Mahadayi Water Dispute: ‘म्हादई बचावा’साठी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने सत्तरी तालुक्यातील ठाणे येथून सुरू केलेल्या पदयात्रेवर आज पहिल्याच दिवशी म्हाऊस पंचायतीने आक्षेप नोंदवल्याने सायंकाळी ती प्रशासनाने रोखली.
तीन तासांनंतर तेथील वादावर पडदा पडला. परंतु, त्यानंतर सदर यात्रा कोपार्डे येथे पोहोचली असता, काही जणांच्या तक्रारीवरून प्रशासनाने पुन्हा अटकाव केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
कोणी आक्षेप नोंदवला याचा खुलासा करावा, अशी मागणी करत ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आरजीने माघार घेतली. या प्रकरणी आज सुनावणी होणार असून, काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
‘आरजी’ची यात्रा 28 फेब्रुवारीपर्यंत 100 किलोमीटर अंतर पार करणार आहे. सोमवारी पदयात्रा ठाणे येथे येताच वाळपई पोलिसांनी आक्षेप घेत रोखली. म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे यांनी शासनदरबारी आक्षेप घेतल्याने पदयात्रा रोखत पोलिसांचा फौजफाटाही ठाणे येथे दाखल झाला.
संयुक्त मामलेदारांसह उपजिल्हाधिकारी परब यांनी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून परवानगीसाठी निवेदन देण्याचे सूचित केले. त्यानुसार आरजीने निवेदन सादर केले व शांततेत पदयात्रेला प्रारंभ झाला.
असे घडले नाट्य
ठाणे येथून पदयात्रा मार्गक्रमण करत पाली गावातून पुढे कोपार्डे येथे रात्री 8 च्या सुमारास पोहोचली. तेथे मैदानाजवळ यात्रा रोखण्यात आली.
त्याठिकाणी पुन्हा उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते दाखल झाले व पदयात्रेला परवानगी नसल्याचे पत्र मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांना सादर केले.
तुम्हा बाहेरील लोकांना कोपार्डे गावातून यात्रा काढता येणार नाही, असे सुनावले. म्हादई बचावासाठी आम्ही समर्थ आहोत, असे लोकांनी सांगितले.
यावरून बराच वादंग झाला. ही हुकूमशाही असल्याची टीका ‘आरजी’कडून करण्यात आली.
एकाएकी तणाव, आज सुनावणी
पदयात्रा रोखल्याने ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी कोपार्डेत रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. ज्या लोकांनी पदयात्रा रोखली आहे, त्यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी केली.
जोपर्यंत कारवाई करून तक्रारदार नागरिकांची नावे सांगत नाहीत, तोवर हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कायदा-सुव्यवस्थेसाठी पाऊल उचलले असल्याचा प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला.
या प्रकरणी उद्या (मंगळवारी) दुपारी 3 वाजता सुनावणीसाठी हजर राहा, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी रात्री 11 वाजता स्पष्ट केले.
त्यानंतर आरजीच्या नेत्यांनी माघार घेत रस्ता मोकळा केला.
या प्रकारानंतर आरजीतर्फे रात्री उशिरा वाळपई पोलिसांत चौघांविरोधात तक्रार दिली. पुढील दिवसांत यात्रा सत्तरीतून मार्गक्रमण करणार आहे. त्यावेळी स्थिती कशी राहिल, याकडे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.