
म्हापसा: संततधार पावसामुळे म्हापसा येथील प्रशासकीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर गळती लागली आहे. परिणामी, सरकारी कर्मचाऱ्याना आपल्या संगणकावर ताडपत्र्यांचे आवरण टाकून रिकामी बसण्याची वेळ आली आहे. तसेच, कामानिमित्त येणाऱ्या लोकांना हताश होऊन माघारी फिरावे लागत आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन, ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
ही प्रशासकीय इमारत जीर्ण झाली आहे. अशा अवस्थेत कर्मचाऱ्यांना याठिकाणी काम करावे लागत आहे. त्याबरोबर नागरिकांनाही या गळतीतूनच ये-जा करावी लागत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर टीसीपी, सेल टॅक्स कार्यालय, कामगार आयुक्तालय व साबांखा अशी महत्त्वाची कार्यालये कार्यरत आहेत.
या विभागांत ही मोठी गळती लागली आहे. गळतीमुळे कार्यालयाच्या भिंती ओलसर झाल्या आहेत. मागील आठ दिवसांपासून ही समस्या गंभीर झाली असून, गेल्या शुक्रवारपासून या समस्येत जास्त भर पडली आहे.
सोमवारी (ता.२६) ‘टीसीपी’मधील काही संगणकांना गळतीमुळे शॉक येण्याचा प्रकार समोर आला. तसेच इमारतीच्या स्लॅबमधून गळतीमुळे पावसाचे पाणी थेट खाली टेबलवरील कागदपत्रे तसेच संगणकावर झिरपत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविषयी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयात लेखी कळविल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्या विभागांत गळती लागली आहे, तेथील काही पंखे गळतीमुळे नादुरुस्त झाले आहेत. कारण, इलेक्ट्रिक बोर्डमध्ये गळतीचे पाणी गेल्याने शॉटसर्किट झाल्याने पंखे बंद पडलेत, तसेच सोमवारी काही संगणकांना शॉकचे सौम्य झटके लागत होते. परिणामी, यंत्रणा बंद करण्यावाचून दुसरा पर्याय कर्मचाऱ्यांसमोर नव्हता. सध्या येथील विभागांत संगणकावरील कामे बंद आहेत.
काही दिवसांपूर्वीच या इमारतीच्या छपरवरील कौले उतरवली होती. अद्याप ती दुरुस्ती केलेली नसून, काम सुरू असल्याने गळतीमध्ये भर पडल्याची माहिती मिळाली. हे काम पूर्ण होण्यास अजून काही दिवस लागणार असल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांना आणखीन काही दिवस थोडी कळ सोसावी लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.