Loksabha Election 2024 : ‘आरजी’चा सापळा,पण ‘हात’ मोकळा!

Loksabha Election 2024 : काँग्रेसने अटी धुडकावल्‍या; भाजपचा डाव?
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 Dainik Gomantak

Loksabha Election 2024 :

पणजी काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीत सहभागी होण्यासाठी तीन अटी समोर ठेवत ‘आरजी’ पक्षाने रचलेला सापळा काँग्रेसने लगेच ओळखला व त्‍या सापळ्यात अडकणार नाही ते तासाभरातच स्पष्ट केले.

आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी आपला पक्ष अजूनही ‘इंडिया’ आघाडीत सहभागी होऊ शकतो असे सांगून काँग्रेसला एका राजकीय डावात अडकविण्याचा फासा फेकला होता.

परंतु राजकारण कोळून प्‍यायलेल्‍या काँग्रेसला हा डाव लक्षात येण्यास वेळ लागला नाही. त्‍या पक्षाचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी ‘‘आम्ही आरजीचा डाव ओळखला आहे आणि त्यात फसणार नाही’’ हे स्पष्ट केले. भाजपच्या सांगण्यावरून आरजीने हा डाव रचला होता, असा आरोपही त्यांनी केला.

‘आरजी’ पक्ष हा मतविभागणी करून भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक लढवत आहे या कॉंग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच्या आरोपाला कंटाळून आरजीने काँग्रेसवर राजकीय गुगलीचा मारा केला होता. आरजीने उपस्थित केलेल्या मुद्यावर मत प्रदर्शन केले तरी अडचण आणि दुर्लक्ष केले तरी अडचड अशी काँग्रेसची अवस्था झाली होती. पण काँग्रेसने काळाची पावले ओळखत आता आरजीलाच कोंडीत पकडले आहे.

Loksabha Election 2024
Salt Farming In Goa: ...तर मिठागर चालविणारी शेवटची पिढी! ज्योकिम काब्राल

आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ‘इंडिया’ आघाडीत सहभागी होऊन लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी तीन अटी घातल्या आहेत. त्यानुसार म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्प कर्नाटकातील काँग्रेस सरकारने रद्द केल्याची आणि म्हादईचे पाणी केवळ गोमंतकीयांसाठी असल्याचे आघाडीने राष्ट्रीय जाहीरनाम्यात आणि राष्ट्रीय पातळीवर पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे, कोमुनिदाद आणि सरकारी जमिनीवरील बेकायदा वस्त्या, बांधकामे पाडावीत आणि तसे आश्‍‍वासन राज्यस्तरीय जाहीरनाम्यात द्यावे व तिसरी अट म्‍हणजे मूळ गोमंतकीय कोण याची व्याख्या स्थानिक जाहीरनाम्यात जाहीर करणे. या अटी मान्य करण्यासाठी २० एप्रिलपर्यंतची मुदत त्यांनी काँग्रेसला दिली आहे.

दरम्‍यान, आरजीचा हा प्रस्‍ताव म्‍हणजे भाजपनेच काँग्रेस व आघाडीतील इतर पक्षांना अडकविण्‍यासाठी तयार केलेला सापळा आहे, असे म्‍हणत काँग्रेसने आरजीच्‍या तिन्‍ही मागण्‍या फेटाळून लावल्‍या.

...तर काँग्रेसची झाली असती पंचाईत!

म्हादईप्रश्‍‍नी लवादाने दिलेल्या निर्णयानुसार या नदीच्‍या पाण्यावर गोव्यासह महाराष्ट्र व कर्नाटकाचाही हक्क आहे. त्यामुळे कर्नाटकातील प्रकल्प गुंडाळण्याचे आश्वासन काँग्रेस पक्ष देऊच शकत नव्हता. कोणताही पक्ष कर्नाटकात सत्तेवर आला तरी तो प्रकल्प गुंडाळला जाणार नाही. त्यामुळे हा मुद्दा काँग्रेससाठी नव्हे तर कोणत्याही राष्ट्रीय पक्षासाठी अडचणीचाच ठरणार आहे.

