गोमेकॉमधील मेडिसीन, न्‍यूरॉलॉजी विभाग फुल्ल

अचानक रुग्ण वाढले : खाटा अपुऱ्या पडल्याने रुग्णांची व्यवस्था जमिनीवर
GMC
GMC Dainik Gomantak

पणजी : गोमेकॉच्‍या मेडिसीन आणि न्‍युरॉलॉजी विभागातील सर्वच खाटा आज अचानक भरल्‍याने काही रुग्‍णांना अक्षरश: जमिनीवर गादी टाकून झोपवण्याची वेळ प्रशासनावर आली. कोविड महामारीनंतर गोमेकॉमध्ये अचानक रुग्णांची संख्या वाढल्यामुळे तेथील व्यवस्थापनही गोंधळले आहे. (Medicine and urology departments of GMC full with patients in Goa)

GMC
खनिजपट्ट्यात दररोज मिळायचे किमान 40 श्‍‍वसनरोगांचे रुग्‍ण

गुरुवारी या दोन्ही विभागांतील खाटा पूर्ण भरल्‍याने तसेच रिकाम्‍या जागेवर टाकलेल्या खाटाही पूर्ण भरल्‍याने रुग्‍णांसाठी जमिनीवर गाद्या टाकल्याचे चित्र दिसून आले. गोमेकॉतील मेडिसीन विभाग क्रमांक 139 आणि न्‍युरॉलॉजी विभाग क्रमांक 142 मध्ये 30 खाटांची नियमित व्‍यवस्‍था आहे. रुग्‍णालयात दाखल झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अचानक वाढल्‍यामुळे या दोन्‍ही विभागांतील डॉक्‍टर्स, परिचारिका यांना ये-जा करण्यासाठी असलेल्‍या कॉरिडॉरमध्येही अतिरिक्‍त खाटा टाकण्यात आल्‍याचे दिसून आले. आता येथे नव्‍याने दाखल होणाऱ्या रुग्‍णांना खाटाच शिल्लक नाहीत.

...म्हणून रुग्णसंख्या वाढली : डीन डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले, कोविड काळात बरेच रुग्ण इस्पितळात दाखल व्हायचे टाळत. त्यातील अनेकांनी उच्च रक्तदाबाचे औषधही घेणे टाळले होते. ते आता एकदमच गोमेकॉत दाखल झाले असल्याने रुग्णसंख्या वाढली आहे.

रुग्णांवर एकत्रितपणे उपचार : ठरावीक आजारांच्या रुग्‍णांना अन्‍य विभागांत ठेवता येत नाही. त्यामुळे काहीवेळा रुग्‍णांना जमिनीवर गादी टाकून त्‍यांच्‍यावर उपचार केले जातात, अशी माहिती येथील डॉक्‍टरांनी दिली.

मेडिसीन विभागातील नियमित 30 खाटा भरल्‍याने 7 खाटा अतिरिक्‍त ठेवल्या आहेत. त्याही भरल्‍याने या विभागात 3 रुग्‍णांना जमिनीवर झोपवण्यात आल्‍याचे चित्र आज, गुरुवारी दिसून आले. तर न्‍यूरॉलॉजी विभागात 6 खाटा अतिरिक्‍त असून येथे सध्या एका रुग्‍णाला जमिनीवर झोपवण्यात आले आहे. या ठिकाणी पुरेशी जागा आहे. तसेच पुरेशा खाटाही आहेत. मात्र, काहीवेळा रुग्‍णांची संख्या वाढते.

GMC
चार्ज न झालेली कदंब बस सोडल्याने प्रवासी अर्ध्या रस्त्यात अडकले

रुग्‍णांना आम्‍ही मुद्दाम जमिनीवर झोपवत नाही. तसेच दवाखान्‍यात राहून उपचाराची गरज असलेल्‍या रुग्‍णांना आम्‍ही परत पाठवू शकत नाही. यामुळे जमिनीवर झोपवून का असेना; पण त्‍यांच्‍यावर योग्‍य उपचार व्‍हावेत यासाठी त्‍यांना दाखल करून घेतले जाते, अशी माहिती येथील परिचारिकांनी दिली. आमच्‍या विभागात दाखल होणाऱ्या सर्व रुग्‍णांची सर्वतोपरी काळजी घेतो. तसेच त्‍यांच्‍यावर आवश्‍यक ते सर्व उपचार केले जातात, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

19 वर्षीय तरुणीला अर्धांगवायूचा झटका : दुर्मिळ प्रकाराने डॉक्टरही थक्क

गुरुवारी 19 वर्षीय तरुणीला अर्धांगवायूचा झटका आल्याने गोमेकॉत दाखल केल्यामुळे डॉक्टर वर्गातही काहीशी बेचैनी पाहायला मिळाली. इतक्या तरुण वयात तोही महिलेला अर्धांगवायूचा झटका येणे, ही विरळ घटना मानली जाते. रक्तामध्ये गुठळ्या झाल्यामुळे अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. त्याला ट्रोबॅसीस असेही म्हटले जाते. तरुण वयात अर्धांगवायूचा झटका कसा येऊ शकतो, या विषयावर सध्या डॉक्टरांमध्ये चर्चा सुरू आहे. गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे रक्त दाट होते. त्यामुळे अशी घटना घडू शकते. सध्या उपचार घेणारी मुलगी अविवाहित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com