Mayem Panchayat Intensifies Protest Against Vedanta ltd illegal constructions
डिचोली: बेकायदा बांधकामाच्या मुद्यावरून मये-वायंगिणी पंचायत आणि ‘वेदांता’ कंपनी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.
डिचोली खाण ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या ‘वेदांता’ खाणीवरील बेकायदा बांधकामे पाडावीत, या मये पंचायतीच्या आदेशाला अनुसरून ‘वेदांता’ने उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे. तर दुसऱ्या बाजूने या मुद्यावरून मये पंचायतीने ‘वेदांता’ विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मये पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ‘वेदांता’च्या (पूर्वाश्रमीची धेंपे) खाणीवरील एनएसपी प्लांटवर कंपनीने पंचायतीकडून कोणतीही ‘एनओसी’ न घेता वजनकाटा आदी काही बांधकामे बेकायदेशीरपणे केली आहेत, असा पंचायतीचा दावा आहे.
सदर बेकायदेशीर बांधकामे पाडावीत, अशी नोटीस वजा आदेश पंचायतीने ‘वेदांता’ला दिला आहे. या आदेशाच्या विरोधात कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेऊन पंचायतीच्या आदेशाला स्थगिती मिळवली आहे.
कंपनीकडून ''स्थगिती'' आदेश हाती पडताच आज (सोमवारी) दुपारी मये-वायांगिणी पंचायत मंडळाची एक तातडीची बैठक झाली. या बैठकीत वेदांता कंपनीच्या भुमिकेबद्धल पंचायत मंडळाने नाराजी व्यक्त केली. बैठक आटोपताच, सरपंच सीमा आरोंदेकर आणि पंचायत सचिव महादेव नाईक यांच्यासह पंचायत मंडळाने खाणीवर धडक दिली. खाणीवरील बेकायदा बांधकामांची पंचायत मंडळाने पाहणी केली. नंतर संतोष मांद्रेकर आदी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र या अधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे बोट दाखविल्याची माहिती मिळाली आहे.
मये पंचायतीच्या आदेशाला वेदांता कंपनीने मिळवलेल्या ''स्थगिती''ची मुदत येत्या ९ डिसेंबर अशी आहे. पुढील निर्णय होईपर्यंत खाणीवरील कामकाज बंद ठेवा, अशी सूचना सरपंच सीमा आरोंदेकर आणि अन्य पंचसदस्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. याप्रकरणी कंपनीला पंचायतीकडून नोटीस पाठविण्यात येणार आहे, असे सरपंच आरोंदेकर यांनी सांगितले. खाणीवर धडक दिलेल्यांमध्ये दिलीप शेट, विद्यानंद कारबोटकर, वासुदेव गावकर, कृष्णा चोडणकर, विशांत पेडणेकर, सुवर्णा चोडणकर, वर्षा गडेकर आदी पंचसदस्यांसह माजी सरपंच विजय पोळे यांचा समावेश होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.