‘म्‍हादई’चे अंतरंग टिपणारी नदीवाली बाई; ज्यांचं पुस्तक वाचून थेट CM सावंत यांनी केला फोन

विधानसभेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी म्हादई मुद्द्यावर भाष्य करताना एका पुस्तकाचा उल्लेख केला तो म्हणजे अंतरंग म्हादईचे. या पुस्तकाच्या लेखिकेची मुलाखत.
Shubhada Chari
Shubhada ChariDainik Gomantak
Published on
Updated on

आसावरी कुलकर्णी

म्‍हादईवर आलेल्या संकटामुळे गेले महिनाभर गोव्यात नुसता गदारोळ चालू आहे. नुकतंच अधिवेशनादरम्यान विधानसभेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी म्हादई मुद्द्यावर भाष्य करताना एका पुस्तकाचा उल्लेख केला तो म्हणजे अंतरंग म्हादईचे. दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं हे म्‍हादईवरच पुस्तक अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलं आणि पुस्तकाची लेखिका शुभदा चारी हे नाव गोमंतकाला कळलं. या पुस्तकाद्वारे म्‍हादई नदीच्या उगमापासून ते समुद्राला भेटे पर्यंतचा प्रवास शुभदाने शब्दांकित केला आहे. काठावरच्या पर्यावरणीय तसेच सांस्कृतिक जीवनावरही याद्वारे तिने प्रकाश टाकला आहे. गेली 10 ते 12 वर्ष राजेंद्र केरकर यांच्या “गुरुकुलात” शिकणारी शुभदा. या तिच्या पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘दैनिकगोमन्तक.कॉम’ने तिच्याशी संवाद साधला.

शुभदा सर्व प्रथम तुझं अभिनंदन! या क्षणी तुला काय वाटतंय?

शुभदा : खरं सांगायचं तर आत्ता मला स्वप्नात असल्यासारखं वाटतंय, मला कल्पनाही  नव्हती की मी केलेल्या कामाची अशा प्रकारे दखल घेतली जाईल. म्‍हादईच्या चळवळीत माझा खारीचा वाटा असावा म्हणून मी काम करत राहिले, आजही करतेच आहे, पण आज या प्रसंगामुळे ते जगासमोर येतंय याचा आनंदच आहे.

Shubhada Chari
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नी अनेक मंत्री, आमदारांचे अज्ञान उघड!

तुझ्या वैयक्तिक जीवनाबाबत सांगशील?  

शुभदा : आमचं मूळ गाव महाराष्ट्रातील पाटये जे तिलारी जलप्रकल्पात पाण्याखाली गेलं. त्याही पूर्वी अंजुने धरण प्रकल्पात बुडालेलं पणसुले गाव हे माझ्या पूर्वजांचे गाव. तिथून विस्थापित होऊन ते पाटये गावात आणि नंतर दोडामार्ग येथे स्थायिक झाले. माझा जन्म म्हावळीगे येथे झाला. पहिली ते आठवी हे शिक्षण महावलिंगे येथील सरकारी प्राथमिक शाळा आणि रावजी राणे विद्यालय येथे झाल. इयत्ता नववी आणि दहावी साळ खोलपे येथील शिवाजी राजे विद्या मंदिरात झालं. ज्ञानप्रसारक हायर सेकंडरी असनोड इथे बारावी पर्यंत तर पदवी पर्यंतचे शिक्षण सरकारी महाविद्यालय साखळी इथे झालं. वडील समाजीकबंधकाम खात्यात नोकरीला होते. दोन बहिणी आणि भाऊ आई वडील असा आमचा परिवार.

Shubhada Chari
Shubhada ChariGomantak Digital

लिखाणाकडे कशी वळलीस, याबाबत सांगू शकशील?

शुभदा: शाळेत असताना मी पहिला नंबर कधीच सोडला नाही. शाळेतील शिक्षकांनी नेहमीच प्रेरणा दिली. त्यामुळे इयत्ता सहावी पासून काहीतरी लिहायचा प्रयत्न सुरूच होता. पण त्याला वळण नव्हतं. अकरावीत असताना पौर्णिमा केरकर टीचर आणि राजेंद्र केरकर सर म्हणून शिकवायला होते. त्यांच्या शिकवण्यामुळे इतिहास, कला संवर्धन आणि लेखनात प्रेरणा मिळाली.  आणि याच प्रेरणेतून लिहायला सुरू केलं. राजेंद्र केरकर आणि पौर्णिमा केरकर यांच्या सहवासात लेखणी बहरत गेली.

