
म्हापसा: गेल्या गुरुवारी बहुचर्चित मंत्रिमंडळ फेरबदल करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी सभापती रमेश तवडकर व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. राजकीय व समाज समतोल राखण्यासाठी तवडकर व कामत यांना मंत्रिमंडळात स्थान देणे हे पटण्यासारखे गणित आहे. मात्र, काँग्रेसची साथ सोडून पुन्हा घरवापसी केलेल्या कळंगुटचे आमदार मायकल लोबो किंवा त्यांची पत्नी शिवोलीच्या आमदार दिलायला यांना या फेरबदलाचा अपेक्षित लाभ झाला नसल्याने दोघांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे.
मध्यंतरी लोबो दाम्पत्यांपैकी एकाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार, अशा जोरदार चर्चा रंगल्या. परंतु भाजपाने या फेरबदलापासून लोबोंना दूर ठेवणे पसंत केले. परिणामी, मंत्रिमंडळ फेरबदलाची पहिली गाडी लोबोंना चुकली असली तरी आगामी काळात दुसऱ्या फेरबदलाची ही राजकीय बस पकडण्याची संधी लोबोंकडे आहे. कारण, पुढील दोन ते तीन महिन्यांत किंवा आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
गेल्या जुलैमध्ये मायकल लोबोंनी मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर, लोबोंना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकते, अशा बातम्या राजकीय वर्तुळात होत्या. मायकल लोबो हे बार्देश तालुक्यातील मोठे आणि तितकेच प्रभावी राजकीय नेते. मध्यंतरी जे आठ आमदार काँग्रेसचा हात सोडून भाजपात आले, तेव्हा मायकल लोबोंनी या फोडाफोडीच्या राजकारणात व पक्षांतरामध्ये महत्त्वाची राजकीय भूमिका निभावली होती, असे बोलले जाते.
मुख्यमंत्र्यांनी अनेकदा आपल्या भाषणात लोबो हे चांगले प्रभावशाली राजकारणी आहेत, असे म्हटले आहे. असे असले तरी, मायकल लोबो हे महत्त्वाकांक्षी राजकारणी व तितकेच सडेतोड बोलणारे नेते. परिणामी, तोंडसुख घेत टीका करण्याची लोबोंची ही सवय, सध्या त्यांच्या मंत्रिमंडळाच्या स्वप्नाआड आली असावी, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
लोबो हे सरकारवर केवळ बाहेरच नव्हे, नुकताच झालेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनावेळी तोंडसुख घेताना दिसले. त्यामुळे अप्रत्याशित लोबोंवर तितकेच आवर घालणे कठिण हे भाजपवाल्यांना माहिती आहे. कदाचित लोबोंचा हाच फटकळ स्वभाव व उतावीळपणा त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याआड आला असावा, असेही विश्लेषकांचे मत बनले आहे.
लोबोंनी गेल्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाशी फारकत घेत, डॉ. प्रमोद सावंत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
...तर वेगळी चूल मांडण्याचीही शक्यता
दुसरीकडे मायकल हे आगामी विधानसभेत आपली व आपल्या पत्नीची उमेदवारी सुरक्षित करत आहेत. याव्यतिरिक्त ते आपल्या मर्जीतील काही उमेदवारांना पुढे काढून आपले राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न करताहेत. शेवटी राजकारणात आमदारांच्या आकड्याचे गणित चालते, चेहरा नव्हे व ही वस्तुस्थिती लोबोंना माहिती आहे. सध्या बार्देशातील कळंगुट, शिवोलीवर लोबोंची बऱ्यापैकी पकड आहे.
याव्यतिरिक्त लोबो म्हापसा, साळगाव मतदारसंघांवर आपले वर्चस्व काबीज करु पाहताहेत, अशा चर्चा आहे. तरीही, लोबो हे शांत बसणारे राजकारणी नाहीत. ते आगामी विधानसभेपूर्वी त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास ते आपली वेगळी चूल मांडण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. परंतु, केंद्रात भाजपाची असलेली पकड तसेच आगामी विधानसभेत भाजपाला किती जागा मिळतात यावर लोबोंचे भविष्यातील राजकीय चाल अवलंबून राहिल.
लोबोंना स्वभाव नडतोय...
लोबो हे उघडपणे बोलणारे राजकीय प्रभावशाली नेतृत्व. त्यांच्या राजकीय महत्वकांक्षाने हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. सरकारसोबत राहून ते आपल्याच सरकारला शिंगावर घेण्यास ते कचरत नाहीत. काहीवेळा त्यांची ही वृत्ती नडते. कारण, भाजप व इतर राजकीय पक्षातील कामाच्या पद्धतीत बराच फरक आहे. भाजप हा नेत्याच्या इच्छेप्रमाणे वागत नसतो. त्याउलट भाजपाला शिस्तबद्धता जास्त प्रिय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.