
पणजी: देशातील विविध राज्यांमध्ये वाहतूक सेवा देत असलेल्या ओला, उबरसह इतर ॲप ॲग्रीगेटरमध्ये सेवेत असलेल्या चालकांची मानसिक चाचणी करण्याचा जो प्रस्ताव केंद्र सरकारने राज्य सरकारांसमोर ठेवला आहे, त्याचे रस्तासुरक्षा चळवळीत कार्यरत अनंत अग्नी, संजीव सरदेसाई यांनी स्वागत केले आहे. या चालकांच्या मानसिक आरोग्याची चाचणी झालीच पाहिजे, असे मत त्यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.
ओला, उबर यांसह ॲपवर देशभरात सुरू असलेल्या टॅक्सीचालकांकडून महिला, पर्यटकांशी गैरवर्तन करण्याच्या घटना याआधी विविध राज्यांमध्ये घडल्या आहेत. अशा घटनांची पुढील काळात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अशा सेवांमध्ये कार्यरत चालकांची मानसिक चाचणी करण्यात यावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारने सर्व राज्यांसमोर ठेवला आहे.
यासंदर्भात ‘मार्ग’चे सदस्य सचिव अनंत अग्नी म्हणाले, अपघात किंवा चालकांकडून जे प्रकार घडत आहेत, त्यास आळा घालण्यासाठी केवळ कॅब चालकांचीच नव्हे, तर वाहन चालवण्याचा परवाना देत असताना प्रत्येकाचीच मानसिक चाचणी व्हावी.
गोवा रस्तेसुरक्षा फोरमचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी मात्र केंद्राच्या प्रस्तावाबाबत काहीशी निराशा व्यक्त केली. परवाना देताना कॅब किंवा इतर वाहनचालकांची एकदाच मानसिक चाचणी केली जाईल. अशा प्रकारे त्यांची वारंवार चाचणी घेणे शक्य नाही. या मधल्या काळात कॅब किंवा इतर वाहनचालकांची मानसिक स्थिती परवाना घेताना असेल तशीच राहील हे सांगता येत नाही, असेही नाईक यांनी नमूद केले.
रस्ते वाहतूक सुरक्षेसंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेले संजीव सरदेसाई यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. राज्यात सध्या रस्तेअपघातांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय गोवा पर्यटनस्थळ असल्यामुळे कॅबचालकांकडून भविष्यात वाईट कृत्ये घडू शकतात. त्यावर मात करण्यासाठी अशा चालकांच्या मानसिक आरोग्याची चाचणी झालीच पाहिजे, असेही सरदेसाई यांनी नमूद केले.
कॅबचालकांच्या मानसिक चाचणीचा प्रस्ताव केंद्र सरकारने गोव्यासह सर्व राज्यांना सादर केला आहे. परंतु, तो अनिवार्य करण्यात आलेला नाही. त्याबाबत राज्यांना स्वत: निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे वाहतूक संचालक परिमल अभिषेक यांनी स्पष्ट केले. गोव्यात कॅबचालकांमध्ये स्थानिक तसेच परप्रांतीय चालकांचाही समावेश आहे. त्यांना सार्वजनिक सेवा बॅच देताना (पीएसबी) त्यांच्या मानसिक आरोग्याची चाचणी केली जाते, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.