Loksabha Election 2024: गोमंतकीयांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सज्ज व्हा! यंदाची लोकसभा निवडणूक ठरणार 'निर्णायक'

Loksabha Election 2024: लोकसभेसाठी चाललेली प्रचारयात्रा उमेदवारांना समस्यांची जाणीव करून देणारी आणि सरकारला आरसा दाखवणारी आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024

Loksabha Election 2024: लोकसभेसाठी चाललेली प्रचारयात्रा उमेदवारांना समस्यांची जाणीव करून देणारी आणि सरकारला आरसा दाखवणारी आहे. त्याचे गांभीर्य कुणी लक्षात घेतलेले नाही. नागरी व्यथांची समज आणि त्यावर तोडगा काढण्याची जिद्द असेल तरच भविष्यात कृतीतून ती दिसेल. तसा विश्‍वास लोकांच्या मनात निर्माण करण्यात यश आल्यास प्रचाराचा प्राथमिक टप्पा यशस्वी झाला, असे मानण्यात हशील आहे.

वास्तवावर आभासाचे लेपन, ईप्सित साध्य करण्यास कदापि साह्य करणार नाही. यंदाची लोकसभा निवडणूक गोव्यात एकतर्फी होणार नाही. तसे रंगही दिसत आहेत. आपण लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत जाऊ पाहत आहोत; सरकार नियुक्त प्रशासक म्हणून नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. भाजपकडून दक्षिण गोव्यासाठी पल्लवी धेंपे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर विरोधाचे सूर काहीसे निवळले, लोकांमध्ये कमालीची उत्सुकता ताणली. त्याला अपेक्षांची जोड असणे स्वाभाविक आहे.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024: सांताक्रुझमध्ये काँग्रेसचं पारडं जड; भाजपची लागणार कसोटी

दक्षिण गोव्याला काही समस्या अणकुचीदार काट्यासारख्या बोचणाऱ्या आहेत. वाढीव कोळसा हाताळणीमुळे वाढते हवा प्रदूषण, रेल्वे दुपदरीकरण, म्हादई या मुद्यांचा अंतर्भाव होतो. त्या समस्यांवर संभाव्य उमेदवारांनी भूमिका विषद करावयास हव्यात. सत्ताधारी भाजपची दडपशाहीची भूमिका राहिली आहे. त्यात काही बदल होईल, अशी खात्री मतदारांना मिळायला हवी. पल्लवी धेंपे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अशाच प्रश्‍नांना सामोरे जावे लागले. ‘मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच आपली’, असे म्हणून त्यांनी सुटका करून घेतली असली तरी सरकारची भूमिका आणि नागरिकांच्या अपेक्षा यात विसंगती आहे.

मंत्री सुदिन ढवळीकर यांना हल्ली कंठ फुटला आहे. मडगावात काल त्यांनी रेल दुपदरीकरणाचा पुरस्कार केला; परंतु कोळसा प्रदूषणावर अवाक्षर काढले नाही. मुरगाव परिसरात हवेतील कोळसा भुकटी त्यांना दिसत नाही. चार वर्षांपूर्वी भाजपसोबत ‘फाटल्या’वर ढवळीकरांना म्हादईचा कळवळा आला होता, त्यांनी पोटतिडकीने पदयात्रा काढली होती. आता मात्र म्हादईचा मुद्दा समोर आल्यानंतर ढवळीकरांना न्यायालयाची आठवण येते.

प्रकरण कोर्टात असल्याने भाष्य करण्याचे ते टाळतात. सत्तेत वाटेकरी झाल्यावर असा वांझोटा वैचारिक भ्रष्टपणा बोकाळतो. लोकसभेच्या धामधुमीत समस्याही सोयीस्करपणे निवडल्या जात आहेत. श्रीपाद नाईकांसह ढवळीकरांनी म्हापसा अर्बनचा मुद्दा पुढे करून काँग्रेस उमेदवार खलपांवर वार केले.

