
Mandrem former sarpanch Mahesh Konadkar assault case
मोरजी: मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्या हल्लेखोरांना २४ तासांत अटक करावी. तसे न झाल्यास कायदा सुव्यवस्था बिघडून एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याला पूर्ण जबाबदार सरकार आणि पोलिस असतील, असे मांद्रेतील लोकांनी ठासून सांगितले. केवळ पोलिस निरीक्षकांची बदली करून हे प्रकरण मिटणार नाही. त्यासाठी पोलिसांनी हल्लेखोरांना पकडून आणावे आणि कोणी सुपारी दिली त्याचे नाव जाहीर करावे, मांद्रे पोलिस स्थानकावर धडक देऊन निरीक्षक चिमुलकर यांना निवेदन सादर केल्यानंतर हे मोर्चेकरी लोक पत्रकारांशी बोलत होते.
ॲड. प्रसाद शहापूरकर यांनी तर मांद्रे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बिघडवण्यास हातभार लावल्याचा आरोप केला. पोलिस स्थानकावर येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना (Citizens) योग्य वागणूक दिली जात नाही. विनाकारण निरपराध लोकांना मारहाण करण्याचे प्रकारही येथे घडले आहेत. आणखी हंसे होऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी ताबडतोब हल्लेखोरांच्या मुसक्या आवळाव्यात, असेही मोर्चेकरी म्हणाले.
माजी सरपंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक यांनी सांगितले की, असा प्रकार मांद्रे गावात प्रथमच घडला आहे. एका माजी सरपंचावर खुनी हल्ला करणारे गुन्हेगार कोण आहेत? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी गृहखात्याअंतर्गत चौकशी करावी. अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सरकारच जबाबदार राहील. दरम्यान, मांद्रे पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात भारतीय दंड संहितेचा ३५२, ११८ (१), २६ (२) ३२४ (२) या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. दुसरीकडे हे हल्लाप्रकरण एका वेगळ्याच प्रकरणातून घडल्याची चर्चा सुरू आहे.
दिवसाढवळ्या एका माजी सरपंचावर खुनी हल्ला होतो आणि संपूर्ण दिवस हल्लेखोरांचा शोध लागत नाही, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. सर्वसामान्य नागरिकांना कायद्याची भीती आहे, मात्र गुन्हेगारांना नाही. म्हणूनच त्यांच्याकडून असे हल्ले होत आहेत. नंबर प्लेट बदलून कार येते काय, त्यातून पाचजण बुरखा घालून उरतात काय आणि हल्ला करून निघून जातात काय! एखाद्या चित्रपटाला शोभावा असा हा प्रकार मांद्रेत घडला आहे. सरकार (Government) आणि पोलिसांवरील लोकांचा विश्वास कायम राहावा असे वाटत असेल तर गुन्हेगार लवकरात लवकर गजाआड झालेच पाहिजेत, असे पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले.
माजी आमदार दयानंद सोपटे व विद्यमान आमदार मायकल लोबो यांच्यामार्फत आज सायंकाळी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने मांद्रे पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांची तातडीने बदली केली. परंतु केवळ त्यामुळे हे प्रकरण मिटणार नाही. हल्लेखोरांना पोलिसांनी २४ तासांत अटक करावी किंवा नंतर होणाऱ्या परिणामांना जबाबदार रहावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.