
हरमल: मांद्रेतील प्रसिद्ध जुनसवाडा, आश्वे, मोरजी आदी समुद्रकिनारे सध्या कचरा, दुर्गंधी आणि बेफिकिरीमुळे विदारक अवस्थेत पोहोचले आहेत. जुनसवाडा किनाऱ्याची तर विदायक स्थिती आहे. पर्यटन हंगाम सुरू होण्याआधीच या किनाऱ्यांची बकाल अवस्था असल्याने नागरिक, पर्यटक आणि निसर्गप्रेमींमध्ये संताप उसळला आहे.
जुनसवाडा किनाऱ्यावर प्रचंड प्रमाणात कचरा साचला असून त्याची उचल करण्यात आली नसल्याने या किनाऱ्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. कित्येक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.
पंचायत स्तरावर काही प्रमाणात कचरा नियंत्रण होत असले तरी किनाऱ्याची स्वच्छता राखण्यासाठी पर्यटन खात्याने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. किनारे स्वच्छ व सुरक्षित असतील तरच पर्यटन व्यवसाय फुलू शकतो आणि स्थानिक व्यावसायिकांना आधार मिळू शकतो, असे नागरिकांचे मत आहे.
किनाऱ्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग
दुर्गंधी व अस्वच्छता
पर्यटन हंगामाआधीच बिकट अवस्था
सफाई कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा
पर्यटन खाते किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी कोटींची कंत्राटे देते. परंतु खरंच स्वच्छता होते का याची खात्याला कसलीही फिकीर नसते. त्यामुळे पैशांचा चुराडा होतो आणि पर्यटनावर विपरीत परिणाम होतो, असे स्थानिक युवक तुषार गोवेकर याने स्पष्ट केले.
खाण उद्योग कोसळल्यानंतर गोव्याची आशा पर्यटनावर टिकली आहे. बेरोजगार युवकांसाठी पर्यटन व्यवसाय हा जीवनरेखा आहे. सरकार नोकऱ्या देण्यात अपयशी ठरले, तरी निदान पर्यटन व्यवसायाला आधार द्यावा, अशी मागणी होत आहे. सरकार व पर्यटन खाते झोपी गेले आहे. या निष्काळजी कारभाराचा फटका गोव्याच्या जागतिक प्रतिमेला बसू नये, अशी अपेक्षाही निसर्गप्रेमी आणि स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
आश्वे व मांद्रे हे दोन समुद्रकिनारे गोव्याच्या पर्यटन नकाशावर आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करणारे ठरले आहेत. पण याच किनाऱ्यांवर आज मोठ्या प्रमाणात केरकचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, पर्यटकांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे. यावर उपाय म्हणून आम आदमी पक्षाचे नेते अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी स्वतः किनाऱ्याची पाहणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली. पर्यटन खाते लाखो रुपयांचे टेंडर देते, पण प्रत्यक्षात कंत्राटदार कचरा उचलत नाही. मग पैसा जातो कुठे?, असा जळजळीत सवाल त्यांनी केला.
ॲड. शहापूरकर म्हणाले, आम्ही १५ सप्टेंबर रोजी पर्यटन खात्याला लेखी निवेदन देणार आहोत. जर २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनापूर्वी किनारा स्वच्छ केला नाही तर आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत पुढाकार घेऊन स्वतः हा कचरा उचलू. या किनाऱ्यांमुळे गावात आर्थिक भरभराट, रोजगार आणि व्यवसाय वाढले आहेत. तरीसुद्धा सरकारी यंत्रणेकडून बेफिकीरपणा चालू आहे. देश-विदेशातील पर्यटकांना आम्ही जाहिरातींनी बोलावतो, पण ते आल्यावर त्यांचे स्वागत कशाने होते... कचऱ्याच्या राशींनी, असा टोला शहापूरकर यांनी लगावला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.