Goa Theft: ताळगाव झाले आता गणेशपुरी! गुन्हेगारीचा छडा लागेल का? पोलिस दलासमोर दुहेरी आव्हान

Goa Crime: पोलिसांचे पूर्वी खबरी असत. ‘सिक्रेट सर्व्हिस’ या नावाने त्यासाठी निधीही ठेवलेला असे. राज्यात कुठे काय घडले तर त्याच्या मागे कोण आहे, याची बित्तंबातमी त्या खबऱ्यांना असे.
Goa Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गणेशपुरी-म्हापसा येथे दरोडा पडला आणि पोलिस गुंता सोडवू न शकलेल्या ताळगाव येथील जबरी चोरीचा विषय चर्चेला आला. पोलिस गुन्हेगारांपर्यंत पोहोचतील का, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

पोलिस दलातील काही बदल माहिती मिळवण्यात अडथळा ठरू लागल्याची खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे. पूर्वी गुन्हा अन्वेषण विभागात नियुक्ती मिळालेले कर्मचारी निवृत्तीपर्यंत त्याच विभागात असत. त्यांचे कुटुंबीय वगळता ते पोलिसांत आहेत याची माहिती सहसा कोणाला नसे. ते गुप्तपणे आपले काम करत असत.

आता विभागातून दुसऱ्या विभागात बदली करण्याची पद्धती सुरू झाली आहे. त्यामुळे ‘सीआयडी’ म्हणून काम करणाऱ्यांना काही वर्षांनी गणवेश चढवण्याची वेळ येते आणि ती व्यक्ती पोलिस आहे, हे समाजाला समजते.

पोलिसांचे पूर्वी खबरी असत. ‘सिक्रेट सर्व्हिस’ या नावाने त्यासाठी निधीही ठेवलेला असे. राज्यात कुठे काय घडले तर त्याच्या मागे कोण आहे, याची बित्तंबातमी त्या खबऱ्यांना असे. प्रत्येक अधिकाऱ्याला निष्ठा वाहिलेले असे खबरी असल्याने गुन्हे उकल होण्यात मदत होई.

आता तशी व्यवस्था अभावानेच एखादा अधिकारी आपल्या पातळीवर राबवतो, असे सांगण्यात येते. त्याशिवाय अधिकारी व त्याच्या हाताखालील कर्मचारी यांचा एक चमू असे. आता या ना त्या कारणाने तो चमू फोडण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर होतात आणि त्याचा परिणामही तपासकामावर होताना दिसतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

समाजातील गुन्हेगारीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, त्यामुळे पोलिस यंत्रणेसमोर नवी व गुंतागुंतीची आव्हाने उभी ठाकत आहेत. पारंपरिक चोरी, मारामारी, दरोडे या गुन्ह्यांपलीकडे आता सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, ऑनलाईन ब्लॅकमेलिंग, ड्रग्ज व्यवहार आणि मानवी तस्करी यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. या नव्या प्रकारच्या गुन्ह्यांची चौकशी करताना पोलिसांना तांत्रिक साधनसामग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि कायदेशीर चौकटींच्या मर्यादांचा सामना करावा लागत आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने गुन्हेगार सहज सापडत नाहीत. अनेकदा गुन्हेगार वेगवेगळ्या राज्यांतून किंवा देशांतून कार्यरत असतात, ज्यामुळे तपासाची व्याप्ती अधिक गुंतागुंतीची होते.

आर्थिक गुन्ह्यांमध्ये बोगस खात्यांद्वारे व्यवहार, डिजिटल वॉलेटचा गैरवापर, क्रिप्टोकरन्सीद्वारे व्यवहार लपवणे असे नवे प्रकार समोर येत आहेत.

याशिवाय, साक्षीदार मागे घेणे, न्यायालयीन प्रक्रिया लांबणीवर जाणे आणि तांत्रिक पुराव्यांची अभावपूर्ण साखळी यांमुळे तपासात अडथळे निर्माण होतात. पोलिस दलातील मनुष्यबळ अपुरे असून, सतत वाढणाऱ्या कामाच्या ताणामुळे तपासाची गुणवत्ता प्रभावित होत असल्याची कबुलीही वरिष्ठ अधिकारी देतात.

Goa Crime News
Mapusa Theft: ‘आवाज केला तर ठार मारू’! म्हापशातील चोरीने गोवा हादरला; चोरांनी चहा पिला, फळे खाल्ली, टॅक्सीने गाठले कर्नाटक; वाचा घटनाक्रम..

तज्ज्ञांच्या मते, बदलत्या गुन्हेगारी पद्धतींना रोखण्यासाठी सायबर तपास कौशल्य, फॉरेन्सिक तंत्रज्ञान, डेटा ॲनालिटिक्स आणि आंतरराज्यीय समन्वय यांवर भर देणे अत्यावश्यक आहे. तसेच, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून गुन्हे रोखण्याची सामूहिक जबाबदारीही समाजाने स्वीकारण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

समाजातील गुन्हेगारीचे स्वरूप जसे बदलत आहे, तसेच पारंपरिक गुन्ह्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. चोरी, घरफोडी, दरोडे, वाहने चोरी, महिलांविरुद्धचे अपराध आणि अमलीपदार्थांचा गैरवापर अशा पारंपरिक गुन्ह्यांत लक्षणीय वाढ होत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, ओळख चोरी आणि डिजिटल ब्लॅकमेलिंगसारख्या आधुनिक गुन्ह्यांनी पोलिस दलासमोर दुहेरी आव्हान उभे केले आहे.

Goa Crime News
Goa Theft: सावधान! गोव्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बंद घरे होताहेत 'टार्गेट'; म्हापसा, कोलवा परिसरात दहशत

गुन्हेगारीचा हा बदलता चेहरा लक्षात घेता तपास पद्धतींमध्ये बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पोलिसांच्या प्रशिक्षणात सुधारणा यांची गरज प्रकर्षाने जाणवते. आज तपासकाऱ्यांना फक्त घटनास्थळ आणि साक्षीपुराव्यांवर अवलंबून राहणे पुरेसे राहिलेले नाही;

सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन डेटा, डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक तपास हे गुन्ह्यांचा मागोवा घेण्यासाठी अत्यावश्यक झाले आहेत. म्हापशातील व ताळगावातील चोरी प्रकरणात सीसीटीव्हीचा डीव्हीआरच चोरट्यांनी चोरला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही तपास हा भविष्यात किती प्रभावी राहील, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com