सासष्टी: मडगाव ही गोव्याची व्यापारी राजधानी आहे, असे मानतात. गोव्यामध्ये जी आंदोलने झाली किंवा वाद झाले, त्याची ठिणगी मडगावमधून सुरू झाली. मडगावकर सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच कला, नाटक व संगीत या क्षेत्रांतील मूल्ये जपणारे आहेत. गोवा स्वतंत्र होऊन 60 वर्षे पूर्ण झाली तरी इतर क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रातील साधनसुविधा उभारण्यास मागेच राहिला, असे म्हणण्याची पाळी आली आहे. प्रत्येक शाळांमध्ये पालक-शिक्षक समित्या असल्या तरी मूळ प्रश्र्नावर कोणी विचार करताना दिसत नाही. (Madgaon lags behind in setting up educational facilities )
मडगावमधील सर्व शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्या तरी अपुऱ्या जागेमुळे त्यांना विस्तार करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. काही शाळा मडगावपासून दूर अशा ठिकाणी हलवल्या आहेत. त्यात भाटीकर मॉडेल हायस्कूल घोगळ येथील हाऊसिंग बोर्ड येथे हलवण्यात आले आहे. पॉप्युलर हायस्कूलसाठी एका दात्याने सोनसोडो-कुडतरी रस्त्यावर एक जागा दान केली आहे. सध्या शाळेच्या व्यवस्थापनाने तिथे इमारत बांधण्याचा विचार चालवला आहे. मात्र त्यासाठी आणखी कमीत कमीत दोन ते तीन वर्षे लागणार आहेत.
शाळांना मैदानच नाही...
सध्या मडगाव शहरात कमीत कमी 10 ते 12 शाळा आहेत व 2 ते 3 उच्चमाध्यमिक शाळा तसेच २ महाविद्यालये आहेत. या सर्व शैक्षणिक संस्थांच्या इमारती भव्यदिव्य नाहीत. शाळांना मैदानांची व्यवस्था नाही.
वाहतुकीची कोंडी नित्याचीच
प्रत्यक्ष मडगाव शहरात 100, 200 ते 500 मीटरच्या अंतरावर कमीत कमी 6 शाळा आहेत. या सर्व शाळा रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे सकाळी मुलांना शाळेत पोचवताना व शाळा सुटल्यावर मुलांना घरी नेताना वाहतुकीची कोंडी होत आहे. काही ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला जातो; पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. हे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
भूखंडावर अतिक्रमण
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी दवर्ली येथे सरकारने शैक्षणिक हबसाठी 3.25 लाख चौरस मीटर भूखंड शिक्षण खात्याच्या हवाली केला होता; पण नंतरची प्रक्रिया एकदम धिम्या गतीने सुरू झाली. या भूखंडावर लोकांनी अतिक्रमणही केले आहे. आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी प्राथमिक चर्चा केली असून, त्यांनी सर्व सहकार्य देणार असल्याचे सांगितल्याचे नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.