पर्यावरण प्रश्न आणि कला संवर्धन याकडे कशा वळालात?  

शुभदा : मी आधी म्हटल्याप्रमाणे राजेंद्र केरकर सर आणि पौर्णिमा टीचर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यशाळा केल्या. राजेंद्र सरांसोबत म्‍हादईसाठी किंवा इतर प्रश्नासाठी रस्तानाट्य, कार्यशाळा केल्या. यातूनच हे काम करण्याची प्रेरणा मिळाली. विवेकानंद पर्यावरण जागृती फौज, विवेकानंद कला संवर्धन मंच याचा भाग झाल्यामुळे, या सगळ्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यायला मिळाला. आणि जीवनात हेच करायच हे पक्क केलं.

Shubhada Chari
Mahadayi Water Dispute: ‘म्‍हादई’ तरी सारखे म्‍हणा!

आपण तुझ्या पुस्तकाकडे वळू, पुस्तक लिहावं आणि तेही इतक्या गहन विषयावर अस का वाटले?

शुभदा: बीएच्या दुसऱ्या वर्षाला असताना सुट्टीत राजेंद्र केरकर सरांनी मला assistant म्हणून काम दिल. धनगर गवळी या प्रकल्पासाठी ते काम होते. यामुळे मी राजेंद्र केरकर यांच्या घरीच वास्तव्यास आले.  त्यांचं घर म्हणजे आमच्यासाठी गुरुकुलच आहे. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना या गुरुकुलात निसर्ग संवर्धनाचे धडे मिळतात. त्यांच्यासोबत काम करताना गोव्यातल्या नद्यांचे दर्शन घडले. म्‍हादईच नव्हे तर 12 नद्या आणि त्यांच्या उपनद्या जवळून बघायला मिळाल्या. राजेंद्र भाईंनीच फोटोग्राफी शिकवली. हे सगळं फिरताना नकळतच नोंद करत गेले... मनात, वहिवर आणि अर्थात कॅमेऱ्यामध्ये. पण यावर लेख लिहावे अस कधीच ठरवलं नव्हतं. पण नदी माझ्या जीवनात जन्मापासूनच होती.

लहानपणापासून नदी किनारी वाढल्यामुळे अगदी अंगाई म्हणून नदीची खळखळ ऐकूनच वाढले. ती कुठंतरी सतत मनात असायची सखी सारखी. एका दैनिकाने लेखमालेसाठी विचारणा झाली तेव्हा राजेंद्र सरांना विचारलं की कुठला विषय घेऊ, त्यावेळी त्यांनी सुचवलं की नदीवर लिही, तुझ्याकडे इतकी माहिती आहे. खरंतर मन तयार होत नव्हतं. एवढा कठीण विषय कसा काय हाताळता येईल मला ही भीती होती पण मिळवलेल्या माहितीच्या आधारावर अंतरंग लोकमातांचे ही नदीवरील लेखमाला सुरू केली.  तीन महिन्यात संपेल अस वाटत असताना ही लेखमाला साडेतीन वर्ष चालली. सर्व नद्या त्यांच्या उपनद्या यावर लिहिले. पण म्‍हादईवर लिहिताना लक्षात आलं की खूप काही लिहिता येऊ शकत म्‍हादई उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत कितीतरी पैलू आठवत गेले, म्‍हादईच्या चळवळीतील दुवे आठवत गेले आणि लेखणीतून उतरत गेलं. मार्गदर्शन करण्यासाठी सर होतेच. शिवाय इतर साथीदारही होते.  लेखमाला पूर्ण झाल्यानंतर सरांनी पुस्तक छापण्याविषयी सूचना केली, आणि हस्तलिखित मराठी अकादमीच्या पुस्तक प्रकाशन उपक्रमात मी हे सादर केले. प्रत्यक्षात पुस्तक छापताना त्यात फोटो लागतील, इतर मान्यवर लेखकांचे मार्गदर्शन लागेल हे लक्षात आलं आणि वर्षभराच्या अथक प्रयत्नानंतर पुस्तक छापून तयार झालं.

