Goa Politics: अनुल्‍लेखाने खलपांना इशारा; मुख्यमंत्री म्हणाले, ‘म्‍हापसा अर्बन’ची फाईल पुन्‍हा उघडू

Goa Politics: हे प्रकरण सध्या सहकारी संस्था निबंधकांकडे आहे, ते संपलेले नाही. याचा विचार ज्याने त्याने जरूर करावा, असेही ते म्हणाले.
Mapusa Urban Co-operative Bank of Goa pramod sawant
Mapusa Urban Co-operative Bank of Goa pramod sawant Dainik Gomantak

Goa Politics

‘म्हापसा अर्बन बॅंकेसंदर्भातील फाईल पुन्हा उघडली जाऊ शकते, असा गर्भित इशारा कॉंग्रेसचे उत्तर गोव्यातील उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांचे थेट नाव न घेता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिला.

हे प्रकरण सध्या सहकारी संस्था निबंधकांकडे आहे, ते संपलेले नाही. याचा विचार ज्याने त्याने जरूर करावा, असेही ते म्हणाले. आर्चबिशप फिलीप नेरी कार्डिनल फेर्रांव यांनी धर्मनिरपेक्ष उमेदवाराला मतदान करण्याचे परिपत्रक जारी करत अप्रत्यक्षरित्या भाजपलाच पाठिंबा देण्याचे आवाहन केलेले आहे, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

Mapusa Urban Co-operative Bank of Goa pramod sawant
Goa Congress Candidate Asset: खलपांकडे 6.22 तर विरियातो यांच्याकडे 1.96 कोटींची मालमत्ता; अर्ज दाखल

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गुरुवारी भाजपचा संकल्पपत्र नामक लोकसभा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्‍यासाठी भाजपच्या पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजपचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे, मंत्री सुभाष शिरोडकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्‍यमंत्र्यांनी एक राष्ट्र-एक निवडणूक, समान नागरी कायदा, नारी शक्ती वंदन अधिनियम, नागरिकत्व दुरुस्ती आदींची अंमलबजावणी येत्या कार्यकाळात करणार असल्याचा ठाम विश्वास बोलून दाखविला. गोव्याचा विशेष जाहीरनामा येत्या ४-५ दिवसांत जाहीर होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

गेल्या १०-१२ वर्षांच्या कार्यकाळात भाजपने अल्पसंख्याक समाजासाठी काँग्रेसपेक्षा अधिक काम केले आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळातच केंद्र आणि राज्यात अल्पसंख्य आयोगाचे काम जोरात सुरू आहे. आमचा जाहीरनामा इतर पक्षांप्रमाणे जाती-धर्माच्या मुद्द्यावर नाही. भाजप खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि आर्चबिशपांच्या आवाहनाचे आम्ही स्वागत करतो’, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज नमूद केले.‍

कंटी : संकल्पपत्रासाठी देशभरातून १५ लाख सूचना आल्या होत्या. यातील २० हजार सूचना गोव्यातून आल्या होत्या. संकल्पपत्रावरील मच्छीमारांच्या योजनेखाली असलेले छायाचित्र गोमंतकीय मच्छीमार पेले यांचे आहे, याचा उल्लेख मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला.

भाजपच्या लोकाभिमुख जाहीरनाम्यात युवा, नारी, किसान आणि गरीब या चार घटकांसह उत्पादन वाढ आणि महिला आणि ज्येष्ठांच्या आरोग्याला प्राधान्य दिले आहे. केंद्राच्या अनेक योजनांचा लाभ गोव्यातील नागरिकांनी घेतलेला आहे.

यात प्रधानमंत्री कौशल्य योजनेअंतर्गत ११ हजार जणांना प्रशिक्षण, श्रमिक योजनेखाली ६२ हजार कार्डे, मुद्रा कर्ज योजनेचा ४२ हजार जणांना लाभ, थेट हस्तांतरण योजनेचा २.०५ लाख नागरिकांना लाभ मिळत आहे.

पीएम उज्ज्वला आणि खुल्यावर शौचमुक्तीची गोव्यात १०० टक्के अंमलबजावणी झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. श्रमिक सम्मान योजनेखाली गोव्यातील पायलट बांधवांसारखे घटक सामाजिक सुरक्षेचा लाभ घेऊ शकणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी भाजपच्या प्रचार मोहिमेतील शीर्षक गीताचे अनावरण करण्यात आले. ‘यावेळा चारशे पार, परतून एकदा मोदी सरकार’ असे या गीताचे बोल आहेत.

ब्रॅण्ड धेंपो भाजपपेक्षा मोठा नाही : डॉ. प्रमोद सावंत

मुख्‍यमंत्री यांनी विजय सरदेसाई यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याचाही समाचार घेतला. धेंपो हे राज्यातील नामांकित घराणे आहे. पल्लवी यांची त्यांच्या सामाजिक कामामुळे वेगळी ओळख आहे. तरीही आमच्यासाठी भाजप पक्षच मोठा आहे. ब्रॅण्ड धेंपो हा भाजपपेक्षा मोठा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपपेक्षा ब्रॅण्ड धेंपो मोठा असल्याने पल्लवी यांना उमेदवारी दिल्याचे नमूद केले होते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, धेंपे हे उद्योजक घराणे आहे. ते विविध उद्योगांत जसे आहेत, तशी विविध समाजोपयोगी कामेही ते करतात. त्यामुळे राज्यभरातील जनतेला ते घराणे ज्ञात आहे. याचा अर्थ भाजप छोटा ठरत नाही. भाजप हा देशव्यापी आणि जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. आमच्यासाठी भाजपच मोठा आहे.

...तर राजकारण सोडू

मुख्यमंत्री म्हणाले, म्हापसा अर्बन का बुडाली, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आमच्यावर आरोप करण्यासाठी कोणी (खलप यांनी) अन्य कोणाला पुढे करू नये. जे काय म्हणायचे असेल, ते थेट म्हणावे.

आम्हाला कमरेखाली वार करायचे नाहीत. कोणत्या उमेदवाराने लुटलेले पैसे कुठे गुंतवलेत, हे सर्वांसमोर आले आहे. आम्ही राजकारणाचा वापर स्वार्थासाठी करत नाही. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि सर्वांत शेवटी आम्ही.

राजकारणातून आम्ही स्वार्थ साधला, असे कोणी सिद्ध केल्यास त्याचक्षणी राजकारण सोडून घरी जाण्याची आमची तयारी आहे. ते म्हणाले की, म्हापसा अर्बन बुडाल्याने ज्या शेकडो लोकांचे कष्टाचे पैसे बुडाले, त्यांना त्‍याविषयी विचारा. ते यासाठी कोण कारणीभूत आहेत, ते सांगतील.

ब्रॅण्ड धेंपो भाजपपेक्षा मोठा नाही : डॉ. प्रमोद सावंत

आर्चबिशप यांनी जारी केलेल्‍या परिपत्रकाचा फायदा काँग्रेसला होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. या परिपत्रकामुळे अल्पसंख्याक ख्रिस्ती मते भाजपच्या विरोधात जातील, असे मानले जात होते.

त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर ते म्‍हणाले, कोणतीही योजना राबवताना राज्य सरकारने जाती धर्माच्या आधारावर भेदभाव केलेला नाही. सर्व योजनांचा लाभ सर्वांना समान पद्धतीने मिळत आहे.

धर्म, जातीवर आधारित राजकारण भाजपने राज्यात केलेले नाही. भाजपमध्येच सर्वाधिक अल्पसंख्याक आमदार आहेत, हे कोणी विसरू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com