Literary Conference : बोरी, साहित्य हे निव्वळ वाचनासाठी व प्रेम करण्यासाठी असावे. आपण कोणत्या कारणामुळे साहित्य रचतो, लिहितो यावर विचार करायला हवा. साहित्यात स्पर्धावाद नसावा. साहित्यासाठी आपण कोणते योगदान देतो हेसुद्धा महत्त्वाचे आहे. केवळ लिहायचे म्हणून लिहू नका.
चांगले वाचक तयार व्हावेत व आपल्या साहित्यात ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’चा मिलाफ असावा यावर नेहमीच भर द्या. आपले साहित्य उत्कृष्ट असल्याचे आपल्याला समाधान मिळायला हवे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक तसेच समीक्षक डॉ. घनश्याम बोरकर यांनी केले.
बोरी येथील श्री नवदुर्गा संस्थान व बिल्वदल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंत्रुज महाल मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. बोरकर बोलत होते.
बोरी येथील श्री नवदुर्गा संस्थानच्या सभामंडपात पार पडलेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ समीक्षक व उद्घाटक डॉ. सोमनाथ कोमरपंत, श्री नवदुर्गा देवस्थानचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम प्रभुदेसाई, विशेष अतिथी गोमंतक साई सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर,
बिल्वदल परिवाराचे अध्यक्ष सागर जावडेकर, सचिव करुणा बाक्रे, उपाध्यक्ष सागर साखरदांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी घनश्याम प्रभुदेसाई, रमेश वंसकर, सागर जावडेकर यांनीही विचार मांडले.
सत्कार सोहळा आणि पुस्तकांचे प्रकाशन
आयोजकांतर्फे श्याम प्रभुदेसाई, रमेश वंसकर, डॉ. सोमनाथ कोमरपंत, डॉ. घनश्याम बोरकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ‘सारेगमप’चे प्रतिनिधित्व केलेली गार्गी सिद्धये, झी मराठीवर अंतिम फेरीपर्यंत पोचलेला ऋषिकेश ढवळीकर यांचा कोमरपंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी जोग यांच्या ‘झुंज क्रांतिवीर’ व प्रसाद सावंत यांच्या ‘तेजस्वी तारा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
परिसंवाद
मुख्य कार्यक्रमानंतर ‘कला साहित्य संस्कृती क्षेत्रात अंत्रुज महाल’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात अध्यक्ष डॉ. विद्या प्रभुदेसाई, नितीन कोलवेकर, रमेश वंसकर, दुर्गाकुमार नावती, मच्छींद्र च्यारी, कालिदास मराठे, डॉ. विभूषण सातपुते यांनी सहभाग घेतला. सागर प्रारंभी जावडेकर यांनी स्वागत केले. श्रुती हजारे यांनी सूत्रसंचालन केले तर करुणा बाक्रे यांनी आभार मानले.
साहित्यात ईर्षा, स्पर्धा, वाद, द्वेष नसावा. साहित्य हे केवळ ज्ञानसंस्कृती समृद्ध करणारे असावे. साहित्याची प्रतिष्ठा कशी वाढवावी यावर विचार होणे गरजेचे आहे. ज्यांच्या घरात पुस्तके नाहीत, ते घर अप्रतिष्ठित व्यक्तीचे आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
- डॉ. घनश्याम बोरकर, ज्येष्ठ साहित्यिक
अंत्रुज महालात प्रेरणादायी ऊर्जाकेंद्रे आहेत. लोकसाहित्य आणि लोकपरंपरा याद्वारे संस्कृती संवर्धनाची धारा वाहत राहिली पाहिजे. अंतरीचा ज्ञानदीप मालवू न देणारा मांगल्यमय वारसा टिकवून ठेवण्याची प्रेरणा या भूमीने दिलीय.
- डॉ. सोमनाथ कोमरपंत, ज्येष्ठ समीक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.