी-माजी मुख्यमंत्री जबाबदार नाहीत का? मग बाबांवर रोष का? हा तर ‘आप पाप आणि ते बाबा माथ्यार थाप!’ असला हा प्रकार असल्याची चर्चा मडगावात सुरू आहे.

‘मटका’ पोलिसांच्या हिताचाच!

मटका व्यवसायाला सरकारने कायदेशीर मान्यता देऊच नये, असे लाचखोर पोलिस व राजकारण्यांचे मत असल्याचे प्रत्ययास येते. या व्यवसायामुळे कोणताही महसूल अथवा कर सरकारच्या तिजोरीत जमा होत नसल्याने तो अनधिकृत तथा बेकायदा असल्याचे कायद्याच्या दृष्टिकोनातून मानले जाते. एरवी राज्य सरकारची लॉटरी जर कायदेशीर असेल, तर मटका का बेकायदेशीर, असा सवाल कित्येकजण उपस्थित करत आहेत. मटका जर कायदेशीर झाला तर पोलिसांना मटकेवाल्यांकडून ‘चिरीमिरी’ अर्थात खंडणीच्या माध्यमातून छुप्या मार्गाने पैसा कसा मिळणार, हाच तर मोठा प्रश्न आहे. मटका सध्या बेकायदा असतानाही गोव्यात तो सर्वत्र खुलेआमपणे सुरू आहे.

तसेच पोलिस सोयीस्करपणे डोळेझाक करून मटकेवाल्यांकडून हप्ते गोळा करीत आहेत, ही बाब आता काही दडून राहिलेली नाही. सरकारने आता मटक्याला एक तर कायदेशीर स्वरूप द्यावे; अन्यथा तो कायमचा बंद करावा, अशी मागणी गोव्यातील कित्येक नागरिकांनी केली असल्याच्या पार्श्वभूमीवर मटका व्यवसाय बेकायदा असणे हे पोलिस व राजकारण्यांच्याही हिताचे आहे, अशीच खमंग चर्चा सध्या जनमानसात सुरू आहे.

आयआरबी पोलिसांची फरफट

गोव्यातील आयआरबी पोलिसांची अवस्था म्हणजे ‘बाप घरी घेईना आणि आई जेवू घालीना’ अशी झाली आहे. वास्तविक हे दल गोव्याच्या खास सुरक्षेसाठी निर्माण केले होते; पण त्यांचा वापर सध्या गृहरक्षक दलासारखा कुठल्याही कामासाठी केला जातो. हल्लीच या जवानांना उत्तर प्रदेशात निवडणूक सुरक्षा ड्युटीवर पाठविले गेले.

उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी त्यांना ट्रेनची व्यवस्था न झाल्याने शेवटी कोणत्याही सुविधा नसलेल्या कदंब बसमधून त्यांना 1600 किमीचा प्रवास करावा लागला. ना झोपण्याची व्यवस्था ना पाण्याची व्यवस्था. अशा स्थितीत त्यांना हा प्रवास करावा लागला. त्याची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. शुक्लासाहेब पाहाताय ना त्यांची अवस्था?

पहिला शपथविधी सोहळा कोणाचा?

विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच मतमोजणीचे वेध लागले आहेत. तत्पूर्वीच राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने दोनापावल येथे राजभवन परिसरात भव्य दरबार हॉलचा उदघाटन सोहळा उरकून घेतला आहे. आता सरकार कोणाचेही येवो, नव्याने मंडप घालायला नको, की दाटीवाटीने शपथसोहळा करायला नको, असेच कदाचित साबांखाला वाटले असावे.

या सोहळ्यात मुख्य पाहुण्यांसोबत मुख्यमंत्रिपदाचे बाशिंग बांधून उभे असलेल्या दोघा नेत्यांनाही सन्मानपूर्वक स्थान देण्यात आले होते. अर्थात तो त्यांचा संविधानात्मक अधिकारही होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हजेरी लावत हे व्यासपीठ गाठले आहे. उद्या निवडणुकीचा निकाल कोणाच्याही बाजूने लागो, अगोदरच या दोघांनी या व्यासपीठावर मिरवण्याचा आनंद लुटला आहे.

Michael Lobo
संविधानात्मक पदांचा दर्जा टिकवावा: उपराष्ट्रपती

शिरोड्याचे महादेव दिल्लीत

शिरोडा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार तथा भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधील माजी मंत्री महादेव नाईक सध्या जाम खूष आहेत. कारण यावेळेला शिरोडा मतदारसंघात आपल्यालाच सर्वांत जास्त मतदान झाल्याचा दावा त्यांनी छातीठोकपणे केला आहे. महादेव नाईक यांचे कार्यकर्तेही तेच सांगतात. महादेव नाईक यांच्या मागच्या आमदार, मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली कामे आणि त्यानंतरची कामे यांची तुलना झाल्यामुळेच यावेळेला आम आदमी पक्ष पहिल्यांदाच शिरोडा मतदारसंघात प्रतिनिधित्व करील, असा दावा त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.

