Loksabha Election 2024 : धेंपेंसाठी मोदींची सभा; भाजपचे विरोधकांवर टीकास्त्र

Loksabha Election 2024 : काँग्रेसकडून दुर्लक्ष; कार्यकर्ता बैठकांवर भर
Pallavi Dempo
Pallavi DempoDainik Gomantak

Loksabha Election 2024 :

पणजी, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेणार आहेत. भाजपने प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात आक्रमक रूप धारण करत कॉंग्रेस आणि त्यांच्या उमेदवारांवर थेट टीकास्त्र सोडणे सुरू केले आहे.

मात्र, कॉंग्रेसने जाहीर टीका करण्याऐवजी मतदान केंद्र पातळीवर बैठकांवर भर दिला आहे.

काँग्रेसच्या वतीने दक्षिण गोव्यातील उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा अर्ज सोमवारी सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी उत्तर गोव्यात ॲड. रमाकांत खलप यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यात येणार आहे. भाजपने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केली आहे. मात्र, त्यात तीन आमदारांचा मात्र समावेश कऱण्यात आलेला नाही.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी शुक्रवारी कॉंग्रेसवर टीका केल्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी लगेच प्रत्युत्तर दिले. तोच अध्याय पुढे नेताना आज भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आरती बांदोडकर,

उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक आणि प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसकडून केल्या जाणाऱ्या खोट्या प्रचाराची पोलखोल केली.

बांदोडकर म्हणाल्या, कॉंग्रेसचे दक्षिण गोव्यातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी गोव्याला बलात्काराची राजधानी असे संबोधले आणि महोत्सव अमली पदार्थांशिवाय साजरे होऊच शकत नाहीत, असा जावईशोध लावला, हे साफ चुकीचे आहे. असे वक्तव्य कऱणाऱ्यांचा गोमंतकीय जरूर निषेध करतील. ते आपला निर्धार मतदानादिवशी दाखवून देतील, यात शंका नाही.

आपली पोळी भाजून घेण्यासाठी ते गोव्याचे नाव बदनाम करत आहेत. वास्कोत चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. राज्यात महिला सुरक्षित आहेत. एवढेच नव्हे, तर लोकसभेच्या दोनपैकी एक जागा महिलेला देऊन भाजपने महिलांचा सन्मानच केला आहे.

नाईक म्हणाले, उत्तर व दक्षिण गोव्यात कॉंग्रेस बॅकफूटवर गेली आहे. कॉंग्रेस नकारात्मक मानसिकतेत आहे. कॉंग्रेसचे रूपांतर प्रादेशिक पक्षात होण्याचे दिवस फार लांब नाहीत. भाजप विरोधक जातींचे राजकारण करत आहेत.

भाजप युवा शक्ती, किसान शक्ती, महिला शक्ती आणि गरीब कल्याण या चार मुद्यांचेच राजकारण करतो. ‘आप’चे नेते मोठ्या बाता मारतात. त्यांनी पंजाबमध्ये कॉंग्रेससोबत आघाडी आहे की नाही, ते सांगावे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस एकटी का लढते, याचे उत्तर द्यावे. द्रमुक नेते सनातन धर्मावर टीका करत असताना धर्मनिरपेक्षतेचा जप करणारे राहुल गांधी गप्प का बसतात, त्यांना केवळ अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करायचे आहे का? नेहरूंनी १७, इंदिरांनी २८, राजीव यांनी १० तर मनमोहनसिंग यांनी ७ वेळा घटना दुरुस्ती केली आणि कॉंग्रेसची ओरड भाजप घटना बदलेल, अशी आहे.

वेन्झी व्हिएगस हे भाजपविरोधी ७० टक्के मते आहेत असे म्हणतात. त्या न्यायाने ९४ टक्के मते ही ‘आप’विरोधी आहेत, असे म्हणता येते. कॉंग्रेसच्या उमेदवाराने ‘आप’च्या आमदाराला दलाल संबोधले होते, हे ते आज विसरले असावेत.

