

डिचोली: कारापूर येथील ‘वन गोवा’ या मेगा निवासी प्रकल्पाकडून ४१ लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून कारापूर येथील दोघांना महाराष्ट्र पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. सिद्धेश जना तारी आणि प्रीतेश साळगावकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लोढा कंपनीचे लायझनिंगचे काम करणाऱ्या भूषण रमेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून ठाणे-मुंबई येथील पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईवर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे.
कारापूर-सर्वण येथील प्रकल्पाविषयी कथित खंडणी मागणाऱ्या आंदोलकांना मुंबईतील पोलिस येऊन गोव्यातून घेऊन जातात, त्याबाबत काँग्रेस-आपने आता सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याप्रकरणी राज्य सरकारवर टीका केली. कोण मुंबईत जाऊन तक्रार दाखल करतो आणि त्याप्रकरणी तेथील पोलिस गोव्यात येऊन काहीजणांना ताब्यात घेतात. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील पोलिसांना याबाबत खरोखरच सतर्क केले होते काय, असा सवालही त्यांनी केला.
ते म्हणाले की, येथील काही आंदोलकांना मुंबई पोलिसांनी बळजबरीने नेले आणि नंतर त्यांना महाराष्ट्रातील दोडामार्ग येथे अटक केल्याचे दाखवले. ‘ट्रान्झिट अरेस्ट’शी (एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेऊन केलेली अटक) संबंधित कायदेशीर सुरक्षा उपायांना बगल देण्यासाठी हे कृत्य केले गेले असेल, तर या परिस्थितीची तातडीने आणि पारदर्शकपणे चौकशी होणे आवश्यक आहे.
“आम्ही राज्य सरकारकडे उत्तरे मागत आहोत. या कारवाईची माहिती गोवा सरकार आणि गोवा पोलिसांना होती का? असल्यास, ती करण्यास कोणी अधिकृत परवानगी दिली किंवा त्यात कोणी मदत केली?” येथील आंदोलन आता जवळपास १५० दिवसांच्या टप्प्यावर पोहोचले आहे. आपल्या जमिनीसाठी लढा देणाऱ्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करणे याऐवजी, आंदोलकांना धमकावण्याचे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोकांना बाहेर पडण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत का, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, कारापूरमधील आंदोलकांना ताब्यात घेऊन अटकेसाठी मुंबईला नेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, गोवा राज्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाले आहे का, असा सवाल आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी उपस्थित केला. या कारवाईत कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. यात गोवा पोलिसांचा सहभाग नव्हता किंवा आंदोलकांना राज्याच्या सीमा ओलांडून नेण्यापूर्वी त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर (मॅजिस्ट्रेट) हजरही करण्यात आले नसल्याचे ते म्हणाले.
खंडणी प्रकरणामुळे खळबळ
मेगा निवासी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या कारापूरवासीयांच्या आंदोलनाशी अटक केलेल्या संशयितांचा संबंध आहे. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या कारापूरवासीयांमध्ये खळबळ माजली आहे.
ही अटक बेकायदा आहे, असा दावा प्रीतेशचे काका संतोष साळगावकर यांनी केला आहे. या प्रकल्पाविरोधातील आंदोलन दडपून टाकण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा आंदोलनकर्त्या मंजिता चांदेलकर यांनी केला आहे. दोघांना अटक केली म्हणून आंदोलनावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सिद्धेश तारी आणि प्रीतेश साळगावकर यांनी कारापूर येथील ‘वन गोवा’ या प्रकल्पस्थळी येऊन शिवीगाळ करून तसेच धमकावून सहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सहा कोटी रुपये दिल्यास प्रकल्प पूर्णत्वास येईल.
अन्यथा प्रकल्प पूर्ण होऊ देणार नाही, अशी धमकीही या दोघांनी दिली होती. त्यानंतर मे महिन्यापासून आतापर्यंत मिळून दोघांनी हप्त्या-हप्त्याने ४१ लाख रुपये खंडणी उकळली आहे. यातील ३४ लाख सिद्धेशने तर ७ लाख प्रीतेशने घेतल्याची तक्रार भूषण पाटील यांनी २७ ऑगस्ट रोजी ठाणे-मुंबई पोलिसांत केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.