पणजी: ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. माहितीपट विभागात गोव्याचे राजेश पेडणेकर आणि गायत्री पेडणेकर यांच्या दि गोअन स्टुडिओ आणि अशोक राणे प्रॉडक्शन्सची संयुक्त निर्मिती असलेला माहितीपट ‘आणखी एक मोहेंजो दारो’ हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक, ऐतिहासिक पुनर्सर्जन आणि संकलनासाठीच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
कापड गिरण्या ही मुंबईची एकेकाळची गौरवास्पद ओळख. १९व्या शतकाच्या मध्यावर या गिरण्यांच्या रूपात मुंबईची औद्योगिक संस्कृती वाढली. त्याबरोबरच अवघ्या देशातल्या विविध प्रदेशांच्या, जाती-धर्मांच्या लोकांचा मिळून गिरणी कामगार असा सांस्कृतिकदृष्ट्या विविधरंगी आणि तरीही एकात्म असा विलक्षण समाज जन्माला आला, बहरला.
ही बहरलेली नगरी म्हणजेच मुंबईचे गिरणगाव अर्थात लालबाग-परेलचा भाग. मुंबईच्या औद्योगिक, आर्थिकच नव्हे तर सामाजिक-सांस्कृतिक विकासात अग्रभागी असलेला हा कामगारांचा समाज राजकीयदृष्ट्यादेखील कायम आघाडीवर राहिला.
१९०८ मध्ये लोकमान्य टिळकांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा असो, स्वदेशीची चळवळ असो, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, अमृत डांगे यांच्या नेतृत्वात कम्युनिस्टांच्या लाल बावट्याचा एल्गार असो की, १९६७ साली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेची गर्जना, गिरणगाव हेच या सर्व घटितांचे केंद्र राहिले.
गिरण्यांच्या भोंग्यांनी आपला कर्मयोग साजरा करणारा, सतत धगधगणारा हा गिरणगाव म्हणजे मुंबईचा अभिमान होता. स्वतः ओढगस्तीत राहून, आपल्या घामाने आणि रक्तानं मुंबईला शिपून तिला वैभव मिळवून दिले, त्याच कामगाराला १९८२च्या संपाने कायमचे संपवले ते तिथे बिल्डर आणि राजकीय शक्तींच्या झालेल्या निर्दयी युतीने. एक बहरलेली संस्कृती लयाला गेली आणि तिच्या राखेतून उभे राहिले आजचे उद्दाम धनदांडगे मॉल. कामगार हरवले, संपले.
काळाच्या उदरात गडप झालेले आणखी एक मोहेन्जो दारोच होते हे. याच मोहेन्जो दारोच्या प्रेरक उदयाची, विकासाची आणि त्याचबरोबर दारुण अंताची सत्यकथा म्हणजेच ‘आणखी एक मोहेन्जो दारो’ हा माहितीपट. या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाला अलीकडेच इंडो-जर्मन फिल्म फेस्टिव्हल बर्लिनचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी ऑडियन्स अवार्डही मिळाला आहे.
निर्माते राजेश आणि गायत्री पेडणेकर यांचा हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. याआधी त्यांच्या ‘के सेरा सेरा’ आणि ‘काजरो’ या कथापटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मा. दत्ताराम आणि अँथनी गोन्साल्विस या गोव्याला ललामभूत ठरलेल्या दिवंगत कलावंतांवरील माहितीपटांचे, गोव्याला सुपरिचित दिग्दर्शक अशोक राणे यांनीच याही चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.