बार्देश: म्हापसा पालिका क्षेत्रातील कचऱ्यासंबंधी सोमवारी दैनिक ‘गोमन्तक’मध्ये ‘उचल होत नसल्याने कचरा पडून’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका शुभांगी वायंगणकर म्हणाल्या की, पालिकेकडे कचरा उचल करणारे बरेच कामगार आहेत. तरीही हा कचरा वेळेवर उचलला जात नाही. मग विद्यमान नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अभियंते, सुपरवायझर करतात तरी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
याविषयी विद्यमान नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर म्हणाल्या की, शुभांगी वायंगणकर या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांनी कचऱ्यासंबंधी व्यवस्थित आढावा घ्यावा. नगराध्यक्ष पदावरून बाजूला झाल्यावर उगाच भलते आरोप करू नयेत. प्रत्येक नगरसेवक हे त्या प्रभागाचे प्रतिनिधी असतात. वायंगणकर या जबाबदार नगरसेविका आहेत. सत्ताधारी गटात असूनही उगाच दुसऱ्याकडे बोट दाखविणे योग्य नव्हे. कचरा उचल करणारी गाडी दिवसाला एकाच प्रभागामध्ये १०-१५ वेळा येणार नाही.
पालिका मार्केट मंडळाचे चेअरमन साईनाथ राऊळ म्हणाले की, मार्केटमधील कचरा रात्री, सकाळी, संध्याकाळी काढला जातो. परंतु भाजी व मासळी मार्केटच्या मधोमध जास्त कचरा साठतो. कचरा काढल्यानंतर व्यापारी पुन्हा तेथे कचरा टाकतात. वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत.
पालिकेने कचरा उचल करण्यासाठी ३ ट्रक भाडेपट्टीवर दिवसा दहा हजार रुपये बोलीवर घेतले आहेत. एक ट्रक दिवसाला चार फेऱ्या मारतो. पण कंत्राटदार आणि अभियंता त्याकडे लक्ष देत नाहीत. बऱ्याचदा ते ट्रक अर्धाच भरतात आणि तसेच निघून जातात. कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट होत नाही. कचरा उचलण्यासाठी म्हापसा पालिका लाखो रुपये खर्च करते. मग सुपरवायझर करतात तरी काय, असाही प्रश्न वायंगणकर यांनी उपस्थित केला.
कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारकून नाही. उपलब्ध कारकुनाला पालिकेत ‘इनवर्ड’साठी बसविलेे आहे. त्यावर नियंत्रण कोण ठेवणार, असेही वायंगणकर म्हणाल्या.
शुभांगी वायंगणकर यापूर्वी नगराध्यक्षा होत्या. आताही नगरसेविका असल्याने त्यांचीही तेवढीच जबाबदारी आहे. कचराप्रश्नी पालिकेचे अधिकारी तसेच अभियंते त्यांची कामे व्यवस्थित करतात. उगाच कुणावरही नाहक आरोप करू नयेत.
डॉ. नूतन बिचोलकर, नगराध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.