
बार्देश: बार्देश तालुक्याच्या सात विधानसभा मतदारसंघांतील लोकांना म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासह विविध कार्यालये असलेल्या प्रशासकीय संकुलात कामांसाठी येजा करावी लागते. मात्र, इथे लोकांना सध्या नाक मुठीत धरून प्रवेश करावा लागतो, कारण सध्या ही इमारत अस्वच्छतेच्या भोवऱ्यात सापडली आहे. शिवाय परिसरात पार्किंगचीही समस्या जटील बनली आहे.
या इमारतीत जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी, मामलेदार, गटविकास अधिकारी, नगर नियोजन खाते, साबांखाचे रस्ते विभाग, कामगार महाआयुक्त, नागरी पुरवठा खाते, अशा सरकारी विविध खात्यांची कार्यालये आहेत.
या प्रशासकीय कार्यालय परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने उगवलेली झाडे, टाकलेला प्लास्टिकचा कचरा आणि भंगार साहित्य, अशी बकाल स्थिती दिसते.
या प्रशासकीय इमारतीत दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात किंवा परिसरात स्वच्छतागृहांची सोय नाही. त्यामुळे अनेकांकडून कार्यालयामागील उघड्या जागेचा वापर करावा लागतो. या प्रशासकीय इमारतीत वर्षभरात मोजक्याच वेळा साफसफाई केली जाते, ती सुद्धा नावापुरती असते. कारण अपुरे कार्यालय व फाईल्सचा ढीग जमिनीवरच रचून ठेवलेला दिसून येतो.
प्रशासकीय कार्यालयाच्या या दोन मजली इमारतीवर अनेक ठिकाणी झुडपे उगवली आहेत. मागच्या बाजूला अशी स्थिती दिसते.
तेथे वाहणारे सांडपाणी, टाकलेले अन्न खाण्यासाठी येणारे भटके कुत्रे, त्यात येथे आणून टाकलेला कचरा दिसतो. सध्या या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला असल्यामुळे दुचाकी पार्किंग करण्यासाठी जागा शोधावी लागते. या इमारतीतील वेगवेगळ्या कार्यालयातील बाजूच्या गॅलरींचा उपयोग मोडलेल्या खुर्च्या, कपाटे टाकण्यास झाला आहे.
काही वर्षांपूर्वी मायकल लोबो मंत्री असताना त्यांनी या कार्यालयाला भेट देऊन गॅलरीत पडलेले टाकाऊ साहित्य हटवण्याची सूचना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार टाकाऊ साहित्यासाठी इमारतीच्या मागे खोली बांधण्यात आली; परंतु आता ती खोलीही दुर्लक्षित झाली आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीस नगर नियोजन कार्यालयात गळती लागली होती. त्यामुळे येथील फायलींचे गठ्ठे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आले होते. त्यानंतर या इमारतीच्या छतावर प्लास्टिकचे आच्छादन घातले होते, तर नुकतीच छतावरील कौले काढून दुरुस्ती केल्याचे सांगण्यात येते. काढून ठेवलेली कौले इमारतीच्या मागील बाजूस रचून ठेवण्यात आलेली आहेत. नागरिक पुरवठा खात्यात फाईलचा ढीग साचला आहे. अपुऱ्या जागेमुळे कार्यालयीन अडचणीत भर पडली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.