Tribal Movements: दिलीप-मंगेश, पोरांनो... आम्हाला माफ करा!

उद्या पुण्यतिथी : ‘उटा’चे कार्यकर्ते, आदिवासी हौतात्म्याची तपपूर्ती; वास्तवाचे अवलोकन
Tribal Movements
Tribal MovementsDainik Gomantak

डॉ. मधु स. गावडे घोडकिरेकर

Tribal Movements हो, दिलीप-मंगेश बाळांनो, आपल्या स्वर्गप्रवेशाला या 25 तारखेला एक तप म्हणजे बारा वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच आपल्या आदिवासी हौतात्म्याची तपपूर्ती. सत्य ज्ञान मिळावे, या उद्देशाने भगवान महावीर यांनी कठोर तप केले.

ते जंगलात गेले आणि त्यांनी 12 वर्षे तप केले. एक साधे जीवन जगले आणि स्वत: ला मानवतेसाठी समर्पित केले म्हणून एक तप म्हणजे 12 वर्षे अशी गणना चालू झाली, असे काही लोक मानतात. पौराणिक संदर्भ असे सांगतात की, एखादा चांगला गुण अंगिकार करायचा असेल तर त्याला 12 वर्षांचा कालावधी लागतो.

थोडक्यात, ती गोष्ट सतत बारा वर्षे करणे जरूरी असते. ऋषिमुनी कठोर तप करायला हिमालयात जात, आपण थेट कैलासात गेलेत. खरे तर गोमंतकीय आदिवासींनी आपली सर्व प्राधान्ये बाजूला ठेवून या स्मृतिदिनी आपणा दोघांची ऋषितुल्य पूजा करायला हवी होती; पण तशी कुठे अशा आयोजनाची तयारी दिसत नाही, म्हणून आम्हाला माफ करा.

पोरांनो, खरे सांगतो... 25 तारखेच्या आंदोलनाचे निश्‍चित स्वरूप मला माहीत नव्हते. फक्त एकाच वर्तमानपत्रात ‘आपल्या मागणीसाठी गुर्जर धर्तीवर आदिवासींचे आज आंदोलन’ अशी बातमी वाचली होती. हे आंदोलन हिंसक स्वरूपाचे असेल, असे अप्रत्यक्षपणे सुचविणारी ही बातमी होती.

लोकशाहीत नि:शस्त्र आंदोलनांना नक्कीच मान्यता आहे; पण पूर्वनियोजित हिंसक आंदोलने हा गुन्हा आहे. अशी बातमी कुणी व का पेरली, हे आजही माझ्यासाठी एक मोठे कोडेच आहे. अशा बातम्या आंदोलनाचा पुष्कळवेळा घात करतात, कारण पोलिस यंत्रणेला अशी लिखित स्वरूपात माहिती मिळताच आंदोलन मोडून काढण्याचा लिखित स्वरूपात आराखडा तयार करावा लागतो व तशी तयारी ठेवावीच लागते.

परिणामी आंदोलन चिघळते. येथेही तसेच झाले. संध्याकाळपर्यंत ‘पोलिस विरुद्ध आंदोलक’ असेच काहीतरी चित्र उभे झाले व पुढे आंदोलन चिघळले. नंतर पोलिसांनी आपल्या कृतीचे समर्थन करण्यासाठी ‘आंदोलक दारूच्या नशेत होते’ असे निवेदन दिले, ज्यासाठी त्यावेळचे त्यांचे माहिती अधिकारी आत्माराम देशपांडे यांना नंतर जाहीर माफी मागावी लागली.

Tribal Movements
Goa Weather: दक्षिण गोव्याला पावसाने झोडपले; वारा, पावसामुळे लाखाेंचे नुकसान

बाळांनो, खरे सांगतो... 25 रोजीच्या बाळ्ळी आंदोलनात नेमके काय काय मिळविले, याचा हिशेब विविध कोर्टांत आदिवासी आंदोलकांविरुद्ध दाखल केलेल्या अनेक गुन्ह्यांवरून करता येईल. कोर्टाच्या डायरीत नाही तो, आझाद मैदानावर झालेल्या पुढील दोन-तीन दिवसांच्या आंदोलनाचा.

