
साखळी: गोव्यामध्ये आता खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सरकारकडून मोठी सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी (२८ जून) साखळी येथे 'म्हजी बस' सेवेच्या उद्घाटनप्रसंगी घोषणा केली की, खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना सर्व बसेसमध्ये ५० टक्के प्रवास सवलत दिली जाईल.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी 'म्हजी बस' या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, 'म्हजी बस' म्हणजे 'स्वतःची बस'. प्रत्येक प्रवाशाला ही बस आपली वाटावी, या उद्देशानेच हे नाव ठेवण्यात आले आहे. गोव्यातील प्रत्येक प्रवाशाला वाहतुकीच्या सर्व संधींचा लाभ मिळावा आणि राज्यात एक 'परिवहन क्रांती' घडावी, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
गेल्या वर्षभरात 'म्हजी बस' सेवेमुळे अनेक बस मालकांना फायदा झाला आहे. भविष्यातही नवीन बसचालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आणि या सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक बस मालकाला अडीज लाखांपर्यंत फायदा नक्कीच होईल असे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली. ज्या भागांमध्ये दोन खासगी बसेसच्या वेळेत कदंबा बसची वेळ येत असेल, तिथे 'म्हजी बस' चालकांना अधिक फायदा मिळावा यासाठी कदंबा बससेवा मागे घेण्यात येईल.
यासोबतच, सरकारकडून लवकरच कार्ड सिस्टिम देखील राबवण्यात येणार आहे. या प्रणालीनुसार, कोणताही प्रवासी एक हजार रुपये भरून तब्बल तीन महिन्यांसाठी कोणत्याही बसमध्ये प्रवास करू शकेल. काही बसचालक विद्यार्थ्यांना अर्ध्या तिकिटामुळे प्रवास नाकारतात, परंतु त्यांनी असे करू नये. त्या बदल्यात सरकार दर आठ दिवसांनी त्यांच्या खात्यात पैसे जमा करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 'गोवा ऑन गो' या ॲपच्या साहाय्याने प्रवाशांची संख्या वाढवण्याचेही उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
या घोषणांमुळे गोव्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत, ज्यामुळे प्रवाशांना आणि बसचालकांनाही फायदा होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.