
म्हापसा: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून म्हापसा नगरपालिकेने शालेय समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केली. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे स्पर्धक विद्यार्थी आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
विद्यमान पालिका सभागृह हे समूहगीत गायनसारख्या स्पर्धांसाठी अपुरे ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात ही स्पर्धा ग्रंथालय इमारतीच्या सभागृहात घेण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी दिली.
बुधवारी ही स्पर्धा नगरपालिका सभागृहात झाली. या सभागृहाचे वातावरण हे कोंडीयुक्त होते. सर्वत्र कपाटे आणि मध्यभागी पालिका मंडळाच्या बैठकांसाठी वापरले जाणारे भलेमोठे गोलाकार टेबल असल्यामुळे जागा कमी पडली. अपुऱ्या जागी स्पर्धक मुलांपैकी एक-दोन शाळांचे गटच एकावेळी सभागृहात हजर राहू शकतात.
इतर गटांतील मुले आणि शिक्षकांना इमारतीच्या बाल्कनीत किंवा खुल्या जागी ताटकळत उभे राहावे लागले. समूह गायनात सहकारी गायक मुलांना साथसंगत करणाऱ्या संवादिनी आणि तबला वादकाला उभे राहून त्यांना साथ द्यावी लागेल, असे प्रशिक्षण शाळेत सरावावेळी दिलेले नसते. त्यामुळे या मुलांची गैरसोय होते.
मुलांना त्रास नको!
अशा स्पर्धेच्या आयोजनात होणाऱ्या गचाळ व्यवस्थापनाचा तसेच गैरसोयींचा सामना शहरातील १०-१२ विद्यालयांतील सुमारे १०० ते १२० स्पर्धक शालेय मुले आणि त्यांच्या शिक्षकांना करावा लागतो. यापुढे पालिका मंडळाने खुल्या व मोकळ्या अशा वातावरणात ही स्पर्धा घ्यावी, जेणेकरून स्पर्धक मुलांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही, अशी मागणी शिक्षकवर्गाने केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.