Mapusa Traffic Cell : अपघातातील वाढत्या बळींची संख्या रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. आज बुधवारी म्हापशात वाहतूक पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी म्हापसा वाहतूक पोलिसांसह रस्त्यावर उतरून उल्लंघनकर्त्यांना चलन दिले. शिवाय वाहनचालकांमध्ये जागृती करीत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास १२० पेक्षा अधिक वाहनचालकांना आज दिवसभरात म्हापसा शहरात चलन देण्यात आले. यावेळी म्हापसा वाहतूक पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत विशेष मोहिमेवेळी म्हापसा गांधी चौकात हजर होते.
शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती
पोलिसांकडून सर्व वाहने तपासली जात आहेत. केवळ बाहेरील वाहनांनाच लक्ष्य केले जात नाहीय. सध्या विद्यार्थीसुद्धा हेल्मेट वापरताना दिसताहेत. कारण हेल्मेट न वापरल्यास काय घडू शकते या परिणांमाची प्रत्येकाला जाणीव आहे. तरीही काहीजण उल्लंघन करतातच. त्यांच्यामध्ये जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
शिवाय पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयांत वेळोवेळी जागृती केली जाते, असे वाहतूक पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी सांगितले. दरम्यान, या मोहिमेवेळी ज्यांना चलन देण्यात आले, त्यातील बहुतांशजण हेल्मेट परिधान न केलेले होते. शिवाय काही बसचालक व वाहक हे वाहतूक गणवेशाशिवाय वाहतूक करताना आढळले.
वाहतूक सेंटिनल योजना पोलिस मुख्यालयाकडून मंजूर झाली असून येत्या काही दिवसांत तिची अंमलबजावणी पुन्हा सुरू केली जाईल. या योजनेच्या नवीन स्वरूपाविषयी माध्यमांना लवकरच माहिती दिली जाईल.
- सिद्धांत शिरोडकर, वाहतूक पोलिस उपअधीक्षक
हेल्मेट, सीट बेल्टचा वापर करा; नो एंट्रीतून प्रवास टाळा
वाढते अपघातबळीचे मुख्य कारण वाहतूकचालकांचा निष्काळजीपणा आहे. अनेकजण हेल्मेट घालत नाहीत, सीट बेल्ट न वापरणे, नो एंट्रीतून वाहन नेणे अशा नियमांचे सर्रास उल्लंघन करतात.
पोलिसांकडून उल्लंघनकर्त्यांना वेळोवेळी चलन दिले जाते. इतके करूनही अपघातबळी जातच आहेत. अशावेळी वाहतूक पोलिसांनी आता रस्त्यावर उतरून चालकांमध्ये नव्याने जागृती करण्याचे ठरविले आहे.
चलनासोबतच आम्ही वाहनचालकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण अनेकदा आपल्या चुकीमुळे एका निष्पाप माणसाला प्राण गमवावा लागतो. हे प्रकार घडू नयेत यासाठीच ही विशेष जागृती मोहीम असल्याचे शिरोडकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.