Leopard Attack: तुडवमध्ये बिबट्याकडून तीन बैलांचा फडशा! वन अधिकारी न फिरकल्याने संताप

तुडव नेत्रावळी येथील गावातील शेतकऱ्यांच्या गुरांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना घडली असून तीन बैल हल्ल्यात ठार झाले आहेत.
Leopard Attack News
Leopard Attack NewsDainik Gomantak

Leopard Attack News

तुडव नेत्रावळी येथील गावातील शेतकऱ्यांच्या गुरांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना घडली असून तीन बैल हल्ल्यात ठार झाले आहेत. तर कित्येक गुरे जखमी झाल्याने हे एकट्या बिबट्याचे कृत्य नसून एकाच वेळी तीन बैल आणि इतर गुरांवर हल्ला करणे म्हणजे तीन-चार बिबट्यांनी एकाच वेळी गुरांवर हल्ला केला असावा,असा कयास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार तुडववासीय आपल्या जमिनीत गुरांना चरण्यासाठी घेऊन जात असत. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी प्रत्येकाने आपली गुरे चरण्यासाठी नेली असता दुपारच्यावेळी गुरे राखणारे जेवणासाठी घरी आले होते.

त्याच वेळी बिबट्याकडून गुरांवर हल्ला झाला. या हल्ल्यात तीन बैल दगावले, तर इतर गुरे जखमी अवस्थेत भर दुपारी घरी परतल्याने गावात हलकल्लोळ माजला. लागलीच सर्व शेतकरी एकत्र जमून गुरे चारण्यासाठी सोडून आलेल्या ठिकाणी अन्य गुरांचा शोध घेतला असता तीन बैल मरून पडल्याचे आढळून आले.

वन खात्याचे कर्मचारी एखादे झाड कापल्यास लागलीच गावात येऊन झाडाझडती करत असतात. मात्र एवढी मोठी घटना घडून आणि वन खात्याला कळवूनही एकमेव बिट वनरक्षक वगळता एकही वनअधिकारी गावात आला नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

बिबटे की, वाघ संभ्रम

गुरांवर हल्ला करणारे बिबटे की पट्टेरी वाघ याचा स्पष्ट उल्लेख ग्रामस्थ व वन रक्षकही करू शकले नाहीत. मात्र बिबट्यांकडून पाळीव कुत्रे पळविण्याचे सत्र सुरूच होते, असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्याच्या हल्ल्यात प्रभाकर पुनो वेळीप यांचे दोन बैल, तर कुष्टा गावकर यांचा एक बैल ठार झाला आहे. विठ्ठल गावकर यांच्या बैलावर प्राणघातक हल्ला झाला आहे. इतरांच्या गुरांवरही बिबट्याने हल्ला केल्याने रक्ताळलेल्या जखमा दिसून येत आहेत.

बिबट्यामुळे गावात दहशत पसरली असून एकाच वेळी तीन बैल ठार तर अन्य सर्वांच्या अंगावर झालेल्या जखमा पाहता किती बिबटे आहेत, ते समजत नसल्याने वन खात्याने याचा बंदोबस्त करावा. कारण इतर ठिकाणी सापडलेले हिंस्त्र प्राणी किंवा बिबटे तुडव, वेर्ले सारख्या जंगलात आणून सोडत असल्याचा अंदाज ग्रामस्थांना आला आहे.

पाळीव गुरे दगावली म्हणून वन खात्याकडून नुकसान भरपाई दिल्याचे उदाहरण नाही. हाच हल्ला गुरे घेऊन गेलेल्या माणसांवर झाला असता तर गावावर शोककळा पसरली असती. याचा विचार वन खात्याने करणे आवश्यक आहे.

- सतीश गावकर, माजी पंचायत सदस्य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com