Mahdayi River: म्हादई पाणी लवाद अधिकारिणीने कर्नाटक सरकारला सुर्ला नाल्यातील पाणी वळविण्यास अंतिम मंजुरी दिली नसली तरी हे पाणी कळसा नाल्यातून वळविण्याचे कारस्थान कर्नाटक सरकारने रचले असून त्यांचा हा डाव साधल्यास गोव्याच्या पाणी पुरवठ्यावर आणखी भीषण परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Mahdayi Water Dispute)
म्हादई पाणी वाटप लवादाने कर्नाटकला 1.72 टीएमसी पाणी वळविण्याची परवानगी 2018 साली दिली होती. हलतरा धरणातून हे पाणी वळविण्याची तरतूद होती. मात्र, कर्नाटक सरकार अन्य मार्गांतूनही पाणी वळविण्याच्या योजना आखत असून सुर्ला येथून पाणी वळविण्याचे कारस्थान त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जाते.
म्हादई खोऱ्यातील जल आणि प्राणी संपदेसाठी हे प्रवाह अत्यंत महत्त्वाचे आहेत. या भागात असलेले वाघ, अस्वले, बिबटे आणि अन्य प्राण्यांचा अधिवास असलेला हा भाग याच पाण्यावर मुख्यतः अवलंबून आहे. सुर्लाच्या प्रवाहावर सहा बंधारे घालून हे पाणी कळसा नाल्यातून मलप्रभेत वळविण्याचे हे कारस्थान कर्नाटकने रचले आहे.
...तर ‘हे’ धबधबे नामशेष
चोरवेशची नाडी, मान व्हाळ आणि इतर प्रवाह सुर्ला नाल्याला येऊन मिळतात. पुढे त्याच पाण्यातून गोव्यात बाराजण धबधबा आणि नंतर लाडकेचा धबधबा आणि जळवाटेचा धबधबा तयार होतो. सुर्ला नाल्याचे पाणी कर्नाटकने वळविल्यास या तिन्ही महत्त्वाच्या धबधब्यांचे गळे दाबले जाण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.