पणजी- राज्य सरकारने म्हापसा व फोंडा हे नवे पोलिस जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय आज घेतला. पर्यटन राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, यासाठी पोलिस दलाकडूनच चार पोलिस जिल्हे असावेत, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निर्णयाची माहिती दिली.
यामुळे राज्यात आता चार जिल्हा पोलिस अधीक्षक असतील. सध्या उत्तर व दक्षिण गोवा पोलिस जिल्हे आहेत. त्यात आणखी दोन पोलिस जिल्ह्याची भर पडली आहे. याआधी पेडण्यातील जनतेला पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी पर्वरी येथे यावे लागायचे, आता त्यांना पोलिस अधीक्षकांची भेट म्हापशातच मिळू शकणार आहे. राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. तेही मोठ्या प्रमाणावर तक्रारी करतात आणि पर्यटकही गुन्हे करतात. या साऱ्या तपासासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते. याशिवाय अनेक अतिमहनीय व्यक्ती गोव्याच्या दौऱ्यावर येत असतात, अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सव राज्यात होत असतात. त्यावेळी त्यांना सुरक्षा पुरवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे याचा मोठा ताण पोलिस दलावर येत असतो. यामुळे आणखीन दोन पोलिस जिल्हे तयार करावेत, असे म्हणणे सरकारकडे मांडण्यात आले होते.
वाढती गुन्हेगारी लक्षात घेता आणखीन दोन पोलिस जिल्ह्यांची गरज होती. पोलिस पूर्वी करत असलेली कामे आणि आता करत असलेली कामे यात मोठा फरक पडला आहे. कामांचा ताण वाढला आहे. गोव्यात इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी लोक येत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर नजर ठेवणे, ते कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणार नाहीत याची काळजी घेणे, अशी कामेही पोलिसांना करावी लागतात. हे सारे करण्यासाठी व्यावसायिक कौशल्यांची गरज असते. छोटा पोलिस जिल्हा असला तर असे कर्तव्य बजावण्यासाठी सुटसुटीतपणा मिळतो. त्यामुळे या दोन पोलिस जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली
आहे.
उत्तर गोवा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा आहे. त्याशिवाय गुन्हे नोंद होण्याचे प्रमाण याच जिल्ह्यात दक्षिण गोवा जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे एका पोलिस अधीक्षकाला तपासात मार्गदर्शन करणे, गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे बंदोबस्त ठेवणे आदी कर्तव्ये बजावताना वेळेची मर्यादा येते. त्यामुळे उत्तर गोवा भौगोलिक जिल्ह्यात आणखीन दोन पोलिस जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सध्या घटनास्थळी भेट देऊ शकत नाहीत. त्याशिवाय मोप येथे आंतरराष्ट्रीय हरीत विमानतळ तयार झाल्यानंतर त्या भागातील हालचाली वाढणार आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलिस जिल्ह्याची गरज आहे, असे पोलिस दलाचे म्हणणे आहे.
सध्या उत्तर गोव्यात म्हापसा, पणजी, पर्वरी आणि डिचोली असे पोलिस उपविभाग आहेत. पोलिस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी या उपविभागांचे नेतृत्व करतो. या साऱ्यांचे मुख्यालय पर्वरी येथे आहे. ते मध्यवर्ती नसल्याने पेडणे व डिचोलीतील जनतेला पोलिस अधीक्षकांना कामानिमित्त भेटण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. म्हापसा या नव्या पोलिस जिल्ह्याच्या निर्मितीनंतर त्यांना पोलिस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी केवळ म्हापशापर्यंतच प्रवास करावा लागणार आहे आणि म्हापशापर्यंत डिचोली व पेडण्यातून थेट बससेवा आहे. दक्षिण गोव्याचा आकारही मोठा असल्याने तेथेही अशीच समस्या असल्याने फोंडा पोलिस जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर ग्रामीण भागात घटनास्थळी भेट देणे पोलिस अधीक्षकांना शक्य होणार
आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.