गेल्या तीन दशकांपासून मडकई विधानसभा मतदारसंघात मगो पक्षाचे प्राबल्य आहे. स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे या मतदारसंघात वर्चस्व असून, ते सध्या भाजप सरकारमध्ये सामील आहेत.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघात ‘ऑल ईज वेल'' अशीच स्थिती आहे. मडकई मतदारसंघ हा मगो पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना या मतदारसंघात मताधिक्य मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मडकईत १९९९ पासून मगो पक्षाचे उमेदवार सुदिन ढवळीकर हे निवडून येत आहेत. विशेष म्हणजे ढवळीकर यांचे मताधिक्क्य वाढतच असल्याने येथे मगोचे प्राबल्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आणि आताही लोकसभा निवडणुकीत मगो व भाजपची मते एकत्रित धरली तर किमान ८० टक्के मते ही भाजप उमेदवाराला मिळतील, असे बोलले जात आहे.
सद्यःस्थितीत मडकई मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू आहे. आरजीवाल्यांनीही प्रचाराला सुरूवात केली आहे. पण काँग्रेसचा अजून पत्ताच नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी मगोने काँग्रेसला समर्थन दिले होते. पण नंतरच्या घडामोडींत भाजपवाल्यांनी मगोला सत्तेत सामावून घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली आणि या बदलत्या समीकरणांचा फायदा भाजपला होईल, असे दिसते.
राज्यात ‘आरजी’ने आपले अस्तित्व दाखवायला सुरूवात केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत फोंडा तालुक्यात या पक्षाने चांगली मते मिळविली होती. पण या लोकसभा निवडणुकीत तो करिश्मा कितपत दिसेल हे येणारा काळच ठरवणार आहे.
मुळात मतदानासाठी किती मतदार बाहेर पडतात, यावर सर्व काही निर्भर आहे. त्यातच मगोवाल्यांनी भाजपवाल्यांना शब्द दिल्याने यावेळी मगोचे कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करतील. मगोचे पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी कार्यकर्त्यांना चार दिवसांपूर्वी मडकईत झालेल्या प्रचारसभेत हाच कानमंत्र दिला आहे.
काँग्रेसला छाप पाडण्यात अपयश
सध्या तरी मडकई मतदारसंघात काँग्रेस पक्षाची तशी छाप नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे मगो पक्षाचे माजी आमदार लवू मामलेदार हे निवडणुकीत उभे राहिले होते, पण ते आपला कोणताच करिश्मा दाखवू शकले नाहीत. कोणताही प्रचार न करताच सुदिन ढवळीकर निवडून आले होते.
आता लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी आणि समीकरणे बदलत असली तरी त्याचा मोठा फायदा काँग्रेसवाल्यांना होईल, असे सध्या तरी चित्र नाही.
सध्या तरी मडकई मतदारसंघात काँग्रेस पक्षाची तशी छाप नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे मगो पक्षाचे माजी आमदार लवू मामलेदार हे निवडणुकीत उभे राहिले होते, पण ते आपला कोणताच करिश्मा दाखवू शकले नाहीत.
कोणताही प्रचार न करताच सुदिन ढवळीकर निवडून आले होते. आता लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी आणि समीकरणे बदलत असली तरी त्याचा मोठा फायदा काँग्रेसवाल्यांना होईल, असे सध्या तरी चित्र नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.