महादेव नाईक यांनी ‘आप’चे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नुकतीच भेटही घेतली आहे. काय माहीत...कदाचित येणाऱ्या सरकारमध्ये मंत्री म्हणून महादेव नाईक यांना बडे खातेही मिळू शकेल, असा दावाही ‘आप’चे कार्यकर्ते करू लागले आहेत.

ढवळीकरांचा सत्कार सोहळा

राजभवनवर दरबार हॉल उभारण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मान्यवरांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांचाही समावेश होता. सध्या ते मडकईचे आमदार आहेत. मात्र, अतिमहनीय व्यक्तींसाठीच्या जागेतील त्यांची उपस्थिती डोळ्यांत भरणारी होती.

त्याच सोहळ्यात उपराष्ट्रपतींच्या हस्ते सुदिन ढवळीकरांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहात असलेल्या ढवळीकरांनाही या व्यासपीठावर उपस्थिती दर्शविता आली. त्यामुळे तेही नव्या सरकारमध्ये असतील काय? कारण सरकार कोणाचेही येऊ दे, ढवळीकरांचीही त्यात महत्त्वपूर्ण भूमिका असेल, अशी चर्चा यावेळी रंगली होती.

Michael Lobo
मांडवी नदीकिनारी होर्डिंग्स प्रकरणी महापालिकेला खंडपीठाची नोटीस

बाबूंची ऐटीत एन्ट्री

दोनापावल येथे राजभवन परिसरात दरबार हॉलचा उदघाटन सोहळा झाला. उपराष्ट्रपतींसारख्या अतिमहनीय व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा होत असल्याने उपस्थितांनी प्रमुख पाहुणे हजर होण्यापूर्वी आसनस्थ व्हावे, असा रिवाज आहे.

मात्र, तो कवळेकरांना कसा लागू असेल? शुक्रवारी मुख्य सोहळ्याला सुरवात झाल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदी असलेल्या बाबू कवळेकरांनी अपक्ष निवडणूक लढवलेल्या पत्नी सावित्री कवळेकर यांच्यासोबत दरबार हॉलमध्ये ऐटीत एन्ट्री मारली आणि सर्वांत पुढचे आसन पटकावले. मात्र, रेड कार्पेटवरची बाबू कवळेकरांची ही एन्ट्री उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय बनली होती.

फुकटात मनोरंजन

जसजशी मतमोजणीची तारीख जवळ येत चालली आहे, तसतशी राजकीय नेतेमंडळींची तोंडे भलतीच वाहवत चालली आहेत. एकमेकांवर होत असलेले भलते-सलते आरोप, त्यांना दिली जाणारी प्रत्युत्तरे, एकमेकांची कुलंगडी बाहेर काढण्याचे प्रकार यामुळे आम जनतेची मात्र भरपूर करमणूक होऊ लागली आहे आणि तीही फुकटात. जाणकार म्हणतात त्याप्रमाणे, मतदान व मतमोजणीदरम्यान इतका कालावधी असण्याचा हा परिपाक आहे. असा कालावधी राहिला तर त्यातून घोडेबाजारालाही वाव मिळतो, असा त्यांचा दावा आहे.

Michael Lobo
बैलपार नदीची समस्या पूर्ण गोमंतकीयांची

लोबोंची सारवासारव

कळंगुटचे मायकल लोबो हे एक वेगळ्याच प्रकारचे रसायन आहे. हल्लीच्या त्यांच्या राजकीय हालचाली पाहिल्या तर मनोहर पर्रीकरांवर भाळून ते भाजपमध्ये सामील झाले नव्हते, तर त्यांचा इरादा वेगळाच होता हे स्पष्ट होते. निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले तेसुध्दा वेगळ्याच इराद्याने, असे त्यांना जवळून ओळखणारे म्हणतात. मतमोजणीपूर्वीच त्यांच्याविषयी प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या आणि त्यांना त्याबाबत द्यावे लागणारे स्पष्टीकरण, यातून बरेच काही स्पष्ट होत आहे.

लपवाछपवी कशाला?

‘ताकाला जाताना भांडे लपवणे’ अशी एक म्हण आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सरकार स्थापनेसाठी मगोसोबत केलेल्या चर्चेविषयी कानावर ठेवलेले हात, हे याच सदरात मोडतात. सरकार स्थापनेसाठी जागा कमी पडल्या तर भाजप मगोकडेच प्रथम जाणार आणि मगोवालेही झाले-गेले विसरून हात पुढे करणार, असे सर्वांनाच वाटते. गोव्याचा गेल्या दोन दशकांतील राजकीय इतिहासही हेच सांगतो. मग उभयता नेते त्याबाबत टोलवाटोलवी का करतात? काहीजणांच्या मते मगोला भाजप काय, काँग्रेस काय दोघेही सारखेच. त्यांचा मतलब फक्त वजनदार खात्यांशीच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com