Margao News : नदी दूषित करणाऱ्या २८७ जणांना नोटिसा; मडगाव पालिका सक्त

Margao News : सांडपाणी जोडणी न घेतल्यास दंड, पाणीपुरवठाही तोडण्याचा इशारा
Margao Corporation
Margao Corporation Dainik Gomantak

Margao News :

मडगाव, येथील साळ नदीत प्रक्रिया न करता सांडपाणी गटाराच्‍या माध्‍यमांतून थेट सोडल्‍याने नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे.

उघड्या गटारातून सांडपाणी सोडणारे २८७ व्‍यावसायिक तसेच घरमालकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. गटारातून सोडणारे पाणी थांबविले नाही तर कठोर कारवाई करण्‍याचा इशारा दिला आहे.

आज पालिका, सार्वजनिक बांधकाम खाते आणि मलनिस्‍सारण महामंडळाच्‍या अधिकाऱ्यांची संयुक्‍त बैठक होऊन त्‍यात कारवाईची रूपरेषा ठरविण्‍यात आली.

Margao Corporation
Pernem Goa: मोबाईल घरीच ठेवला, कार घेऊन गेला अन् परतलाच नाही; दोन दिवसांनी नदीत सापडला मृतदेह

गटार किंवा नाल्यात सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद पालिका कायद्यात आहे. त्यामुळे सांडपाणी वाहिन्या असलेल्या भागातील लोकांनी जोडणी घेण्यासाठी अर्ज करावेत. सोय असूनही सांडपाणी उघड्यावर सोडल्याचे आढळल्यास पहिल्या तीन महिन्यांसाठी पाणी बिलात २५ टक्के जास्त रक्कम दंड म्हणून आकारली जाईल. त्यानंतर ५० टक्के दंड ठोठावण्यात येईल. तरीही जोडणी न घेतल्यास संबंधितांचे पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. दरम्यान, सांडपाणी गटारात सोडलेल्या २८७ व्‍यावसायिक तसेच घरमालकांना नोटीस बजावून याबाबत माहिती दिली आहे, असे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी सांगितले.

पालिका क्षेत्रातील सांडपाण्यामुळे पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत, याप्रकरणी आंतानिओ अल्वारिस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याची दखल घेत उपाययोजना करण्यासाठी सांडपाणी साधनसुविधा विकास महामंडळाचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रतिनिधी, पालिका स्वच्छता निरीक्षक, गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रतिनिधी व जलस्रोत खात्याचे अधिकारी यांची बैठक आज पालिकेत झाली.

अजूनही सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जोडण्या देण्याच्या कामाला विलंब लागू शकतो. सांडपाणी महामंडळाच्या प्रतिनिधींकडून आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे सांगण्यात आलेले आहे.

ज्या भागात वाहिन्यांचे काम पूर्ण झालेले आहे, त्या भागातील लोकांनी सांडपाणी जोडणी घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असेही शंखवाळकर म्हणाले.

याआधी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फातोर्डा परिसरातील ९० टक्के तर मडगाव परिसरातील केवळ ३० टक्के सांडपाणी जोडण्या दिल्या आहेत. सांडपाणी वाहिन्यांची जोडणी झालेली असल्यास आके, मालभाट, ईएसआय इस्पितळानजीकच्या नाल्यात सांडपाण्याची मात्रा कमी होणे गरजेचे होते, पण तसे झालेले दिसत नाही. यावरून सांडपाणी वाहिन्या देण्यात अपयश आल्याचे दिसून येते.

- सावियो कुतिन्हो, निमंत्रक शॅडो कौन्सिल

शेतीवरही परिणाम

मडगाव पालिका क्षेत्रातील सांडपाणी वाहिनीला जोडण्या दिलेल्या नाहीत अशा भागात सांडपाणी गटारात सोडण्यात येते. गटारातील सांडपाणी नाल्यातून वाहत जात नदीच्या पात्राला मिळते, त्यामुळे नदी दूषित झाली आहे.

सायपे तळ्याजवळ प्रदूषणाची मात्रा जास्त आहे. सांडपाणी शेतातही घुसत असल्याने शेतीवरही परिणाम झाला आहे. यावर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला व या विरोधात सक्त पावले उचलण्याचा निर्णय बैठकीत झाला, असे मुख्याधिकारी शंखवाळकर यांनी सांगितले.

सांडपाणी जोडणी घेणे शक्य नसल्यास अन्य उपाय

मडगाव पालिकेने गटारात सांडपाणी सोडणाऱ्यांचे यापूर्वी सर्वेक्षण केले होते. त्यातील २८७ आस्थापने व घरमालकांना नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्याकडून आलेल्या उत्तरांचा अहवाल बांधकाम खात्याला दिलेला आहे.

तसेच या लोकांना जोडणी देता येते का, ते पाहण्यास सांगितलेले आहे. जोडणी देता येत असल्यास द्यावी अन्यथा अन्य उपाययोजना आखण्यास सांगितले आहे, असे शंखवाळकर यांनी सांगितले.

Margao Corporation
Goa Road Accident: चिंताजनक! अडीच महिन्‍यांत अपघाती बळींची पन्नाशी!

सांडपाणी जोडणी घेणे बंधनकारक

पाणी जोडणी घेतलेल्यांना सांडपाणी जोडणी घेणे बंधनकारक आहे. सरकारने गेल्या महिन्यात एक परिपत्रक काढत ज्या भागात सांडपाण्यामुळे प्रदूषण होत आहे, त्या भागातील लोकांना सांडपाणी जोडणी अनिवार्य केलेली आहे.

तसेच बांधकाम खात्याला या भागात फिरून सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्यांना सांडपाणी जोडणी देण्यास सांगितले आहे. तसेच सांडपाणी वाहिनी नसलेल्या भागात दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्यास सांगितलेला आहे, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com