Mahadayi Water Dispute : म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्यामुळे गोव्यावर होणारे संभाव्य परिणाम, या विषयावर अधिकाधिक लेखन व मुद्दे समोर येत आहेत. पूर्वीप्रमाणे मर्यादित माध्यमे नसल्यामुळे आता हे मुद्दे दाबून टाकणे सरकारलाही अशक्य होत आहे. प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाइलवर दररोज या विषयी काही ना काही माहिती येतच असते. जनजागृतीचे हे नवीन माध्यम फारच प्रभावी आहे.
‘म्हादईचे पाणी वळवल्याचा पहिला फटका सत्तरीलाच बसणार आहे, त्यामुळे आम्ही त्याविषयी अधिक जागरूक आहोत. विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये’, असे आमदार दिव्या राणे यांनी म्हटले. पण, सत्तरीला सर्वांत अधिक व पहिला फटका बसेल; त्यामुळे आम्ही विरोधकांपेक्षा अधिक जागरूक, प्रामाणिक आहोत, असे त्यांनी म्हणणे एक राजकीय मत म्हणून त्यांच्यापुरते योग्य आहे.
पण, म्हादई नदीचा प्रश्न तेवढ्यापुरता मर्यादित नाही. त्याचे अनेक पैलू व संपूर्ण गोव्यावर होणारा परिणामही लक्षांत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी आंदोलन होणे, त्याचे राजकारण होणे स्वाभाविक आहे. पण, या प्रश्नाला तेवढ्यापुरतेच मर्यादित ठेवणे अधिक घातक आहे. याचे परिणाम अनेक स्तरांवर होणार आहेत, म्हणून त्याविषयी विचार व त्याचा विरोधही अनेक स्तरांवर होणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे, म्हादईसाठी आंदोलन हे केवळ ‘सत्तेत असलेल्या सरकारला विरोध’ असे समजण्याचे काही कारण नाही.
म्हादईचे पाणी वळवल्याने जैवविविधता, पर्यावरण आणि मनुष्य या सर्वांवर परिणाम होणार आहे. हा संभाव्य परिणाम विनाशापर्यंत घेऊन जाणाऱ्या शृंखलेसारखा (चेन रिअॅक्शन), एकातून एक असे करीत जाणारा असेल. ‘वळवले एवढेसे पाणी, म्हणून एवढे काही होणार नाही’, अशा भ्रमात राहणे चुकीचे ठरेल. त्यासाठी परिणामांच्या शृंखलेचा प्रत्येक भाग पडताळणे व त्या दृष्टिकोनातून जिथे सुरुवात झाली (म्हादईचे पाणी वळवणे) तिथे उपाय करणे आवश्यक आहे.
परिणामांच्या शृंखलेत केवळ म्हादईशी संलग्न भागच येतो असे नाही, तर झुआरीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने उत्तर गोव्याइतकाच धोका दक्षिण गोव्यालाही आहे.
म्हादईत झालेल्या कोणत्याही बदलांचा परिणाम झुवारीवरही निश्चितच होतो. त्यामुळे, पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने जे परिणाम म्हादईवर होतील, तेच परिणाम झुवारीवरही होणे क्रमप्राप्त आहे. पाणी वळवल्यामुळे प्रवाही नवीन पाणी कमी प्रमाणात गोव्यात येईल. त्याचा परिणाम क्षारता वाढण्यात होईल. ही वाढलेली क्षारता दोन्ही नद्यांच्या संगमापर्यंत म्हणजे कुंभारजुव्यापर्यंत पोहोचून झुवारी नदीतही क्षारता वाढेल, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कुंभारजुवा कालव्यामध्ये आणि आजूबाजूला, आपल्याकडे खारफुटींसारखी जैवविविधता आहे. निसर्गत: इतर प्राण्यांप्रमाणेच जलचरांमध्येही बदल करण्याची क्षमता असते. पण, त्यालाही काही मर्यादा आहेत. हळूहळू झालेले बदल काळाच्या ओघात स्वीकारले जातात. पण, अचानक वाढलेली क्षारतेशी जुळवून घेणे या प्रजातींना शक्य होणार नाही.
क्षारता वाढल्याचा लगेच परिणाम होणारी मत्स्यसंपदा झुआरी नदीत विपुल प्रमाणात आहे. ‘शेवटो’ हा त्यांपैकीच एक. गोड्या पाण्यातील मासळीवरच नव्हे तर पोहून इतरत्र स्थलांतर करू न शकणाऱ्या शिंपल्यांवरही त्याचा गंभीर परिणाम होणार आहे. चिखली व साकवाळ येथे झुवारीच्या खाडीत मोठ्या प्रमाणावर आढळणारी ‘विंडोपॅन ऑइस्टर’ ही शिंपल्यांची अतिप्राचीन जात(वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ‘परिशिष्ट 4’मधील प्रजाती), क्षारता वाढल्यास सर्वांत आधी संपून जाईल. केवळ मासे, शिंपलेच नव्हे तर या मासळीवर अवलंबून असणारे पक्षीही नष्ट होतील.
झुवारीच्या तुलनेत मांडवीच्या अनेक उपनद्या आहेत. त्यामुळे, दोन नद्यांच्या या संगम असलेल्या परिसंस्थेत खारटपणाचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असलेले गोड्या पाण्याचे सर्वाधिक प्रवाह म्हादईतून येतात. जास्तीत जास्त पिण्यायोग्य पाणीही म्हादईच पुरवते. म्हादई आटल्यास हे संतुलन बिघडेल. त्याचा परिणाम केवळ मत्स्यसंपदेवरच नव्हे तर पक्ष्यांवरही होईल. याचा एकत्रित परिणाम मच्छीमारांपासून पर्यटनावरही होणार आहे.
‘आवडीने मासे खाणाऱ्या व खाऊ घालणाऱ्यांचा प्रदेश’, अशी गोव्याची ख्याती आहे. तीही उरणार नाही. श्रावणात शाकाहारी राहण्याचे अग्निदिव्य करणाऱ्या गोमंतकीय मत्स्यप्रेमींना, अन्य दिवसांत मासळीशिवाय राहणे अजिबात शक्य नाही. प्यायला पाणी नाही, खायला मासळी नाही, अशा अवस्थेत पोहोचू नये म्हणून प्रसंगी गोमंतकीय युद्धही करतील.
‘आगामी काळातील युद्धे पाण्यासाठी होतील’, आता आठवत नाही हे कुणी व कुठे म्हटले आहे ते, पण विचार खरेच विचार करण्यासारखा आहे. जमीन, सत्ता, संपत्ती व संस्कृतीचा विनाश करण्यासाठी प्राचीन काळापासून युद्धे झाली. यात सामान्य माणसाला तात्कालिक किंवा फारसा फरक पडत नसे. ‘पाणी’ हा असा विषय आहे, ज्याच्या झळा सामान्य माणसाला पहिल्यांदा आणि राज्यकर्त्यांना नंतर बसतात. याचाच प्रत्यय आज विर्डीत म्हादई नदीसाठी उचंबळलेल्या विराट जनसागराने दाखवून दिला आहे. जसे म्हादईचे परिणाम झुवारीवर होतात, तसाच उत्तरेतला हा म्हादईसाठीचा जनक्षोभ दक्षिणेत झुवारीसाठीही होणे क्रमप्राप्त आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.