
पणजी: समुद्रकिनारी जीवरक्षक सेवेसाठी नियुक्त केलेल्या लाईफ सेव्हिंग्ज प्रा. लि.ने बाणावली येथे ५०० चौ. मी. जागेऐवजी सुमारे ५००० चौ. मी. अतिक्रमण केलेल्या जागेची पर्यटन विकास महामंडळाने तपासणी करून अतिक्रमण केलेली जागा रिक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने देत पुढील सुनावणी २९ एप्रिलला ठेवली आहे.
लाईफ सेव्हिंग्ज कंपनीला बाणावली येथे ५०० चौ. मी. जागा स्टोअर रूमसाठी दिली होती. मात्र कंपनीने या जागेव्यतिरिक्त आजूबाजूची जागा व्यापून तेथे भंगारवस्तू ठेवल्या आहेत. त्यामुळे गोवा पर्यटन विकास महामंडळाने कंपनीला ही जागा रिक्त करण्याची नोटीस बजावली होती. या नोटिशीला कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते.
याचिकेवरील सुनावणीवेळी महामंडळातर्फे बाजू मांडताना लाईफ सेव्हिंग्ज कंपनीला ५०० चौ. मी. जागा त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी कोणत्याही कराराविना पर्यटन खात्याने केलेल्या विनंतीवरून देण्यात आली होती. मात्र कंपनीने या जागेव्यतिरिक्त आजूबाजूला असलेली जागा व्यापली आहे व तेथे जीवरक्षकासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची तसेच वापरात नसलेल्या साहित्याचा ढीग करून भंगारअड्डा केला आहे.
त्यांना देण्यात आलेली ५०० चौ. मी. जागेसाठी कोणताही करार कंपनीजवळ केलेला नाही, त्यामुळे ती कोणत्याही क्षणी रिक्त करण्यास लावण्याचा अधिकार महामंडळाला आहे. जीवरक्षक सेवा पुरवण्याचा त्यांचा करार पर्यटन खात्याबरोबर झालेला आहे. त्यामध्ये त्यांना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी जागा शोधण्याचे नमूद केले आहे. मात्र कंपनीने कराराचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांची ही याचिका फेटाळण्यात यावी, अशी बाजू मांडण्यात आली.
पर्यटन खात्याकडे लाईफ सेव्हिंग्ज कंपनीने पत्रव्यवहार करून साहित्य ठेवण्यासाठी स्टोअरची जागा कोलवा येथे शोधली आहे. त्यासंदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.