Fake Calls : बनावट कॉल्सपासून सावधान! पोलिस उपअधीक्षक सलीम शेख

Fake Calls : पोलिसांशी त्‍वरित संपर्क साधावा
Fake Calls
Fake CallsDainik Gomantak
Published on
Updated on

Fake Calls :

मडगाव, आर्थिक फसवणुकीसाठी दरवेळी वेगवेगळ्या क्लृप्त्या फसवणूक करणाऱ्यांकडून लढवल्या जात आहेत. सध्या पालकांना फोन करून मुले अडचणीत असल्याचे सांगत पैशांची मागणी होत आहे.

असे कॉल्स आल्यास कुणीही पैसे देऊ नयेत. प्रथम पोलिसांना कळवावे, पोलिस आवश्यक ते मार्गदर्शन करतील, अशी माहिती मडगाव पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली.

काँग्रेसचे नेते एल्‍वीस गोम्‍स यांच्‍यासह योगेश नागवेकर आणि मेल्‍वीन फर्नांडिस यांनी शुक्रवारी (ता.१४) शेख यांची भेट घेऊन सध्‍या जे पाकिस्‍तानी नंबरवरून लोकांना व्‍हाॅट्‌सॲप कॉल्‍स करून धमकावून पैसे मागितले जातात त्‍याविषयी पोलिसांनी जागृती करावी, अशी मागणी केली. राज्यात अनेक पालकांना त्यांच्या मुलांचे अपहरण केल्याचे बनावट कॉल्स करत पैशांची मागणी केली जात आहे.

याबाबत पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते व सर्व घटकांनी लोकांत जागृती करण्याची गरज आहे. अनोळखी कॉल्स कुणीही उचलू नयेत. पोलिसांनीही लोकांना जागृत करावे, अशी मागणी केल्याचे काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी सांगितले. एल्विस यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांची भेट घेत या मुद्यावर चर्चा केली.

सध्‍या दक्षिण गोव्‍यात अशा कॉल्‍सचा सुळसुळाट वाढला असून मडगावचे माजी नगराध्‍यक्ष सावियो कुतिन्‍हो यांनाही असा एक व्‍हॉट्‌सॲप कॉल येऊन त्‍यांच्‍या मुलीचे नाव घेऊन तिचे अपहरण केले असल्‍याचे त्‍यांना सांगण्‍यात आले. कुतिन्‍हो यांनी आपल्‍याला आपल्‍या मुलीशी बाेलायला द्यावे, असे सांगितले असता, पलीकडून एका मुलीचा रडण्‍याचा आवाज त्‍यांना ऐकविण्‍यात आला. मात्र, ते मुलीकडे बोलायला द्या, यावर ठाम राहिल्‍यानंतर हा कॉल बंद करण्‍यात आला.

नुवे, लोटली, नावेलीतील अनेक लोकांना कॉल्स

दक्षिण गोव्यातील वेर्णा, नुवे, लोटली, नावेली, चिंचणी भागातील पालकांना जास्त करून मुलांचे अपहरण केल्याचे कॉल्स आलेत. याबाबत शेख यांनी सांगितले की, कोणत्याही पालकाला फसवणुकीचा कॉल आल्यास त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याची गरज आहे; पण पोलिस ठाण्यांत तक्रारी नोंद नाहीत. लोकांनी +९२ क्रमांकापासून सुरू होणारे कॉल्स उचलू नयेत. कॉल्सवरून सांगितलेल्या माहितीची खातरजमा करावी व नजीकच्या पोलिस ठाण्याला कळवावे.

सडा भागात पालकांची धावपळ

हेडलँड सडा येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या मुलांच्या सुमारे पाच-सहा पालकांना गुरुवारी व शुक्रवारी निनावी कॉल आल्याने पालकांची धावपळ उडाली. पालकांनी थेट शाळा गाठून आपल्या पाल्यांची शाळेत असल्याची शहानिशा केली.

पालकांच्या म्हणण्याप्रमाणे, फोनवरून बोलणारी व्यक्ती आम्ही सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत होते. तुमच्या मुलांना आम्ही ड्रग्सच्या रॅकेटमध्ये अटक केली असून त्यांची सुटका करायची असल्यास ताबडतोब अमुक अमुक रक्कम भरा, असा संदेश दिला जातो. याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवायला गेल्यास पोलिस असे कॉल न स्वीकारण्याचा सल्ला देतात.

याप्रकारची खबरदारी घ्यावी!:

गोवा पोलिसांच्या सायबर पोलिस, गुन्हे शाखा असून त्याद्वारे तपास केला जाईल. पोलिस हे मदतीसाठी व मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. भावनाविवश होत लोकांनी आर्थिक नुकसान करून घेऊ नये. कॉल्सद्वारे कुणी ओटीपी, वैयक्तिक बँक खात्याची माहिती किंवा पैसे मागितल्यास ते देणे टाळावे. समाजमाध्यमांवर आपण कुठे जातो व काय करणार अशाप्रकारची वैयक्तिक माहिती देणे टाळावे, डिजिटल प्लॅटफॉर्मवरून अकाउंट हॅक करण्याच्या काही तक्रारीही आल्याचे शेख यांनी सांगितले.

Fake Calls
North Goa Court: मंत्री बाबूश आणि माविन यांच्‍या विरोधातील खटले उत्तर गोव्‍यातील न्‍यायालयात वर्ग

कॉल्स करून वीजजोडणी तोडणार, लॉटरी लागली असल्याचे सांगत फसवणूक होत आहे. आता मुलांचे अपहरण केल्याचे, त्यांचा अपघात झाल्याचे सांगत पैशांची मागणी केली जात आहे. पालकांना अशाप्रकारे फसवणूक करणारे कॉल्स आल्यास त्यांनी पैसे यूपीआय किंवा ऑनलाईन पद्धतीने अदा करू नयेत. पालकांनी नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलिस आवश्यक त्या सूचना करून मार्गदर्शन करतील.

- सलीम शेख, पोलिस उपअधीक्षक, मडगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com