पै वेर्णेकर म्हणाले, खलप यांनी बॅंक बुडवली, तर विरियातोंनी पक्ष बुडवला. खलप ३० वर्षांपूर्वी केंद्रात मंत्री होते. त्यानंतर ते अनेकवेळा पराभूत झाले. विशेष म्हणजे, कॉंग्रेसच्या उमेदवारीवर ते एकदाही विजयी झालेले नाहीत.

खलप यांनी खासदार विकास निधीतून एकही प्रकल्प साकारलेला नाही. विरियातो हे सध्या लघु आणीबाणी असल्याचा दावा करतात. मात्र, या देशात आजवर केवळ कॉंग्रेसच्याच पंतप्रधानांनी आणीबाणी लादली होती, ते जनतेला सांगत नाहीत. आमच्या परिवाराची विचारसरणी मानणाऱ्या आमच्या तत्कालीन नेत्यांनी आणीबाणीविरोधात लढा देत लोकशाही जीवंत ठेवली, हे विरियातो यांनी विसरू नये.

गोव्यातही राज्यघटनेच्या ३५६ कलमाचा वापर करून सरकार बरखास्त केले होते. कॉंग्रेसने या कलमाचा ९० वेळा वापर केला; पण भाजपने २०१४ पासून आजवर एकदाही वापर केलेला नाही. कॉंग्रेसने या कलमाचा वापर करून विरोधकांची, प्रादेशिक पक्षांची सरकारे पाडली आहेत. पश्चिम बंगालमध्ये ईडी, एनआयएच्या अधिकाऱ्यांवर हल्ले झाले तरी भाजपने या कलमाचा वापर केला नाही; कारण आमचा लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे.

Pallavi Dempo
Goa Flights: फक्त 1991 रुपयांत करा गोवा ते जळगाव विमान प्रवास ; Fly91 च्या नवीन उड्डाणांची घोषणा

केरळमध्ये भाजपचे १०० हून अधिक कार्यकर्ते मारले गेले, ३०० हून अधिक कायमचे जायबंदी झाले. असे करणारा पक्ष हा कॉंग्रेस आघाडीत आहे आणि ती आघाडी म्हणे लोकशाहीवादी आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवारांनाच मारून टाकले जाते, ती ममता आज कोणाच्या बाजूने आहे याचे उत्तर कॉंग्रेसने द्यावे.

वेर्णेकर म्हणाले की, दिल्लीतील मद्य धोरणप्रकरणी तक्रारदार कॉंग्रेसवाले आहेत. त्या तक्रारीची चौकशी करून ‘आप’च्या मुख्यमंत्र्यांसह इतरांवर कारवाई केली तर कॉंग्रेसच रस्त्यावर येते, ही निव्वळ नौटंकी आहे. लालूप्रसाद यादव यांना १९९७, शिबू सोरेन यांना २००६, ए राजा आणि कनिमोळी यांना २०११ मध्ये तुरुंगात टाकले होते, तेव्हा भाजप सत्तेवर नव्हता.

त्यामुळे अटक आणि तुरुंगवास यांच्याशी राजकीय सुडाचा संबंध नाही, हे सिद्ध होते. कॉंग्रेसचे सरकार असतानाच नॅशनल हेराल्डप्रकरणी तक्रार दाखल झाली होती, त्याचा तपास नंतर झाला. परिवार वादावर टिप्पणी करणाऱ्यांच्या सरकारमधील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गजाआड झाल्यावर त्यांच्या पत्नी पुढे आल्या.

याला परिवारवाद म्हणावे की आणखी काही, याचे उत्तर मिळाले पाहिजे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी कॉंग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषदा घेणारे आज कुठे आहेत, याचा शोध आधी कॉंग्रेसने घ्यावा. एल्विस गोम्स यांनी कॉंग्रेसला आरसा दाखवला आहे, तो पुरेसा आहे.

सध्या कॉंग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यावर आहे. उत्तर गोव्यात खरा कस लागणार तो आमदार ॲड. कार्लुस फेरेरा आणि दक्षिणेत आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रचाराची रूपरेषा पुढे नेली जात आहे.

कॉंग्रेसचे उत्तर गोव्यातील एक नेते अमरनाथ पणजीकर सध्या हंपी दौऱ्यावर गेले असून राष्ट्रीय कार्यकारी समितीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर हे मणिपूरला गेल्याने त्यांची उणीव कॉंग्रेसला भासत आहे. प्रदेशाध्यक्ष पाटकर यांना राज्यभरात प्रचाराच्या निमित्ताने धावपळ करावी लागत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेस हाऊसमध्ये थोडी वर्दळ वाढली आहे.