Shubhada Chari
Shubhada ChariGomantak Digital

पुस्तकाला प्रतिसाद कसा मिळाला? (Goan literature)

शुभदा: खरंतर पुस्तकाची तशी शोकांतिकाच झाली. कोरोना काळामुळे या पुस्तकाचं प्रकाशन रखडले होते. शेवटी अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत 22 एप्रिल 2021 रोजी या पुस्तकाचं प्रकाशन डॉ प्रदीप सरमोकादम यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यांनी पुस्तकाचं कौतुक केलं आणि लगेच पुस्तकांच्या प्रति विकत घेतल्या. पण त्यानंतर फार काही विक्री झाली नाही. महाराष्ट्रातील आणि इतर काही भागातील लायब्ररीमध्ये मी ही पुस्तक पाठवली. कित्येक मोठ्या लोकांना मी या पुस्तकाची प्रत भेट म्हणून दिली.त्यानी या पुस्तकाच कौतुकच केलं.

या पुस्तकासाठी माहिती मिळवताना काही संदर्भ घेतले का?

शुभदा: हो. या विषयावरच्या अनेक वर्तमानपत्रातल्या आणि शोध निबंधाचा अभ्यास मी केला.  डॉ. प्रकाश पर्येंकर , डॉ. नंदकुमार कामत तसेच राजेंद्र केरकर यांच्या लेखांचा अभ्यास केला.  यातूनच पुस्तकाची निर्मिती झाली.

म्‍हादईविषयी आत्ता चाललेल्या एकूण गदारोळाबद्दल काय वाटते, ज्या पद्धतीने हा विषय हाताळायला हवा होता तो तसा हाताळला जातो अस वाटते का? (Mahadayi river Dispute)

शुभदा: म्‍हादई ही आमची जीवनदायिनी आहे या नदीच्या खोऱ्यात कुठलीही ढवळाढवळ झाली तरी गोव्यावर त्याचे वाईट परिणाम होणार आहेत. विस्थापितांचं दुःख काय असत हे मला विचारा. अधिवास नष्ट होतो तेव्हा तुमचं अस्तित्व संपून जात, तुम्ही जिथे कुठे नवा अधिवास कराल तिथे तुम्ही उपरेच उरता, तुमचा आत्मसन्मान गाडला जातो धरणाच्या पाण्यात ही भळभळती जखम घेऊन कित्येक विस्थापित जगताहेत. त्यामुळे हा विषय गंभीरच आहे. पण दुर्दैवाने आता जे कुणी पोट तिडकीने बोलताहेत त्यांना खूप उशीर झाला आहे. राजकारणावर मी बोलणार नाही. पण आत्ता गरज आहे निर्णायक लढ्याची. कर्नाटक खूप जलद गतीने पाणी वळविण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे कायदेशीर आणि संशोधनावर आधारित ठोस पुराव्यानिशी आता ही लढाई लढणं गरजेचं आहे.

आपल्या गोव्यात आपण तरी कुठे नदीचा मान राखतो. रेती व्यवसाय, खाण व्यवसाय, पर्यटन या मुळे नदीला आपण पार गटार करून टाकले आहे. या नद्यांना वाहू द्यायला हवं स्वतःच्या प्रवाहाने.बांध घातल्या मुळे पुरण शेती नष्ट झाली. असे कितीतरी अन्याय आपण नदीवर करतो आहोत. घोषणाबाजी आणि इतर मार्गाने नुसती ओरड करण्यापेक्षा या नद्यांना दत्तक घ्या आणि त्या वाचवा.

Shubhada Chari
Mahadayi River : ...अन्यथा गोव्याचे होईल वाळवंट!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुस्तकावर काय प्रतिक्रिया दिली?

शुभदा: त्यांनी आवर्जून हे पुस्तक वाचलं आणि मला बोलावून घेतलं, त्वरित 50 पुस्तक त्यांनी घेतली तसेच गोव्यातल्या सर्व वाचनालयामध्ये हे पुस्तक ठेवणार असल्याचंही सांगितलं. हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनुवादित करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार असल्याचंही ते म्हणाले. माझ्यासारख्या नदीसाठी कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या मुलीला हे भारावून टाकणार आहे. या चळवळीत मी केलेलं कार्य योग्य ठिकाणी पोहोचते आहे, तसेच ज्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले ती महादयीची माहिती लोकापर्यंत पोहचते आहे हे खूप भारी आहे. राजेंद्र सरांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला नुसतं घडवलंच नाही तर या स्थानावर पोहचवला हे माझं भाग्य आहे.

सध्या कुठल्या पुस्तकावर काम करत आहात?

शुभदा: इतर नद्यावरही मी काम केलेले आहे, आणि आमचं हे काम खरतर सुरूच आहे. अधिक मेहनत घेऊन पर्यावरणाचे रक्षण आणि त्याविषयीचे काम यातच मी मला झोकून दिलेलं आहे. त्यानिमित्ताने असे लेखन होतच राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com