Mapusa Pay - Parking : म्हापशातील वाढीव पे-पार्किंग शुल्क मागे घ्या!

यापूर्वी ठराव मंजूर : व्यापारी संघटनेकडून नगरपालिकेला निवेदन सादर
Pay-Parking
Pay-ParkingDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Pay - Parking: मार्केट परिसरातील वाढीव पे-पार्किंग शुल्कास म्हापसा व्यापारी संघटनेने विरोध केला आहे. अलीकडेच पालिका मंडळाने पार्किंगचे दर वाढविण्याचा ठराव मंजूर केला होता. यासंदर्भात व्यापारी संघटनेने मंगळवारी म्हापसा पालिकेस मागण्यांचे निवेदन सादर केले.

म्हापसा व्यापारी संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, मार्केटमध्ये पे-पार्किंग प्रणाली लागू करण्यासाठी संघटनेने पालिकेस सहकार्य केले. पार्किंगमध्ये शिस्त यावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.

जेणेकरुन बाजारात येणाऱ्या ग्राहक, पुरवठादार, व्यापारी व इतर लोकांना वाहने पार्क करण्यास पुरेशी जागा मिळावी. याशिवाय विक्रेत्यांना रस्त्यांवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यापासून रोखणे व गर्दी टाळणे हा हेतू होता, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

म्हापसा पालिका मंडळाने मार्केटमधील पार्किंग शुल्कात वाढ करण्याचा ठराव मंजूर केला आहे. मात्र, म्हापसा मार्केट व्यापारी संघटना या निर्णयाला कडाडून विरोध करते.

कारण, यामुळे बाजारपेठेतील ग्राहकांच्या संख्येवर परिणाम होऊन आमच्या व्यवसायावर परिणाम होईल, असा दावा म्हापसा व्यापारी संघटनेने केलाय.

मुळात मार्केटच्या माध्यमांतून म्हापसा पालिकेला भाडे, सोपो व इतर करांच्या रुपाने अनेक कोटींचा महसूल प्राप्त होतो. हे सर्व मार्केटमधील ग्राहकांच्या प्रवाहावर अवलंबून असते. विशेष म्हणजे, आजच्या स्थितीत ग्राहकांना पालिका मार्केटबाहेर खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. तेव्हा पार्किंग शुल्क वाढवणे हे आत्मघातकी ठरेल.

मुळात पालिका मंडळाने बाजारपेठेत मूलभूत सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करावे,असे निवेदनात संघटनेने म्हटले आहे.

अशावेळी पालिकेने ही नवीन पार्किंग दरवाढ मागे घ्यावे व जुन्या दरानुसार दुचाकीला ५ रुपये व चारचाकीला १० रुपयेच शुल्क आकारावे. पालिकेने नवीन दरानुसार तासाला दुचाकी १० व चारचाकी २० रुपये शुल्क केले आहे.

पार्किंग दर फलक हवे

व्यापारी संघटनेने म्हटले आहे की, पालिका मंडळाने मार्केट परिसरात प्रमुख ठिकाणी निश्चित पार्किंग दराचे फलक लावावेत. वाहनांची बेशिस्त पार्किंग टाळण्यासाठी पार्किंग स्लॉटचे योग्य मार्किंग करावे. कारण शुक्रवारी आठवडी बाजारावेळी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर रस्ता अडवून बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात.

तसेच शकुंतला परिसराजवळील व्यापाऱ्यांसाठी खास पार्किंगची विनामूल्य जागा डीमार्क करावी, अशी मागणी संघटनेद्वारे केली आहे. या निवेदनावर अध्यक्ष श्रीपाद सावंत व सचिव सिद्धेश राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com