
गोव्यात ‘ताजे’ म्हणून विकले जाणारे मासळीचे बहुतांश उत्पादन ताजे (किंवा स्थानिक) अजिबात नसते असे सागर संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणारे डॉ. अॅरन सावियो लोबो यांचे मत आहे. तसेच गोमंतकियांनी त्यांच्या आवडीच्या 'फिशकरी-राईस'मधील पौष्टिकत्व वाढवण्यासाठी तांबसो, चणक किंवा इसवण या माशांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे असेही ते सांगतात.
गोवा म्युझियमच्या 'मोग संडेज' या कार्यक्रमात, 'इट्स रेनिंग फीश- आलेलुया' या विषयावर बोलताना गोव्याच्या समुद्रात अतिरिक्त प्रमाणात मासेमारी केल्यामुळे होणाऱ्या परिणामांवर त्यांनी प्रकाश टाकला. 'गोव्याच्या समुद्रात मासे मिळण्याचे प्रमाण खूप घटते आहे.
समुद्रात किती प्रमाणात मासे आहे हे देखील आम्हाला ठाऊक नाही. गोव्याच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींच्या संख्येवर मर्यादा घालण्याची वेळ आली आहे' असे त्यांचे म्हणणे होते.
पावसाळ्यात गोव्यात मासेमारी बंदी असताना मडगाव मधील घाऊक मासळी बाजारात सौंदाळे, चणक आणि इसवण या माशांच्या लोकप्रिय प्रजाती मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. लोबो यांनी त्यामागचे रहस्य उलगडताना सांगितले की या माशांची शेती इतर राज्यांमध्ये केली जाते आणि ते गोव्यात पुरवले जातात.
लब्धप्रतिष्ठता, बाजारातील माशांचा एकजिनसीपणा, पर्यटन उद्योगामुळे वाढलेली मागणी यामुळे गोमंतकीयांच्या आहारातील मत्स्यविविधतेचा ऱ्हास झाला आहे.
कृत्रिम पाण्यात उत्पादन होणारे माशांचे वाण, माशांच्या अनेक पौष्टिक प्रजातीचा पर्याय बनत चालले आहे. लोबो म्हणतात, 'काही मासे दिसायला विचित्र असतात परंतु लाल बाळे (रेड ईल) यासारखे माणसे स्वादिष्ट आणि आरोग्यदायक असतात.
त्यातून 'आंबट-तिख' सारखा चविष्ट पदार्थ बनू शकतो.' भारत हा मत्स्य उत्पादन करणारा जागतिक स्तरावरील तिसरा मोठा उत्पादक देश असला तरी नैसर्गिक मत्स्य उत्पादनात तो सहाव्या क्रमांकावर आहे. माशांच्या शेतीमधून उत्पादित होणाऱ्या माशांपेक्षा नैसर्गिक पाण्यातून मिळणारे मासे पौष्टिकत्त्वाच्या बाबतीत अधिक श्रेष्ठ आहेत. सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा- 3 सारख्या आवश्यक पोषक घटकांनी हे मासे समृद्ध असतात.
लोबो यांनी आपल्या व्याख्यानात पावसाळ्याच्या काळातील किनारपट्टीवरील परिसंस्थेची समृद्ध उत्पादक वैशिष्ट्येही उलगडून सांगितली. पौष्टिक घटकांनी समृद्ध बनलेल्या खाड्या विविध सागरी जीवांसाठी जन्मस्थान बनतात. तिथला गाळ आणि खारफुटी माशांच्या प्रजननासाठी महत्त्वाच्या असतात. गोव्यातील शापोरा नदीचे मुख ही तर अशा जीवांची वाटिका आहे.
पारंपारिकपणे पावसाळ्यात मासेमारी बंदी असताना गोव्यातील लोक खारवलेल्या माशांवर अवलंबून असत मात्र आज मासळीचा बाजार, आयात केलेल्या किंवा शेतीमधून उत्पादित झालेल्या माशांनी भरलेला असतो.
पंगासिअस, रूपचंद किंवा नॉनव्हेजियन ॲटलांटिक साल्मोन (रावस) या गोव्याच्या पर्यावरणापासून दूर असलेल्या प्रजाती बाजारात दिसतात.
डॉ. लोबो यांनी आपल्या व्याख्यानात सागरी अन्नाच्या साक्षरतेचे महत्व सांगताना ताजे मासे कसे ओळखावे यासंबंधी सूचनाही दिल्या. माशांचे श्वसनेंद्रिय (गील) लालभडक असणे किंवा डोळे तजेलेदार असणे या मासा ताजा आहे की नाही हे तपासण्याच्या खुणा असल्या तरी माशांचा गंध हा सर्वात विश्वासार्ह सुचक असतो. माशांच्या संबंधाने मुलांना ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी पालकांनी त्यांना मासेमारी शिकवावी व मत्स्य पर्यावरणाशी त्यांना जोडून घ्यावे असेही त्यांनी सुचवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.