‘निष्पक्ष चौकशीची हमी मिळेपर्यंत तुम्हा दोघांचे पार्थिव न स्वीकारण्याच्या मागणीवर आझाद मैदानावर झालेले ते आंदोलन. अशा तऱ्हेचे आंदोलन यापूर्वी कोकणी-मराठी वादावेळी झाले. काही कोकणी आंदोलकांचा गोळीबारात मृत्यू झाला होता व आंदोलकांनी त्यांचे पार्थिव थेट सभेच्या व्यासपीठावर आणले.

शेवटी सरकारलाही नमते घ्यावे लागले. मागच्या अनुभवावरून अशी मागणी करायची कल्पना मी दिली. पोलिसांना याचा काय परिणाम होईल, याची पूर्ण कल्पना होती. ‘ताबा घेत नसाल, तर आम्हीच विल्हेवाट लावू’ असे पिल्लू सोडून आपणा दोघांच्या नातेवाईकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

Tribal Movements
CM Pramod Sawant: पणजीतील सिमेंटच्या रस्त्यांचे काम पावसाळ्यातही चालणार :सावंत

त्याच्याही पुढे जाऊन पोलिसांनी ‘मृतदेहांचा उपजिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामा करावा’ अशी न्यायिक मागणी लिखित स्वरूपात ‘उटा’च्या वतीने डीनच्या कार्यालयात सादर करायला गेलेल्या गोविंद गावडेंविरुद्धच पोलिसांनी गुन्हा नोंद करून आंदोलन आयोजकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा नोंद करणारा साहाय्यक पोलिस निरीक्षक आज निरीक्षक झाला आहे.

हा गुन्हा नोंदविण्यावरून आजही मी त्याला चिडवतो. कारण कुणीही योग्य नियमाची मागणी करण्याची कृती ही सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हाच होऊ शकत नाही. पार्थिव स्वीकारले नाही तर आंदोलनाचे लोण पसरेल, या कल्पनेनेच पोलिस हादरले होते. त्यातूनच त्यांनी ही चूक केली.

भावनिक आंदोलनापुढे सरकार व पोलिस हतबल ठरतात, असे इतिहास सांगतो. शवागारात राहिलेल्या आपल्या दोन पार्थिवांनी सरकारला गुडघ्यावर आणले. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना अक्षरश: आझाद मैदानावर येऊन ‘उठाबशा’ काढाव्या लागल्या.

(‘गोमन्तक’मध्ये तसा मथळा होता) ओबडधोबड आंदोलनात जे शक्य झाले नाही, ते आपल्या दोघांच्या अदृश्य अस्तित्वाने शक्य करून दाखविले. आज कुणीही काहीही सांगो, त्या दोन दिवसांत आपण या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहात, असे सांगण्याच्या कुणीही परिस्थितीत नव्हते.

खऱ्या अर्थाने आपणा दोघांचे आत्मे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. आज आम्ही सर्वजण तुम्हा दोघांच्या हौतात्म्याचे वर्णन ‘बलिदान-आहुती’ या संकुचित शब्दांतून करत आहोत; पण आपल्या दोघांच्या आत्मारहीत शरीरांनी (म्हणजे मृतदेहांनी) जो इतिहास घडविला, त्याचे वर्णन शब्दांपलीकडचे आहे.

आपणा दोघांचे जाणे, हे एखाद्या संताने समाधी घेण्यासारखे होते. आपल्या स्वर्गीय शौर्याला आम्ही आपणा दोघांना ‘संतपद’ द्यायला विसरलो, त्याबद्दल बाळांनो, आम्हाला माफ करा. (पूर्वार्ध)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com