Margao Chairperson Damodar Shirodkar: मडगाव पालिकेने जी नोकरभरती हाती घेतली होती तिला नगरपालिका प्रशासन खात्याकडून चाप लावल्याने नाराज झालेले मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आपण पदाचा राजीनामा देणार, असा शनिवारी इशारा दिल्यानंतर सरकार पातळीवर तातडीने हालचाली सुरू होऊन ही नोकरभरती प्रक्रिया चालू ठेवण्याचे आश्र्वासन नगरपालिका प्रशासन मंत्री विश्वजीत राणे यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना दिले असून या पार्श्वभूमीवर शिरोडकर यांनी आपण पदाचा राजीनामा देण्याचा विचार बदलला, असे आज जाहीर केले.
ही नोकर भरती प्रक्रिया चालू राहावी यासाठीच नगराध्यक्ष शिरोडकर यांनी हा दबावतंत्राचा वापर केला होता, असे सांगितले जात आहे.
ज्या नोकरीभरती प्रक्रियेवर बंदी आणली आहे, तो आदेश येत्या दोन दिवसांत मागे घेतला जाईल, असा विश्वास शिरोडकर यांनी व्यक्त केला.
यापूर्वी मडगाव पालिकेने एकूण ४३ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पण, सरकारने ही पदे नगरविकास संचालनालय किंवा कर्मचारी भरती आयोगामार्फत भरण्यात येतील, असे सांगत रद्द करण्याचे निर्देश दिले होते.
यासंबंधी आमदार दिगंबर कामत यांच्याशी चर्चा झालेली असून तो आदेश मागे घेण्यात येईल व भरती प्रक्रिया सुरू होईल, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी स्पष्ट केले.
शिरोडकरांचा खुलासा
मडगाव पालिकेकडून एकूण ४३ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. नगरविकास खात्याने ती जाहिरात मागे घेण्याची सूचना केली होती.
तसेच पालिकेतील पदे कर्मचारी भरती आयोग किंवा नगरविकास संचालनालय यांच्यामार्फत भरली जातील, असेही सांगण्यात आले होते.
यामुळे उमेदवार संभ्रमात पडले होते. नोकरभरती प्रक्रियेवर नगराध्यक्ष शिरोडकर यांनी वरील खुलासा केला.
"आपण राजीनामा देण्याची जी घोषणा केली होती त्याचा आणि या नोकरभरतीचा एकमेकांशी कुठलाही संबंध नाही. शनिवारी कामत यांनी पालिका कर्मचाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली होती त्या बैठकीला आपल्याला बोलावले नव्हते यामुळे मी काही प्रमाणात दुखावला गेलो होतो."
"त्यावेळी भावनेच्या भरात मी ती घोषणा केली. मात्र, काल माझी आमदारांबरोबर बैठक होऊन जे मतभेद तयार झाले होते त्यावर चर्चा होऊन ते मिटले आहेत."
दामोदर शिरोडकर, नगराध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.