
मये: पावसाळ्यात पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला मयेचा तलाव (Mayem Lake) आता १ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला होणार आहे. मंगळवार (दि.१४) रोजी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी तलावाच्या परिसराची पाहणी केली. एकेकाळी गोव्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेला हा तलाव गेल्या काही दिवसांपासून मात्र गंभीर दुर्लक्ष आणि दुरवस्थेचा सामना करत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली होती.
कायम पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात केवळ समुद्र किनारेच नाही तर आणखीनही प्रेक्षणीय ठिकाणं आहेत, पैकी एक म्हणजे मयेचा तलाव. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक रहिवाशांचे म्हणणे होते की, पूर्वी हा तलाव प्रत्येकाने भेट देण्यासारखे ठिकाण होते, पण आता चुकून भेट देणाऱ्या कोणत्याही पर्यटकाला निराशाच पदरी पडते.
सध्याची दुर्लक्षित अवस्था अशीच कायम राहिल्यास, हा तलाव लवकरच इतिहासात जमा होईल, असा इशाराही रहिवाशांनी दिला होता, मात्र आता पुन्हा एकदा तलाव सर्वांसाठी खुला होणार यामुळे मयेवासियांना आनंद झाला आहे.
मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्पष्ट केले की, गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC) या स्थळाला योग्य ते सहकार्य किंवा देखभाल पुरवण्यात अयशस्वी ठरले आहेत. एकेकाळी प्रसिद्ध असलेले हे तलाव सरकारच्या अनास्थेमुळे पूर्णपणे दुर्लक्षित झाले आणि पर्यटन नकाशावरून जवळजवळ हटवले गेले.
या तलावाला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी मार्च २०१५ मध्ये नूतनीकरण प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती, ज्यामुळे स्थानिकांमध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र, दोन वर्षांनंतरही काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.
मये तलाव पुन्हा एकदा गोव्याच्या पर्यटन नकाशावर प्रमुख स्थान मिळवण्यासाठी आणि आपली पूर्वीची ओळख प्राप्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने व प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याच्या चर्चा होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.