Margao Carnival: मडगावात कार्निव्हल महोत्सवाच्या तयारीला वेग! पारंपरिक चित्ररथांना स्थान; नृत्य, संगीत, खेळांची रेलचेल

Margao Viva Carnival 2025: गोव्यात कार्निव्हल महोत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा असली तरी १९६५ पासून कार्निव्हलची मिरवणूक ‘किंग मोमो’सह पहिल्यांदा सुरू झाली.
Margao Carnival
Margao CarnivalDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गोव्यात कार्निव्हल महोत्सवाला शनिवार, १ मार्चपासून पणजीतील मिरवणुकीने सुरुवात होणार आहे. मात्र, मडगावात कार्निव्हलची धूम रविवार(ता.२ मार्च)पासून सुरू होत आहे. त्यादृष्टीने मडगावात तयारीने वेग घेतला आहे.

नगरपालिका चौकात मंडप, मंच, सजावटीच्या कामाला सुरुवात झाली. त्याचबरोबर मडगावमधील कोलवा सर्कल, नगरपालिकेजवळच्या वाहतूक बेटांवर सजावट झाली असून तिथे ‘व्हीवा कार्निव्हल २०२५’ असे मोठ्या अक्षरांत लिहिण्यात आले आहे. यंदा रविवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून बोर्डा येथील होली स्पिरिट चर्चकडून कार्निव्हल मिरवणुकीला सुरुवात होणार असून ती हॉस्पिसियो, जुनी जिल्हाधिकारी इमारत मार्गाने नगरपालिका चौकात येणार आहे.

यंदा नगरसेवक कामिल बार्रेटो यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या आयोजन समितीने नगरपालिका चौकात खास कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्यात खेळ तियात्र, नृत्य, संगीत यासारख्या कार्यक्रमांचा समावेश असेल.

यंदाच्या आयोजन समितीत नगरसेविका सँड्रा फर्नांडिस या सरचिटणीस, मिलाग्रीन गोम्स हे खजिनदार, तर उपनगराध्यक्ष बबिता नाईक समितीच्या उपाध्यक्ष आहेत.

यंदा केवळ गोव्याची परंपरा, संस्कृती, कला दर्शविणाऱ्या चित्ररथांनाच मिरवणुकीत स्थान दिले जाईल. याव्यतिरिक्त गोवा फॉरवर्ड व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी १ ते ४ मार्च असे चार दिवस आयनॉक्स थिएटरसमोरील एसजीपीडीए मैदानावर कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्निव्हल महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हल महोत्सवासाठी एसजीपीडीए मैदानावर मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

Margao Carnival
"Viva Carnival" Song : रंग, संगीत आणि जल्लोष! 'व्हिवा कार्निव्हल' या गाण्याने गोव्यात उसळली आनंदाची लाट

‘किंग मोमो’सह कार्निव्हल मिरवणूक एक परंपरा

गोव्यात कार्निव्हल महोत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा असली तरी १९६५ पासून कार्निव्हलची मिरवणूक ‘किंग मोमो’सह पहिल्यांदा सुरू झाली. ‘किंग मोमो’सह कार्निव्हल मिरवणूक काढण्याची संकल्पना पणजी येथील तिमोतिओ फर्नांडिस यांची. त्यांनी अशाप्रकारची मिरवणूक ब्राझील येथे पाहिल्यानंतर पणजीत तिची सुरुवात केली होती. सुरुवातीला बैलगाडीवरून मिरवणूक सुरू झाली होती.

त्यांनी मेरशीहून बैलगाडी बोलावून ती सजवली. बैलगाडीसमोर १५ ते २० मित्रांना अनेक प्रकारची वाद्ये वाजविण्यास सांगितली व आपण बैलगाडीवर ‘किंग मोमो’चा वेश परिधान करून उभे राहिले. तेव्हा लोकांना ते एक आकर्षण वाटले. गोवा मुक्तीनंतरची ती पहिली मिरवणूक होती असे सांगण्यात येते. त्यानंतरच्या वर्षापासून जीपगाडीतून ‘किंग मोमो’ची बसून मिरवणूक काढण्यात आली व १९६७ पासून ‘किंग मोमो’सह कार्निव्हल मिरवणूक एक परंपरा ठरली.

Margao Carnival
Panaji Carnival: Float Parade निमित्त्य राजधानी पणजीत वाहतूक मार्गात बदल; पर्यायी व्यवस्था, पार्किंग झोनचे अपडेट जाणून घ्या..

क्लिवन फर्नांडिस ‘किंग मोमो’

यंदाच्या कार्निव्हलसाठी ‘किंग मोमो’ म्हणून बाणावलीतील क्लिवन फर्नांडिस या तरुणाची निवड करण्यात आली आहे. क्लिवन हा बाणावलीतील या फर्नांडिस कुटुंबातील ‘किंग मोमो’ होणारी चौथी व्यक्ती आहे. यापूर्वी त्याचे दोन काका व वडिलांना ‘किंग मोमो’ होण्याची संधी प्राप्त झाली होती.

आपण १२ वर्षांचा असताना वडील रॉक टॉम फर्नांडिस यांना ‘किंग मोमो’च्या वेशात पाहिले आहे. जेव्हा माझे काका ‘किंग मोमो’ झाले होते तेव्हा आपण जन्मलोही नव्हतो. आपले काका व वडील ‘किंग मोमो’ झाल्यामुळे माझीही हा वेश परिधान करण्याची इच्छा होती, जी यंदा पूर्ण होत आहे. आपण किंग मोमो होण्यासाठी २०२२पासून प्रयत्न करीत होतो, असेही क्लिवन यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com