
Fish sale on road Instead Of Baina market
वास्को: बायणा येथे रस्त्यालगत मासे विक्री करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या मासळी विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याऐवजी मुरगाव पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज त्या विक्रेत्यांना विनंती करून तेथून हुसकावून लावले खरे.
मात्र, अतिक्रमणविरोधी पथकाची पाठ फिरताच गेले त्या महिलांनी रस्त्यालगत पुन्हा मासे विक्री सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बायणा येथे मासे मार्केट आहे. मात्र, तेथे मासे विक्री न करता बायणातील तीन गाडे तिठ्यावर काही महिला रस्त्यालगतच अतिक्रमण करून मासे विक्री करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्या महिलांना तेथून हटवून मासे मार्केटात न्यावे, असे निवेदने तेथील रहिवाशांनी दिले होते. मात्र, प्रत्येकवेळी निवेदन दिल्यानंतर मुरगाव पालिका वरवरची कारवाई करते. त्यानंतर पुन्हा त्या महिला तेथे नजरेस पडतात.
मुरगाव पालिकेने असे खेळ करून स्वत:चे हसे करून घेण्यापेक्षा त्या विक्रेत्यांना तेथे रितसर मासे विक्री करण्यासाठी परवानगी द्यावी आणि त्यांच्याकडून सोपो किंवा इतर कर घ्यावेत, जेणेकरून मुरगाव पालिकेच्या महसूल वाढीस हातभार लागेल, अशा प्रतिक्रिया या प्रकारानंतर उमटत आहेत.
मुरगाव पालिकेने अतिक्रमणकर्त्यांविरोधात कारवाई करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. हे पथक शुक्रवारी (ता. २०) सकाळी बायणा येथे आले. त्या पथकाला पाहिल्यावर मासेविक्रेत्यांनी सावकाश आपल्या टोपल्या उचलल्या आणि काही अंतरावर गेल्या. तेथे असलेल्या दोघीजणींना पथकातील एकाने काहीतरी सांगितले. त्यानंतर पथक वाहनासकट निघून गेल्यावर त्या महिलांनी पुन्हा रस्त्यालगत बसून मासे विक्री सुरू केली.
या मासळी विक्रेत्यांना हुसकावून लावण्याचे बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र, या महिलांनी मुरगाव पालिकेसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे मुरगाव पालिकेनेही त्यांच्यासमोर हात टेकल्याचे स्पष्ट होत आहे. त्या महिलांना कोणाचा वरदहस्त आहे, हे समजण्यास मार्ग नाही. गॉडफादरच्या वरदहस्तामुळेच त्यांच्यावर कडक कारवाई होत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.