म्हापसा: म्हापसा येथील डेम्पो मेन्शनमधील कॅनरा बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने संशयित चोराने तेथील साउंड बॉक्स चोरून नेला होता. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. मात्र, काही तासांतच म्हापसा पोलिसांनी या संशयिताला गजाआड केले.
दरम्यान, याच चोराने नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर यांच्या बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरी केली होती. पोलिसांनी संशयिताकडून रोख २०२० रुपये व साउंड बॉक्स हस्तगत केला. अनुप केकन (३२, रा. म्हापसा व मूळ नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न हा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याप्रकरणी बँकेचे मॅनेजर सौमिक बॅनर्जी यांनी तक्रार दिली होती. दरम्यान, म्हापशात ब्ल्यू डायमंड बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला होता.
शहरात खोर्जुवेकर यांच्या मालकीचा ब्ल्यू डायमंड नामक बार अँड रेस्टॉरंट आहे. दुपारी ३.३० ते सायं. ७ वा.पर्यंत या वेळेत ते बंद असते. याच वेळेत ही चोरी करण्यात आली. संशयिताने आतमध्ये प्रवेश करून काउंटरमधील रोकड लंपास केली होते.
उपलब्ध सीसीटिव्ही फुटेजमध्ये संशयित हा रेस्टॉरंट जवळून चालत जाताना दिसतोय. रेस्टॉरंटच्या बाजूला एक बांधकाम सुरू आहे, तेथून या चोरट्याने लोखंडी रॉड आणला व त्याच्या साहाय्याने रेस्टॉरंटच्या दरवाज्याचे कुलूप तोडले होते. या दोन्ही चोऱ्या केकन यानेच केल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.