कॉंग्रेसही उद्या-परवा अर्ज भरणार

काँग्रेसच्या वतीने दक्षिण गोव्यातील उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांचा अर्ज सोमवारी सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी उत्तर गोव्यात ॲड. रमाकांत खलप यांचा उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे. अर्ज सादर करण्याची वेळ मात्र अद्याप निश्‍चित झालेली नाही. अर्ज सादर केल्यानंतर गोव्यात पक्षाचे कोणते स्टार प्रचारक येणार, ते जाहीर होईल. अद्याप पक्षातर्फे बुथनिहाय बैठकांवर जोर दिला जात आहे.

दुखावलेले कॉंग्रेेसजन दूरच

कॉंग्रेसने पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीवर भर दिला आहे. तरीही अद्याप पक्षापासून दुरावलेल्यांची मने जुळलेली नाहीत, असेच चित्र दिसत आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसला नवमतदार निर्माण करणे फार जिकिरीचे आहे. पक्षाच्या उमेदवारांना आपली पारंपरिक मते आणि भाजपवर असंतुष्ट असणारी त्याच पक्षाची मते आरजीकडे वळू नयेत, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

महिनाअखेरीस पंतप्रधानांचा दौरा शक्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात २८ ते ३० एप्रिलदरम्यान सभा होणार आहे. बेतुल येथे डिफेन्स एक्स्पो झालेल्या मैदानावर ही सभा आयोजित करण्याचा विचार भाजपने चालवला आहे. कुडचडे परिसरातील एका मैदानाचा पर्यायही भाजपने ठेवला आहे.

प्रियांका गांधींची सभा

पंतप्रधान कार्यालयातून मोदी यांच्या दौऱ्याची तारीख कळविलेली नाही. मात्र, पंतप्रधान एका जाहीर सभेसाठी गोव्यात उपस्थित राहतील, असे कळविण्यात आले आहे. कॉंग्रेसकडून दक्षिण गोव्यात प्रियांका गांधी वाड्रा यांची प्रचार सभा आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

काँग्रेसच्‍या दाेन्‍ही उमेदवारांना बी-फॉर्म प्रदान; दोन दिवसांत भरणार अर्ज

काँग्रेसचे उत्तर गोव्‍याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्‍याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस या दोघांनाही काँग्रेस पक्षातर्फे आज बी-फॉर्म प्रदान केले. काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांच्‍या घरी हे फॉर्म देण्‍यात आले. काँग्रेसचे दोन्‍ही उमेदवार सोमवारी किंवा मंगळवारी रितसर अर्ज भरतील, अशी माहिती काँग्रेस सूत्रांकडून देण्यात आली.

‘हाथ बदलेगा हालात’ : काँग्रेसने उभे केलेले दोन्‍ही उमेदवार चांगले असून ते या निवडणुकीत नक्‍कीच जिंकून येतील, असे वाटते. ‘हाथ बदलेगा हालात’ ही काँग्रेसची घोषणा असून गाेव्‍यातही ती खरी होणार, अशी अपेक्षा पाटकर यांनी व्‍यक्‍त केली. दोन्‍ही ठिकाणी काँग्रेसच्‍या उमेदवारांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्‍याचा दावाही त्‍यांनी केला.

मुख्यमंत्री उद्या नागपुरात : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे रविवारी रात्री नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. सोमवारी (ता.१५) ते दिवसभर नागपूरमध्ये भाजप उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत आणि प्रचार सभांत सहभागी होतील. सोमवारी रात्री ते गोव्यात परततील. महाराष्ट्रातील प्रमुख प्रचारकांच्या यादीत भाजपने मुख्यमंत्र्यांच्या नावाचा समावेश याआधीच केला आहे. मुख्यमंत्री दुपारी १ वाजता रामदास पेठ येथे पत्रकार परिषद घेतील. १.३० वाजता वर्धमाननगर येथे व्यापार आघाडी बैठकीत ते सहभागी होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com