सदरहू प्रकरणी खलपांना दोष टाळता येणार नाहीच; पण ठेवीदारांना पैसे परत मिळण्यासाठी राज्य सरकारने काय केले? म्हापसा अर्बन ‘मल्टिस्टेट’ असल्याने ती केंद्राच्या अखत्यारीत येते. पाच लाखांवर ठेवी असणारे १,१५२ ठेवीदारांच्या नाकाला आज सूत लागले आहे. राजकारणासाठी ‘म्हापसा अर्बन’चा वापर करणे म्हणजे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024: पेडण्याचा मतदार कुणाला देणार कौल; श्रीपाद भाऊ अन् रमाकांत खलप यांची लागणार कसोटी

भाजपचे डबल इंजीन सरकार असून त्याचा उपयोग का होऊ नये? ‘गोवा बचाव’ मोहिमेत दक्षिण गोव्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. लोटलीतील पुलासाठी मागणी नसताना मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी असो वा चौपदरी रस्ते. कोळसा हबच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांची ती पोचपावती आहे. लोकही सुज्ञ झाले आहेत. वेळ्ळीत ‘आरजी’च्या प्रचारकांना नागरिकांनी भाजपचे भाट म्हणून हुसकावून लावले. ‘आरजी’ने स्वत:वर अनेक मर्यादा घातल्या आहेत. त्यांची झेप त्यांना ज्ञात आहे. तरीही त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करणे यातून भाजपचा फायदा होणार, हे निराळे सांगण्याची गरज नाही. श्रीपाद नाईक जिथे जातील तेथे त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार झाला. ते सोडविण्याची ठोस हमी ते देऊ शकले नाहीत. एखादा प्रश्‍न हाती घेणे, तो धसास लावणे, समस्या सोडवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे.

त्याला पक्षीय, सत्ताधीश, विरोधक, ‘मते किती मिळतात?’ अशा राजकीय भूमिकांतून पाहणे चुकीचे आहे. प्रसंगी सत्तेत सहभागी असतानाही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्यायचे धाडस असावे लागते. मते लोक देतात; त्यामुळे त्यांच्याशी प्रामाणिक राहणे लोकप्रतिनिधीस अनिवार्य असते. लोकांच्या समस्यांविषयी अनभिज्ञ राहणे, सोयीची बाजू घेत वेळ मारून नेणे आता चालणार नाही. कारण वृत्तपत्रे, माध्यमे, समाजमाध्यमे, प्रगत तंत्रज्ञान यामुळे लोकही कमालीचे अद्ययावत झाले आहेत. ते केवळ जागरूक होऊन थांबत नाहीत, तर प्रश्‍न विचारण्यासही निर्भयपणे पुढे सरसावत आहेत. लोकशाहीसाठी हे खूप चांगले व सकारात्मक वळण आहे.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : राजकारण्यांच्या उदासीनतेबाबत मांद्रेवासीयांत नाराजी; श्रीपाद भाऊंची प्रचारात गती

पल्लवी धेंपेसारख्या नवख्या किंवा रमाकांत खलप, श्रीपाद नाईक यांसारख्या मुरलेले राजकारणी असोत, लोकांना सामोरे जाणे दिवसेंदिवस कठीणच होत जाणार आहे. पहिलीच खेप आहे म्हणून समस्यांपासून सवलत मिळणार नाही आणि अनेक पावसाळे पाहिलेल्यांना त्यांच्यावरील चिखलाचे डाग लपवताही येणार नाहीत. क्षमता कृतीत उतरवल्याचे दाखले आणि कृती न झाल्याची कारणे द्यावीच लागतील. आपल्या कृतीतून आदर्श प्रस्थापित करत रामराज्य आणणारे प्रभू श्रीराम आज जन्मले होते. नागरी व्यथांची समज, राज्याचे प्रश्‍न सोडवण्याची कळकळ असल्याशिवाय केवळ प्रचारांच्या यात्रा करून ‘रामराज्य’ येणार नाही. लोकांना या राजकारणात आता ‘राम’ राहिला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे लोक विचारतील त्या प्रश्‍नांना डावलू नका; उत्तरे देण्यास सज्ज व्हा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com