Goa Congress : गोव्यात नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ते लवकरच भ्रष्ट आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याखाली काँक्रीट जंगल मंत्री होणार असल्याचा टोला काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी लगावला.
काणकोण येथील एका सॉ मिलमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोडीतील लाकडाची कापणी झाल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना पाटकर म्हणाले, "गोमंतकीयांनी या पर्यावरण विरोधी भ्रष्ट भाजप सरकारच्या विरोधात उठाव करण्याची वेळ आली आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी वनक्षेत्रातील भीषण आगीबाबत मौन बाळगले आहे."
"भाजप सरकार गोव्यात आग माफियांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आम्ही केला होता. आता हे सरकार वृक्ष संहारक माफियांनाही प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट झाले आहे," असे अमित पाटकर म्हणाले.
सत्तरीतील निष्पाप लोकांचे संरक्षण कवच घेत वनमंत्री विश्वजित राणे आता रिअल इस्टेट माफियांना सत्तरी आणि गोव्याच्या इतर अंतर्गत भागांत घुसण्यासाठी वाट तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काणकोणची घटना त्याच कारस्थानाचा भाग असण्याची शक्यता आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला आहे.
वनमंत्री विश्वजित राणे यांनी "बोले तैसा चाले" या म्हणीनूसार सर्व जळलेल्या वनजमिनी तातडीने ‘नो डेव्हलपमेंट झोन’ म्हणून घोषित करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.