भाद्रपद महिन्यांतील अमावास्या संपते, गोव्यात (Goa) नवरात्रोत्सवाला (Navratri Festival) आरंभ होतो. आश्विन मास अवतरतो. त्याच्या शुध्द प्रतिपदेपासूनच नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रोत्सवात गोव्यातील प्रमुख मंदिरांत मखरोत्सवाचा सोहळा होतो. हा नवरात्रोत्सव पूर्णत: निगडित आहे देवी दुर्गेशी. विश्वव्यापक, त्रिगुणात्मक आदिमायेचं सर्वप्रथम प्रकटलेलं सगुण रूप म्हणजे देवी दुर्गा.मखरोत्सव हा शिव आणि शक्तीचा सोहळा. या प्रकारचा सोहळा भारतात अन्य कुठल्याही मंदिरात होत असेल ह्याची शंकाच आहे. नवरात्रौत्सव हा प्रमुखपणे देवीचाच उत्सव असला तरी गोव्यात हा उत्सव पुरुष देवांच्या मंदिरातसुध्दा साजरा केला जातो.
आंवळी भोजन, नौकारोहण आणि मखरोत्सव ही गोव्यांतील मंदिरांतील वैशिष्ट्ये. देवदेवतांना वनभोजनाला नेणे, नौकारोहणाच्या निमित्ताने मंदिरांजवळच्या तळींत नौकेवर बसून जलविहार करणे आणि मखरोत्सवाच्या निमित्ताने मखरांत बसून झोके देणे असे देवदेवतांच्या रंजनाचे आणि क्रीडाप्रकार गोव्यातच आयोजिले जातात. नवरात्रोत्सवांत मंदिरांत एका विशिष्ट जागेवर माती पसरवून नऊ कडधान्यांच्या बिया रुजवणीला घातल्या जातात. समोर एक पाणी भरलेला कलश ठेवला जातो आणि घटस्थापनेला सुरुवात होते. ह्या कलशाला प्रत्येक दिवशी झेंडूची माळ घातली जाते. जितक्या रात्री येतात त्यानुसार ह्या माळांची संख्या वाढते. गोव्यात नवदुर्गा बोरी आणि मडकई, शिरोडेची कामाक्षी, म्हार्दोळची म्हाळसा, बांदोडेची महालक्ष्मी, रामनाथीचा रामनाथ, मंगेशीचा मंगेश आणि नागेशीचा नागेश हे मखरोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. त्याच्या अगोदर प्रत्येक रात्री या मंदिरांत प्रसिध्द कीर्तकारांची कीर्तने आयोजित केली जातात.
बोरीतील आणि मडकईतील नवदुर्गा वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ होते. उदाहरणार्थ सिंह, गरुड, मोर इत्यादी. बोरीतील नवदुर्गेची या वाहनावर आसनस्थ होण्याची अदासुध्दा दर दिवशीं बदलली जाते. मडकईतील नवदुर्गा नवरात्रौत्सवाच्या शेवटच्या दिवशी महिषासुरमर्दिनीचे रूप घेते, तर मंगेशीचा मंगेश म्हाताऱ्याचं रूप धारण करतो.
देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला, म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाची पूजा नवरात्रौत्सवात केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार व खडग ही शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रौत्सवात भारतात काही ठिकाणी पूजिली जाते.
घंटानाद, चौघुडा, ढोल-ताशे या वाद्यांच्या गजरांत मखरात बसलेल्या देव-देवतांचे विशिष्ट पध्दतीने झोके घेतानाचे दृश्य विहंगम, नयनरम्य व भावविभोर असते. भक्तभाविक हे दृश्य डोळे भरून अनुभवायला मंदिरांत गर्दी करतात. आवर्जून पहाण्यासारखा हा दिव्यत्वाच्या प्रकाशाचा विलक्षण असा अपूर्व सोहळा असतो!
- सखाराम बोरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.