
म्हापसा: मरड-म्हापसा येथील उपनिबंधक कार्यालय असलेल्या एसआर इमारतीमधील लिफ्ट बंद पडल्याने सात वर्षीय मुलासमवेत अॅड. कळंगुटकर दाम्पत्य अडकले. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या कुटुंबाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले.
ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. एसआर बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावर अॅड. सर्वेश कळंगुटकर आणि अॅड. मीनल कळंगुटकर यांचे कार्यालय आहे. ते मुलासमवेत सायंकाळी चहा घेण्यासाठी इमारतीमधून खाली आले होते.
परत कार्यालयात जाताना अचानक शार्टसर्किट झाले आणि वीजपुरवठा बंद झाला. काही मिनिटांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, लिफ्ट मध्येच बंद पडली आणि कळंगुटकर कुटुंब लिफ्टमध्ये अडकले.
या घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शाहीद खान, सूरज शेटगावकर, जयेश कांदोळकर, स्वप्नेश कळंगुटकर, दिप्तेश गावडे, परेश मांद्रेकर, साईदत्त आरोलकर, भगवान पाळणी या जवानांनी पोलिसांच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही.
त्यानंतर लिफ्टची देखभाल पाहणाऱ्या जीएसआयडीसीच्या तंत्रज्ञांना पाचारण केले. तब्बल दोन तासांनी ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनाही लिफ्ट सुरू करणे शक्य झाले नाही. शेवटी त्यांनी लिफ्ट खेचून खाली आणली आणि अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा ओढून अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले. तब्बल अडीच तासांनी कळंगुटकर कुटुंबाने सुटकेचा निःश्वास घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.