Vasco News : ‘कोस्‍मोपॉलिटीन’ मुळेच टक्‍का घसरला; वास्‍कोत मतदानाचे विश्‍लेषण

Vasco News : सध्‍याचा लग्‍नसराईचा मोसम असल्‍याने लग्‍नकार्ये पार पाडण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर हे परप्रांतीय आपल्‍या गावी गेल्‍याचा परिणाम मतदानावर झाला, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.
Vasco
Vasco Dainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

Vasco News :

मडगाव, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची सभा यंदा पहिल्‍यांदाच मुरगाव तालुक्‍यात आयोजित केल्‍यामुळे या तालुक्‍यात मतदान अपेक्षेहून अधिक होणार,अशी खात्री भाजप गोटातून व्‍यक्‍त केली जात होती. हे मतदान भाजपच्‍याच बाजूने होईल, अशीही अटकळ चर्चेत होती.

मात्र, प्रत्‍यक्षात काल या तालुक्‍यात फक्‍त ७२ टक्‍केच मतदान झाले आणि माेदींची जादू चालत नाही, हेही त्‍यामुळे स्‍पष्‍ट झाले. वास्‍को मतदारसंघात तर फक्‍त ६७ टक्‍के मतदान झाले.

या संबंधीची कारणमीमांसा करता वास्‍को शहराची ‘कोस्‍मोपॉलिटीन’ बांधणीच त्‍याला मुख्‍य कारण असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. वास्‍को हे बंदराजवळील शहर असल्‍यामुळे या शहरात केरळ आणि कर्नाटकातील लाेकांचा मोठ्या प्रमाणावर भरणा असून शिवाय उत्तर भारतीय लाेकांचाही त्‍यात मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

सध्‍याचा लग्‍नसराईचा मोसम असल्‍याने लग्‍नकार्ये पार पाडण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर हे परप्रांतीय आपल्‍या गावी गेल्‍याचा परिणाम मतदानावर झाला, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

कालची मतदानाची अंतिम आकडेवारी पाहिल्‍यास वास्‍को मतदारसंघात ६७.१० टक्‍के, दाबोळी मतदारसंघात ७१.१५ टक्‍के, कुठ्ठाळीत ७२.१६ टक्‍के तर मुरगावात ७४.१० टक्‍के मतदान झाले असून या तालुक्‍यातील सरासरी मतदान ७१.१२ टक्‍के एवढे आहे.

वास्‍कोचे आमदार दाजी साळकर म्‍हणाले, वास्‍कोतील कित्‍येक मतदार हे परप्रांतीय असून मे महिना हा मुलांच्‍या सुट्टीचा तसेच लग्‍नकार्याचा काळ असल्‍याने ते प्रत्‍येकवर्षी मे महिन्‍यात आपल्‍या गावी जातात. याहीवेळी तसेच घडले.

Vasco
Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

वास्‍कोतील सुमारे ३२ उत्तर भारतीय कुटुंबे विविध कारणांसाठी मूळगावी गेल्‍यामुळे ते मतदानापासून वंचित राहिले, असे त्‍यांनी सांगितले. या ३२ कुटुंबातील एकूण मतदारांची संख्‍या बरीच माेठी असून त्‍यांची अनुपस्‍थिती घसरलेल्‍या टक्‍केवारीत समाविष्‍ट झाली आहे, असेही ते म्‍हणाले.

वास्‍काेचे माजी आमदार जुझे फिलीप डिसोझा म्हणाले, कर्नाटक आणि गोव्‍यातील मतदान एकाच दिवशी असल्‍याने त्‍याचा फटका वास्‍काेतील मतदानाला बसला. ते म्‍हणाले, वास्‍कोत कर्नाटकातील असे कित्‍येक मतदार आहेत. ज्यांचे कर्नाटकातही मतदान आहे. कर्नाटक सरकारने आपल्‍या नागरिकांसाठी कित्‍येक सामाजिक योजना लागू केल्‍या आहेत. त्‍यामुळे कर्नाटकात जाऊन मतदान केले नाही तर आपण या योजनांपासून वंचित राहू ,अशी भीती त्‍यांना वाटल्‍यानेच गोव्‍यातील मतदान टाळून त्‍यांनी कर्नाटकात जाणे पसंत केले असावे, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

वास्‍कोतील खारीवाडा हा भाग ख्रिस्‍ती खारवी समाजाच्‍या मतदारांची भरणा असलेला भाग असून यातील कित्‍येक मतदार विदेशात किंवा बोटीवर कामाला आहेत. त्‍यांची नावे मतदारयादीत समाविष्‍ट असली तरी ते प्रत्‍यक्षात गोव्‍यात नाहीत. त्‍याचाही परिणाम या मतदानावर झालेला दिसतो.

मोदींच्‍या भाषणाचा प्रत्‍यक्षात विपरीत परिणाम?

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे भाषण ऐकून उत्तर भारतीय मतदार प्रभावित होतील आणि त्‍याचा फायदा भाजपला होणार, असे गृहितक लक्षात धरून सांकवाळ येथे त्‍यांची सभा भाजपने आयोजित केली होती. या सभेला उत्तर भारतीयांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर होती. मात्र, त्‍याचा फायदा मतदानांच्‍या रुपाने झालेला दिसला नाही.

उलट मोदींची कडवी हिंदूत्‍ववादी भाषणे ऐकून मुस्‍लिम मतदारांनी वास्‍कोत स्‍वत:हून बाहेर येऊन मतदान केल्‍याचे सांगितले जाते. सकाळच्‍यावेळी मतदान केंद्रावर मुस्‍लिम मतदारांची संख्‍या लक्षणीय होती. तसेच ख्रिस्‍ती मतदारांनीही मोठ्या संख्येने मतदान केले. कुठ्ठाळी मतदारसंघात ७२.१६ टक्‍के मतदान झाले आहे, ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.

काही मतदार नावालाच!

आमदार दाजी साळकर यांनी आणखी एका गाेष्‍टीकडे लक्ष वेधले. नौदल आणि इतर केंद्रीय आस्‍थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे मतदार म्‍हणून नोंद झालेली असली तरी यातील कित्‍येक मतदार येथे राहातच नाहीत. वास्‍कोत सुमारे ९०० नौदल अधिकारी मतदार आहेत. मात्र, प्रत्‍यक्षातील त्‍यांची संख्‍या फक्‍त ३५० एवढीच आहे, असे ते म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com