मडकई: म्हार्दोळ-सीमेपाईण रस्त्यावरील डोंगर भागात रात्रीच्यावेळी बिबट्याच्या (Leopards) डरकाळ्या ऐकू येत असल्याने म्हार्दोळहून मडकई औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या लोकांमध्ये भीती पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी कुंकळ्ये येथील बागायती भागात डरकाळ्या ऐकू आल्याने वाघ असावा, असा संशयही लोकांनी व्यक्त केला आहे. दलदलीत ठसे उमटल्याचे निदर्शनास आले आहेत. म्हार्दोळ-मडकईतील डोंगर भागात गेल्या महिनाभरापासून रात्रीच्या वेळी डरकाळ्या ऐकू येत आहेत.
रात्रीच्या वेळी तर एका वाहनचालकाला रस्त्यावरून बिबट्या जाताना दिसला. दुर्भाट येथील एक उद्योजक हनुमंत नाईक यांनी तर वाघाच्या डरकाळ्या असल्याचे सांगितले होते. कुंकळ्ये भागातही तिच स्थिती असून दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी नागरिकांनी डरकाळ्या ऐकल्या. सकाळी काही लोकांना दलदलीत बिबट्याचे ठसे दिसले. हा परिसर रानाचा असल्याने रात्रीच्यावेळी दुचाकीचालकावर वाघाने हल्ला केला तर मोठा बाका प्रसंग उद्भवू शकतो. त्यामुळे वन खात्याने याप्रकरणी त्वरित लक्ष घालून वाघाचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
"या भागात बिबटे आहेत याची कल्पना वनविभागाला दिली असून विभागाने ठसे घेऊन त्याची पडताळणी केली असता ते बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकांनी काळजी घ्यावी."
- राजेंद्र केरकर, वन्यजीव अभ्यासक
गव्यांनीही घातलाय धुडगूस
गेल्या वर्षभरापासून म्हार्दोळ, कुंकळ्ये भागात गव्यांचा धुडगूस सुरू आहे. या गव्यांनी शेतीची मोठी नासाडी केली होती. गेल्या वर्षी तर उभे पीक या गव्यांनी आडवे केल्याने शेतकऱ्यांना नुकसान झाले होते. आताही अधूनमधून गव्यांचे दर्शन होत असून कुर्टी - फोंडा भागात गव्यांचा कळप आढळून आला आहे. रानटी जनावरे लोकवस्तीच्या ठिकाणी येत असल्याने त्यांच्याकडून बागायतीची प्रचंड नुकसानी होत असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.