Goa Politics: सभापती तवडकर आणि मंत्री गावडे संघर्ष शिगेला; आरोप-प्रत्यारोप सुरूच

Goa Politics: मुख्‍यमंत्री सावंत घेणार वादाची दखल
Govind Gaude & Ramesh Tawadakar
Govind Gaude & Ramesh Tawadakar Dainik Gomantak

Goa Politics

भाजप सरकारमधील दोन मोठे नेते सभापती रमेश तवडकर आणि कला-संस्‍कृती मंत्री गोविंद गावडे यांच्‍यात जो जाहीर संघर्ष सुरू आहे, त्‍याचे पडसाद आता पक्षावर पडण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या संघर्षामुळे पक्षशिस्‍तीला तडे जाऊ लागले आहेत.

त्‍यामुळेच आता या वादात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्‍वत: हस्‍तक्षेप करतील, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे हेसुद्धा या दोन्‍ही नेत्‍यांशी बोलणी करून त्‍यांना सबुरीचा सल्‍ला देणार आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्‍यास आता केवळ एक आठवडा बाकी असताना तवडकर आणि गावडे यांच्‍यातील संघर्ष उफाळून आला आहे.

तवडकर आणि गावडे यांच्‍यात पूर्वीपासूनच छत्तीसचा आकडा आहे. या दोन्‍ही नेत्‍यांमधील संघर्षामुळे ‘उटा’ संघटनेतही दोन गट पडले आहेत. याचा परिणाम आता भाजप व या पक्षाच्‍या कामकाजावर होण्‍याची शक्‍यता दिसू लागली आहे. त्‍यामुळे मुख्‍यमंत्री सावंत स्‍वत: याप्रश्‍‍नी लक्ष घालणार आहेत.

अशी पडली वादाची ठिणगी

१ काही दिवसांपूर्वी रमेश तवडकर यांनी आपल्‍या ‘श्रमधाम’ योजनेचा शुभारंभ गोविंद गावडे यांच्‍या प्रियोळ मतदारसंघात केला होता. प्रियोळचे आमदार असूनही त्‍यावेळी गावडे यांना आमंत्रण न देता त्‍यांचे प्रतिस्‍पर्धी मगोचे दीपक ढवळीकर यांना मानाचे स्‍थान देण्‍यात आले होते. त्‍यामुळे गावडे यांनी तीव्र संताप व्‍यक्‍त करताना, हे असले प्रकार मुख्‍यमंत्री सावंत कसे खपवून घेतात? असा सवाल केला होता. सावंत यांच्‍या जागी मनोहर पर्रीकर हे असते तर त्‍यांनी असे प्रकार कधीच खपवून घेतले नसते, असेही ते म्‍हणाले होते.

२ त्‍यानंतर फोंडा येथे झालेल्‍या ‘प्रेरणा दिवस’ कार्यक्रमात बोलताना मंत्री गोविंद गावडे यांनी, भाजप सरकारने एसटीच्‍या मागण्‍या पूर्ण केल्‍या नाहीत असा जाहीर आरोप केला होता. आदिवासी समाजातील लोकांचा आतापर्यंत फक्‍त राजकारण आणि मतांसाठी वापर केला गेला, असेही ते म्‍हणाले होते.

३ ‘मंत्रिपद मिळाल्‍यास आपण ते स्‍वीकारू, असे वक्‍तव्‍य रमेश तवडकर यांनी केले होते. त्‍यामुळे गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून डच्‍चू देण्‍यात येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. साहजिकच या आगीत आणखी तेल ओतले गेले. त्‍यामुळे गावडे यांचा जळफळाट झाला आहे.

प्रशासनातील ढिलेपणा मान्‍य नाही

कुणाला कसले राजकारण करावयाचे आहे, हे मला माहीत नाही. पण मी लोकांच्या भल्याचा सातत्याने विचार करत आलोय. आज एवढी वर्षे झाली तरी आदिवासी समाज चाचपडतोय. सरकारनेच या समाजाला योग्य मार्ग दाखवायला हवा. पण प्रशासनातील ढिलेपणामुळे आदिवासी समाजातील लोकांची कामे अडून राहत आहेत. हे मला मान्य नाही आणि त्यामुळेच मी माझा उद्रेक जाहीरपणे व्यक्त केलाय.

मला वादात पडायचे नाही : गणेश गावकर

भाजप सरकारमध्‍ये असलेले अन्‍य एक एसटी नेते तथा सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मला या वादात पडायचे नाही. कोणत्‍या मागण्‍या पूर्ण झाल्‍या आणि कोणत्‍या झाल्‍या नाहीत याचा आधी अभ्‍यास करणे आवश्‍‍यक आहे.

काही मागण्‍या पूर्ण व्‍हायच्‍या असतील तर त्‍याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे आहे. दरम्यान, भाजप सरकारला पाठिंबा देणारे कुठ्ठाळीचे अपक्ष एसटी आमदार आंतोन वाझ यांच्‍याशी संपर्क साधला असता, त्‍यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

Govind Gaude & Ramesh Tawadakar
Chinese lantern festival In Goa: गोव्यातील चायनीज ग्लोफेस्ट-द लँटर्न फेस्टिव्हलवरुन वाद का होतोय?

दिल्लीहून परतल्‍यावर आजच पक्षाच्या कामकाजास सुरूवात केली आहे. सभापती रमेश तवडकर व मंत्री गोविंद गावडे यांच्याशी बोलून, काही वाद असल्यास मिटवण्यात येईल. अद्याप त्यांच्याशी बोललेलो नाही.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

२४ योजना मार्गी

आदिवासी कल्‍याण खात्‍याचा मंत्री असताना मी २४ योजना मार्गी लावल्‍या. या सर्व योजना अजूनही सुरू आहेत. जर आणखी काही योजना सुरू करावयाच्‍या असतील तर मंत्री गावडे यांनी मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करावी, असा सल्ला सभापती रमेश तवडकर यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com