

मडगाव: कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर ड्यूटीवर असलेल्या एका सतर्क आरपीएफ (Railway Protection Force) कॉन्स्टेबलमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात हा प्रवासी घसरून खाली पडत असताना, आरपीएफ कॉन्स्टेबल कपिल सैनी यांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेतली आणि प्रवाशाला खेचून जीवदान दिले आणि सध्या या प्रसंगाचा व्हिडीओ समोर आला आहे.
मडगाव रेल्वे स्थानकावरील या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाला आहे. फुटेजनुसार, एक प्रवासी रेल्वेने वेग घेतल्यानंतर घाईगडबडीत गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वेगामुळे त्याचा तोल गेला आणि तो फलाट व गाडीच्या फटीत पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
प्रवासी घसरल्याचे आणि संकटात असल्याचे पाहताच, जवळच ड्युटीवर असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल कपिल सैनी यांनी क्षणभरही विलंब न करता त्या दिशेने धाव घेतली.सैनी यांनी अत्यंत वेगाने त्या प्रवाशाजवळ पोहोचून त्याला पकडले आणि फलाटावर सुरक्षितपणे खेचले.
जर सैनी यांनी तत्परता दाखवली नसती, तर तो प्रवासी गंभीर जखमी झाला असता किंवा मोठा अपघात झाला असता. कॉन्स्टेबल सैनी यांच्या या धाडसी आणि वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला. या घटनेनंतर प्रवाशाला प्राथमिक मदत देण्यात आली आणि त्याला पुढील धोका टाळण्याचा सल्ला देण्यात आला.
कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असलेल्या मडगाव येथे आरपीएफ जवान २४ तास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. कॉन्स्टेबल कपिल सैनी यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेमुळे प्रवाशांनी कधीही धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, या रेल्वेच्या सूचनांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.