सरकारी व कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदा बांधकामे पाडावीत अशी मागणीही काँग्रेसला मान्य करणे शक्य होणार नव्हते. कारण ही बांधकामे आताच उभी राहिलेली नाहीत तर ती गेली कित्येक वर्षे उभी आहेत. तेथे राहणारे आज मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांना नाराज करणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही.

तिसरा मुद्दा मूळ गोमंतकीय व्याख्येचा. ती व्याख्या केंद्र सरकारने याआधीच केलेली आहे. १९ फेब्रुवारी १९६८ पूर्वी गोव्यात वास्तव्यास असलेल्यांनाच राज्यात जातीचा दाखला मिळतो.

याचा अर्थ तीच तारीख खरा गोमंतकीय कोण यासाठी वापरण्यात येत आहे. यामुळे त्याची नव्याने व्याख्या करण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही हे ठरून गेलेले आहे. म्‍हणूनच आरजीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळणे ही केवळ औपचारिकता होती.

व्हेंबरमध्ये आम्ही इंडिया आघाडीच्या निमंत्रणाची वाट पाहत आहोत असे जाहीर केले होते. त्यानंतर आम्ही दोन्ही जागा जिंकल्यानंतर इंडिया आघाडीलाच पाठिंबा देऊ असे जाहीरपणे सांगितले होते.

१९ डिसेंबरला आम्ही आमचे उमेदवार जाहीर करून प्रचारास सरूवातही केली. तेव्‍हा काँग्रेसकडून, आरजीला आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला, पण तेच चर्चेला आले नाहीत असा अपप्रचार करण्यात आला. म्हणून आता आम्ही जाहीरपणे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इंडिया आघाडीत सशर्त सहभागी होण्याचा प्रस्ताव देत आहोत. त्यावर काँग्रेसने उत्तर द्यावे. - मनोज परब, ‘आरजी’ प्रमुख

केंद्रीय नेते प्रचारासाठी येणार गोव्‍यात

गोव्‍यातील दोन्‍ही जागा काँग्रेस जिंकणार असा विश्‍‍वास व्‍यक्‍त करताना ‘इंडिया’ आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. आम्‍ही केंद्रीय नेत्‍यांच्‍या संपर्कात आहोत. त्‍यांना जशी सवड मिळेल, त्‍याप्रमाणे ते गोव्‍यात प्रचारासाठी येतील. अजूनही केंद्रीय नेत्‍यांच्‍या बैठकांचे वेळापत्रक ठरलेले नाही. मात्र बहुतांश ज्‍येष्‍ठ नेते प्रचारासाठी येणार आहेत.

संपूर्ण देशात इंडिया आघाडीला लोकांकडून वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. त्‍यामुळे गोव्‍यातील दोन्‍ही जागा काँग्रेसच जिंकणार. इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आल्‍यास म्‍हादईबाबत योग्‍य तोडगा काढू. - माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रभारी

म्‍हादई वाचविण्‍यासाठी काँग्रेसने राज्‍यात जागृती सभा घेतल्‍या. म्‍हादईसाठी ज्‍यावेळी विरोधी पक्ष एकत्र आले होते, त्‍यावेळी आरजी बाजूला राहिला. त्‍यातूनच त्‍यांचा दुटप्‍पीपणा स्‍पष्‍ट होतो. - अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष

मडगावात ‘इंडिया’ आघाडीची बैठक:

इंडिया आघाडीच्‍या सर्व घटक पक्षांच्‍या स्‍थानिक नेत्‍यांची बैठक आज मडगावात काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी घेतली. या बैठकीत निवडणुकीच्‍या प्रचाराची रुपरेषा ठरविण्‍यात आली.

या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा, कार्लुस फेरेरा, ‘आप’चे व्‍हेंझी व्‍हिएगस, अमित पालेकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, दुर्गादास कामत, राष्‍ट्रवादीचे (शरद पवार गट) जुझे फिलिप डिसोझा, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) जितेश कामत व नेते उपस्‍थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com