साळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जगात मोठी प्रगती केली असून त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला लक्षात घेऊन असंख्य योजना तयार केल्या आहेत. मोदी यांच्या स्वप्नातील ‘आत्मनिर्भर भारत’ सुखी, समृद्ध व शांतिप्रिय देश निर्माण करूया. त्यासाठी लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर साळगाव येथील पंचायत सभागृहात भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आज साळगावच्या काही कार्यकर्त्यांना अतीव दुःख झाले आहे. आज ते भाजपात येऊ इच्छित आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा साळगावात भाजपचे कमळ फुलेल.
सदानंद तानावडे यांनी सांगितले की, या आठ वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान मोदी यांनी गरीब जनतेसाठी व खास करून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. केंद्र व राज्य डबल इंजिन सरकारने देशात व राज्यात मोठी प्रगती साधली आहे.
व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर, माजी गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, प्रवक्ते ॲड. यतिश नाईक, सांगोल्डा सरपंच उल्हास मोरजकर, गिरीच्या सरपंच रिमा गडेकर, साळगावचे सरपंच ला फिरा बॉबेस, नेरूलच्या सरपंच रेश्मा कळंगुटकर, माजी जि.पं.सदस्य प्रकाश नाईक, व इतर उपसरपंच, पंच सदस्य उपस्थित होते.
यावेळी साळगाव पंचायत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉक्टरांचा तसेच विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी मंत्री दिलीप परुळेकर म्हणाले की , काँग्रेस सरकारने ७० वर्षांच्या राजवटीत देशाच्या खऱ्या इतिहासाऐवजी उलटा शिकविला गेला. त्यामुळे राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती बिघडून गेली. माजी मंत्री जयेश साळगावकर म्हणाले की, सरकारच्या असंख्य लोकहित योजना लोकांच्या दारी आल्या आहेत.
यावेळी प्रवक्ते ॲड. यतीश नाईक व अशोक पेडणेकर यानींही आपले विचार मांडले. प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून भाजप मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. साळगाव भाजपा मंडळाचे अध्यक्ष रमेश घाडी यांनी प्रास्ताविक केले. सुवर्ण सिंग राणे यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.